
नाशिक : त्र्यंबक रोडवरील पोलिस अकादमीसमोरील आरक्षित जागेवरचा मालकीहक्क सिद्ध करता न आल्याने उच्च न्यायालयाने दावा फेटाळल्यानंतरही इस्टेट सहकारी सोसायटी व ठक्कर डेव्हलपर्सने न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता फेब्रुवारीत मूळ मालकांकडून समजूतपत्र लिहून घेत खरेदीखत नोंदविण्याचा प्रकार समोर आला आहे. फसवणुकीविरोधात जिल्हा सहनिबंधकांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फसवणुकीविरोधात जिल्हा सहनिबंधकांकडे तक्रार
सर्व्हे क्रमांक ७५०, ७५१ व ७५५ मधील सुमारे २५ हेक्टर जागा नागरी कमाल जमीनधारणा कायद्यांतर्गत महापालिकेला मोफत मिळणे अपेक्षित होते. परंतु १९९३ ला मंजूर झालेल्या पहिल्या शहर विकास आराखड्यात या जागेवर विविध प्रकारचे नऊ आरक्षणे टाकण्यात आली. या जागेवर काही बांधकाम व्यावसायिकांनी दावा करत आरक्षणाच्या बदल्यात मोबदल्याची मागणी महापालिकेकडे केली होती. त्याबदल्यात काही प्रमाणात मोबदला प्राप्त करून घेण्यात आला. त्यानंतर टीडीआर स्वरूपात मोबदल्याची मागणी करण्यात आली. मोबदला मिळत नसल्याने आरक्षणे रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेण्यात आली. खरेदीखताच्या आधारे संबंधित व्यावसायिकांनी जागेवर मालकीहक्क दाखविल्याने महापालिकेने जागेच्या मूळ मालकाचा शोध घेतला. ही आरक्षित जागा कमाल जमीनधारणा कायद्यानुसार अतिरिक्त होत असल्याने ती जागा मोफत मिळणे अपेक्षित होते. मात्र उलट महापालिकेकडे मोबदल्याची मागणी करण्यात आल्याची बाब समोर आल्याने मिळकत विभागाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत याचिकेवरील दाव्यावर आक्षेप घेतला.
खरेदीखताद्वारे परस्पर व्यवहार झाल्याचा प्रकार समोर
न्यायालयाने कागदपत्रांची छाननी करून जागेवर दावा करणाऱ्या याचिकाकर्त्यांना मालकीहक्क सिद्ध करण्यासाठी मुदत दिली. परंतु संबंधितांना मालकीहक्क सिद्ध करता न आल्याने सप्टेंबर २०१९ मध्ये दावा फेटाळला. त्यानंतर मात्र जागेचा चुकीच्या पद्धतीने व्यवहार होण्याची शक्यता असल्याने मिळकत विभागाने महसूल, मुद्रांक जिल्हाधिकारी, मुद्रांक विभागाच्या सचिवांशी पत्रव्यवहार करून महापालिकेला विचारात घेतल्याशिवाय जागेचा व्यवहार करू नये, अशी विनंती केली. आता त्या जागेचा खरेदीखताद्वारे परस्पर व्यवहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
खरेदीखताद्वारे नोंदणी
पोलिस अकादमीसमोरील जागा महापालिकेला मिळणे अपेक्षित असताना अद्यापपर्यंत जागा मिळाली नाही. महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनदेखील जागा ताब्यात मिळण्यासाठी प्रयत्न झाले नाही. अशातच दिंगबर अहिरवार यांच्यासह अन्य सात जणांनी जागेवर दावा केला असून, नाशिकच्या दिवाणी न्यायालयात दावा प्रलंबित आहे. उच्च न्यायालयाने ठक्कर डेव्हलपर्सचा मालकीहक्क नाकारला असताना फेब्रुवारी २०२० मध्ये प्रतिवादीपैकी चौघांकडून समजूतपत्र न्यायालयात दाखल करून घेण्यात आले. परंतु चुकीच्या पद्धतीने व घाईघाईत समजूतपत्र दाखल करून खरेदीखत तयार करून घेतल्याने जिल्हा सहनिबंधकांकडे हरकत नोंदविण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.