"लॉकडाउन लोकांच्याच हाती! अन्यथा शासनाला पुन्हा लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागेल"

विनोद बेदरकर
Saturday, 20 February 2021

"कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे; अन्यथा शासनाला पुन्हा लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागेल,"

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे; अन्यथा शासनाला पुन्हा लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागेल, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येथे सांगितले. शिवजयंतीनिमित्त शुक्रवारी (ता. १९) शहरातील विविध कार्यक्रमांतील अभिवादनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

लॉकडाउनचा निर्णय नागरिकांच्या हातात
भुजबळ म्हणाले, की राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत लॉकडाउनचा निर्णय घेण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात अद्याप तसा निर्णय घेतलेला नाही. लॉकडाउन करणे नागरिकांना आणि शासनालादेखील परवडणारे नाही. मात्र रुग्णसंख्या वाढत राहिली, तर यावर पुनर्विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे. लॉकडाउनचा निर्णय हा पूर्णपणे नागरिकांच्या हातात आहे. जर नागरिकांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले. मास्क आणि सॅनिटायजरचा वापर नियमित केला तरच हे शक्य आहे; अन्यथा शासनाला याचा पुनर्विचार करावा लागेल. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

पालकमंत्री - अन्यथा, शासनाकडून लॉकडाउन 
नाशिकला होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाबाबत ते म्हणाले, की कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पुढील महिन्यात शहरत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. संमेलनासाठी महिनाभराचा कालावधी बाकी आहे. यासाठी काटेकोर पद्धतीने नियोजन करण्यात येत असून, साहित्य संमेलनाच्या ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात येईल. या कार्यक्रमस्थळी मास्कशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. याठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येऊन गर्दी होणार नाही, याचे काटेकोर नियोजन करण्यात येणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.  

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown is in hands of people nashik marathi news