समृद्धी महामार्गाच्या कामात स्थानिकांना रोजगार मिळावा; राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी

पोपट गवांदे
Tuesday, 6 October 2020

समृध्दी महामार्गाकरिता लागणा-या जमीनींचे संपादन करण्यासाठी विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन जमिनीचा मोबदला व घरातील एक सदस्याला या समृद्धी महामार्गाच्या कामावर घेतले जाईल असे आश्वासन दिले गेले होते

नाशिक/इगतपुरी : इगतपुरी तालुक्यात मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे काम चालु आहे.या महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने स्थानिकांना रोजगार द्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष महेश शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार ( ता.6 ) आमदार हिरामण खोसकर व तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले. 

समृध्दी महामार्गाकरिता लागणा-या जमीनींचे संपादन करण्यासाठी विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन जमिनीचा मोबदला व घरातील एक सदस्याला या समृद्धी महामार्गाच्या कामावर घेतले जाईल असे आश्वासन दिले गेले होते. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे असे या निवेदनात म्हटले आहे. 

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

हा महामार्ग इगतपुरी तालुक्यातुन जात असल्याने या कामासाठी इगतपुरी तालुक्यातील तारांगण पाडा व वाशाळा येथे काम करणाऱ्या कंपनीने स्थानिकांना डावलून परराज्यातील मजुरांना कामावर घेतले आहे. 
या कंपनीत स्थानिकांना कामवर घ्यावे यासाठी येथील बेरोजगार तरुणांनी कायम पाठपुरावा करून देखील कंपनी व्यवस्थापक या बेरोजगार तरुणांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. शासनाने ठरविलेल्या नियम व अटीनुसार स्थानिकांना 70% रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष महेश शिरोळे, शहराध्यक्ष वसिम सैयद, बाळासाहेेब गाढवे, गौरव राऊत, अमोल बोरावके आदी उपस्थित होते.

हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Locals should get employment in the company working on Samrudhi Highway nashik