
बळीराजाला कोरोना महामारीपाठोपाठ परतीच्या पावसाने अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे. काबाडकष्ट करून पिकवलेल्या शेतीमालाला भाव मिळत नसल्याने प्रपंच हाकायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
नाशिक/नांदूरशिंगोटे : बळीराजाला कोरोना महामारीपाठोपाठ परतीच्या पावसाने अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे. काबाडकष्ट करून पिकवलेल्या शेतीमालाला भाव मिळत नसल्याने प्रपंच हाकायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यातच नांदूरशिंगोटे परिसरात कोथिंबिरीच्या पिकाला लाखो रुपयांचा मिळणारा बाजारभाव गडगडल्याने ती मातीमोल विकण्याची वेळ आली असून, व्यापारी वर्गाकडून थट्टा सुरू असल्याने पीक अक्षरशः रस्त्यावर फेकावे लागत आहे.
पाच-दहा हजार मिळणेही अवघड
साधारण दोन महिन्यांपूर्वी कोथिंबीर उत्पादक लखपती झाल्याच्या घटना याच नांदूरशिंगोटे परिसरात घडल्या होत्या. आता त्याच भागात शेतकऱ्यांवर रोडपती होण्याची वेळ आली आहे. परतीच्या पावसाने भाजीपाल्यासह अन्य शेतीचे अतोनात नुकसान झाले. खिशाला झळ सोसून पिकवलेल्या शेतीमालाला बाजारात कोणी विचारात नसल्याने आर्थिक नुकसान सोसण्याची वेळ आली आहे. या संकटात आता सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे. वीस-बावीस गुंठे क्षेत्रात लाखो रुपये उत्पन्न कोथिंबिरीचे मिळाले. आता मात्र पाच-दहा हजार रुपये मिळणेही अवघड बनले आहे. व्यापारी वर्गाकडून बाजारातील चित्र बघून पाठ फिरवणे सुरू आहे. त्यामुळे काढणी केलेली कोथिंबीर कुठेतरी रस्त्यावर फेकल्याचे चित्र परिसरात जागोजागी दिसत आहे.
हेही वाचा > धक्कादायक! रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा; पोलिस पतीसह पाच जणांकडून पत्नीचा छळ
शेतकऱ्यांचा नाईलाज
ज्या कोथिंबिरीची चोरी व्हायची, ती कोथिंबीर आता फुकट न्यायलाही कोणी तयार नाही. जनावरेही खायची थांबली असल्याने शेतकऱ्यांचा नाईलाज झाला आहे. शासनाने या नुकसानीची पाहणी करून कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी परिसरातून होत आहे.
हेही वाचा > ह्रदयद्रावक! अखेरच्या क्षणीही मैत्रीचा घट्ट हात कायम; जीवलग मित्रांच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा