Diwali Festival 2020 : वसुबारसच्या निमित्ताने पारंपारिक पशुधनाची पूजा; गोशाळांत मोठी गर्दी

vasubaras.jpg
vasubaras.jpg

नाशिक : लहान-थोरापासून प्रत्येकाच्या आवडीची आणि जिव्हाळ्याची दिवाळी आजपासून खऱ्या अर्थाने सुरु झाली. सायंकाळी वसुबारसच्या निमित्ताने शहर जिल्ह्यात ठिकठिकाणी कृषी संस्कृतीची ओळख असलेले पारंपारीक पशुधनाची पूजा झाली. यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचे सावट असले तरी, अनेकांनी सहकुटुंब पारंपारीक पध्दतीने गोधन पूजन करीत, दिवाळीचे स्वागत केले. आणि ख-या अर्थाने दिपोत्सव सुरू झाला. 

गोशाळांत गोपूजनासाठी अनेकांनी कुटुंबियांसह मोठी गर्दी

कृषी संस्कृतीच्या भारतात दिवाळी आणि दिवाळीत अश्विन महिन्यातील वद्य द्वादशीला वसुबारस हा या संस्कृतीचा मोठा ठेवा आहे. वसुबारसेला गोवत्स द्वादशी असेही म्हटले जाते. यानिमित्ताने शहर परिसरातील विविध गोशाळांमध्ये नागरिकांनी सहकुटुंब जाऊन गोपूजनाचे पुण्य पदरात पाडून घेतले. सोमेश्‍वर लगतच्या शंकरचार्य न्यासाच्या गोशाळेत दरवर्षी पूजनासाठी मोठी गर्दी उसळते. यावर्षी कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आला असला तरी सकाळपासून अनेक कुटुंबांनी गोपूजन केल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष रामभाऊ जानोरकर यांनी सांगितले. तपोवन, विल्होळी, म्हसरूळसह विविध गोशाळांत गोपूजनासाठी अनेकांनी कुटुंबियांसह मोठी गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विशेष काळजीही घेण्यात येत होती. 

बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

बाजारपेठेत दिवाळी खरेदीची चार पाच दिवसांपासून झुंबड उडाली आहे. बाजारपेठेतील अरुंद गल्ल्या, खरेदीदारांचा उत्साह अन त्यातच रिक्षांसह चारचाकी वाहनांच्या प्रवेशाने मेनरोडसह दहिपूल, नेहरू चौक, शालिमार, दिल्ली दरवाजा, कानडे मारूती लेन, बोहोरपट्टी, सराफबाजार याभागात वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. ही कोंडी फोडण्यासाठी पोलिसांनी रविवार कारंजा, टिळखपथ सिंग्नल, शालिमार भागात बॅरीकेंटींग करत तीनचाकींसह चारचाकी वाहनांना मज्जाव केला, त्यामुळे कालपासून या वाहनांना काही प्रमाणात अटकाव झाला. मात्र तरीही अनेकजण गल्लीबोळातून मुख्य बाजारपेठांत वाहने आणून वाहतूक कोंडीस हातभार लावत असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी वाहनधारक व पायी चालणा-यांमध्ये हमरीतुमरीचे प्रसंगही घडले. 

लक्ष्मीपूजन (ता.१४) मुहुर्त 

शनिवारी लक्ष्मीपूजनाचा सायंकाळी सहा ते ८ वाजून २५ मिनिटे आणि त्यानंतर रात्री ९ ते ११ वाजून १९ मिनिटांपर्यंत मुहुर्त आहे. तर सोमवारी दिपावली पाडव्यानिमित्त सोमवारी (ता.१६) वहीपूजनासाठी पहाटे ५ वाजून १५ मिनिटे ते आठपर्यत व सकाळी साडेनऊ ते अकरापर्यंतचा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com