तरुणाईने प्रस्थापितांविरोधात थोपटले दंड! राजकारणात तरुणांच्या भूमिकेचा मातब्बरांनी घेतला धसका

एस. डी. आहिरे 
Sunday, 3 January 2021

निफाड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीतील माघारीसाठी मनधरणी सुरू असून, पॅनलची रचना अंतिम टप्प्यात आहे. अर्ज भरणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे तरुणाईने प्रस्थापितांविरोधात दंड थोपटले आहेत.

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : निफाड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीतील माघारीसाठी मनधरणी सुरू असून, पॅनलची रचना अंतिम टप्प्यात आहे. अर्ज भरणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे तरुणाईने प्रस्थापितांविरोधात दंड थोपटले आहेत. वर्षानुवर्षे गावाचे राजकारणात आपल्या वज्रमुठीत ठेवणाऱ्या किंगमेकर नेत्यांची भलतीच कोंडी झालेली दिसते. ‘पॅनलमध्ये उमेदवारी द्या, अन्यथा अपक्ष लढणार’ या तरुणांच्या भूमिकेने मातब्बरांनी धसका घेतला आहे. नव्या चेहऱ्यांना मिळणारा प्रतिसादही लक्षणीय असल्याने पॅनलच्या कारभाऱ्यांची गोची झाली आहे. 

मातब्बरांविरोधात तरुणांची फळी

राजकारणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींवर हुकमत राखण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली आहे. ग्रामपंचायतींवर काही ठराविक घराण्यांची मक्तेदारी राहिली आहे. अशा प्रस्थापितांविरोधात नाराजीचा सूर आहे. खासकरून तरुणांनी यासाठी थेट शड्डू ठोकला आहे. विविध तरुण मंडळे, क्रीडामंडळे, गणेशोत्सव, शिवजयंती या माध्यमातून तरुणांनी एकजूट राखली आहे. यातून नव्या नेतृत्वाला चालना मिळत आहे. सत्तेशिवाय मदतीला धावणाऱ्या या तरुणांना ग्रामस्थांतर्फेच ग्रामपंचायतीच्या आखाड्यात उतरविण्याचे आवतन दिल्यानेच मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. पिंपळगाव बसवंतलगतच्या बेहेड गावात अशाच मातब्बरांविरोधात तरुणांची फळी रिंगणात आहे. बुहतांश गावांमध्ये तरुणाई राजकारणाचा श्रीगणेशा करण्यासाठी सरसावली आहे. तरुणाईने सोशल मीडियातून वातावरण तापविले आहे. खासकरून नि:स्वार्थीपणाने मदतीच्या स्वभावामुळे अशा तरुणांची गावात मोठी क्रेझ आहे. 

हेही वाचा> गॅस गिझर भडक्यात बाथरूममध्ये तरुणाचा गुदमरून मृत्यू; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाटील कुटुंबात आक्रोश

युवाशक्तीच निर्णायक... 

सर्वच आघाड्यांकडून विशेषत: युवा उमेदवार, मतदारांवर लक्ष ठेवले जात आहे. युवा मतदारांची वाढलेली संख्या हे त्यामागील रहस्य आहे. तालुक्यात सरासरी दहा हजारांनी नवमतदारांची संख्या वाढली आहे. पूर्वी केवळ प्रचारासाठी वापरली जाणारी युवाशक्ती मोठ्या गावांत निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. तरुण मंडळे, क्रीडामंडळे अशा युवकांचे गट आपल्याकडे कसे राहतील, यासाठी व्यूहरचना करत एकवेळ ज्येष्ठांना थांबवून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे डावपेच कारभाऱ्यांनी आखले आहेत. 

उमेदवारांना मतदारराजाचा येईना अंदाज... 

विकास व समस्या सोडविण्याच्या आश्‍वासनांचा पाऊस इच्छुक उमेदवारांकडून पडत आहे. मतदार मात्र सर्वांचे ऐकून घेत ‘आमचे मत तुलाच’ अशा प्रकारचा विश्‍वास दाखवत असला तरी ‘मतदारराजा तुझा रंग कसा,’ असा प्रश्‍न इच्छुकांच्या मनाला पडला आहे. काही मतदारांची पूर्वीची रुसवीफुगवी काढण्यात इच्छुक व्यस्त आहेत, तर काही मतदारांनी पूर्वीचा राग मनात ठेवून व्याजासकट वसूल करण्याची खूणगाठ बांधली आहे.  

 

हेही वाचा> दिव्यांग पित्याचे मुलाला अभियंता बनविण्याचे डोळस स्वप्न; कॅलेन्डर विक्रीतून जमवताय पै पै, असाही संघर्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Large number of youth participated in Gram Panchayat elections in Niphad taluka nashik marathi news