निर्यातक्षम कांदा सडल्याने व्यापाऱयांना ७५० कोटींचा दणका 

महेंद्र महाजन
Tuesday, 29 September 2020

कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील कांद्याची पावसाने दाणादाण उडविली आहे. त्याच वेळी कांद्याचे आगर असलेल्या महाराष्ट्रातसुद्धा खरीप कांद्याच्या रोपांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून, नवीन कांदा बाजारात येण्यासाठी महिन्याभराचा विलंब होणार आहे. शिवाय पश्‍चिम बंगाल, राजस्थानमधील नवीन कांदा बाजारात येण्यासाठी नोव्हेंबरची अखेर उजाडणार आहे.

नाशिक : कांदा निर्यातबंदीचा आदेश सायंकाळी आला, मात्र सकाळपासून बंदरात आणि सीमेवर कांद्याची अडवणूक सुरू होती. त्याबद्दलची ओरड होताच आदल्या दिवशीच्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी मिळाली. पण अडकलेल्यापैकी ३० टक्के कांदा निर्यातीसाठी रवाना झाला. उरलेल्या ७० टक्के कांद्यातील निम्म्याहून अधिक कांदा सडल्याने जवळपास ७५० कोटींचा फटका व्यापाऱ्यांना बसल्याचा प्राथमिक अंदाज निर्यातदारांकडून वर्तविण्यात आला. 

निर्यातक्षम कांदा सडल्याने व्यापाऱ्यांना ७५० कोटींचा दणका 
कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील कांद्याची पावसाने दाणादाण उडविली आहे. त्याच वेळी कांद्याचे आगर असलेल्या महाराष्ट्रातसुद्धा खरीप कांद्याच्या रोपांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून, नवीन कांदा बाजारात येण्यासाठी महिन्याभराचा विलंब होणार आहे. शिवाय पश्‍चिम बंगाल, राजस्थानमधील नवीन कांदा बाजारात येण्यासाठी नोव्हेंबरची अखेर उजाडणार आहे. त्यामुळे आणखी महिनाभराहून अधिक काळ नाशिकचा उन्हाळ कांदा भाव खाणार हे स्पष्ट झाले आहे. कर्नाटकमध्ये पुन्हा कांद्याची लागवड सुरू झाल्याची माहिती व्यापाऱ्यांपर्यंत येऊन धडकली आहे. 

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

कर्नाटकमध्ये कांद्याच्या लागवडीला पुन्हा प्रारंभ ​
राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या बंदरात चार लाख टन कांदा पडून असल्याची माहिती दिली होती. त्याच वेळी बांगलादेश, नेपाळ, भूतानच्या सीमेवर सहाशेहून अधिक ट्रकभर कांदा अडकून पडला होता. केंद्राने १३ सप्टेंबरच्या कांद्याच्या निर्यातीचा मार्ग मोकळा केल्यानंतर निर्यातदारांच्या म्हणण्यानुसार तीन लाख टनांपैकी ८० टक्के म्हणजेच, सव्वादोन लाख टन कांदा खराब झाला. ३० हजार रुपये टन या भावाचा विचार करता, हा फटका पावणेसातशे कोटींपर्यंत पोचतो. सीमेवरील उभ्या असलेल्या ट्रकसाठी दिवसाला तीन हजार रुपये अतिरिक्त भाड्याचा भुर्दंड व्यापाऱ्यांना सोसावा लागला आहे. त्याचप्रमाणे बंदरात ‘डिटेशन्स चार्ज’, बंदरातील कंटेनरसाठी प्लगिंग शुल्क, जागाभाडे, अपलोडिंग शुल्क अशी जहाज कंपन्यांनी ७० कोटींपर्यंतची केलेली आकारणी देण्याखेरीज पर्याय उरलेला नाही, असेही निर्यातदारांचे म्हणणे आहे. 

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

पुन्हा तीन हजार रुपयांपर्यंतचा खर्च
बंदर आणि सीमाभागातून जवळपास ७५ हजार टन कांदा परत आणला गेला. त्याचा परतीचा प्रवास, सडलेला कांदा काढण्यासाठीची निवडण्याची प्रक्रिया आणि उरलेला कांदा पुन्हा भरण्यासाठी गोण्या असा टनाला पुन्हा तीन हजार रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागला आहे. हा खर्च २२ कोटींच्या पुढे जातोय. -विकास सिंह, कांदा निर्यातदार  

संपादन - ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: loss to traders due to rotting exportable onion nashik marathi news