"सामूहिक प्रयत्नांनी करूयात कोरोनाला हद्दपार" - छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 20 July 2020

सुरक्षित शहर म्हणून अनेकांनी इथे वास्तव्यास प्राधान्य दिले. मात्र, लॉकडाउन उठताच नाशिकमध्ये असं काही घडलं, की नऊ हजारांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर तीनशेहून अधिक मृत्यू झाले. या सर्व घटना आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावतात

नाशिक : देशात कोरोनाचे थैमान सुरू असताना नाशिकमध्ये संसर्ग आटोक्यात होता. सुरक्षित शहर म्हणून अनेकांनी इथे वास्तव्यास प्राधान्य दिले. मात्र, लॉकडाउन उठताच नाशिकमध्ये असं काही घडलं, की नऊ हजारांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर तीनशेहून अधिक मृत्यू झाले. या सर्व घटना आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावतात. मात्र, आपण परिस्थितीला अटकाव घालू शकतो. त्यासाठी सामूहिक प्रयत्न महत्त्वाचे आहेत. प्रशासनाने दिलेले नियम पाळत सहकार्याची गरज आहे, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. 

कोरोनाला हद्दपार करूया
‘सकाळ’शी बोलताना भुजबळ म्हणाले, की ज्यावेळी संकटं उभी राहिली त्या प्रत्येकवेळी नाशिककरांची एकजूट सर्वांनी पाहिलीय. त्यामुळे पुन्हा एकदा या कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी नाशिककरांना एकजूट करून ही लढाई जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आजही कोरोनाची परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेलेली नाही. सामूहिक प्रयत्नांची जोड देत आपण सर्व मिळून पुढे येऊन कोरोनाला हद्दपार करूया. 

हेही वाचा > थरारक! बायकोच्या चारित्र्यावर होता नवऱ्याला संशय...मध्यरात्रीच केला 'असा' अंगावर काटा आणणारा प्रकार

काय म्हणालेत पालकमंत्री... 
- प्रशासनाकडे आजही मुबलक प्रमाणात बेड उपलब्ध आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. 
- केवळ लॉकडाउन पुरेसे नाही. प्रत्येक घटकांचा विचार करून अर्थचक्र सुरू ठेवत लढाई आपणाला जिंकायचीय. 
- कोरोनाच्या संकटात सरकारकडून पूर्णपणे मदत देण्यात येत असून, त्यात कुठलीही कमतरता पडणार नाही, ही पालकमंत्री आणि नाशिककर म्हणून माझी जबाबदारी. 
- कोरोनाचा वाढता फैलाव होत असला, तरी आपल्याकडे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. 
- कोरोनाच्या प्रसारात तरुणाई मोठ्या प्रमाणात अडकत असल्याने चिंता अधिक वाढली. त्यामुळे तरुणांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. 
- प्रशासनाने शारीरिक अंतर ठेवणे, मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे यांसह इतर केलेल्या सूचनांचे पालन करण्याची नितांत गरज आहे. 

हेही वाचा > दुर्देवी! धरणात पोहण्यासाठी गेलेल्या पोलीसासह दोन मित्रांचा बुडून मृत्यू...परिसरात खळबळ

- मालेगावमधील कोरोनाचा शिरकाव वाढला असताना प्रशासन आणि तेथील नागरिकांनी केलेल्या विशेष प्रयत्नांनी परिस्थिती लवकर आटोक्यात आली. 
- मालेगावमधील युनानी डॉक्टर, तसेच खासगी डॉक्टरांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये अशी एकजूट ठेवण्याची नितांत आवश्यकता आहे. 
- सरकारी, वैद्यकीय अधिकारी डॉक्टरांच्या मदतीला खासगी डॉक्टरांनी आता पूर्ण क्षमतेने उतरण्याची गरज नाशिककर म्हणून आपणाला पार पाडावी लागेल.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Let's battle to Corona from Nashik marathi news