लॉकडाऊनमध्ये साधली प्रगती.. दीड रुपयाच्या मत्स्यबीजातून कमाई मोठी!

SKO20A00160_pr.jpg
SKO20A00160_pr.jpg

नाशिक/ साकोरा : मत्स्यव्यवसाय हा एक उत्कृष्ट व्यवसाय ठरत आहे. याच्यातून प्रगती साधता येत आहे. या व्यवसायासाठी शेतकऱ्यांना शेततळे, तर आदिवासींसाठी परिसरातील पाझर तलाव, धरणे हा पर्याय आहे. 


धरणात चांगल्याप्रकारे वाढ
दोन वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात चांगला पाऊस पडत आहे. जवळजवळ सर्वच पाझर तलाव, छोटी-मोठी धरणे, शेततळी तुडुंब झाली आहेत. या सर्व स्रोतांमध्ये शेतकरी, आदिवासी बांधव चांगल्या प्रतीचे मत्स्यबीज घेऊन टाकत आहेत. ग्रामपंचायत हद्दीतील बंधारे, धरण यांचे लिलाव मत्स्य सोसायटीतील सदस्य घेतात. तो लिलाव एक वर्षासाठी असतो. त्यात धरणाचे क्षेत्रफळ बघून मत्स्यबीज सोडले जाते. मत्स्यबीजांची धरणात चांगल्याप्रकारे वाढ होते, तर शेततळ्यात यांची वाढ कमी प्रमाणात होते. 


दोनशे बीजांची एक पिशवी 
रोहू, कटला, कोंबडा, सिल्व्हर या गोड्या पाण्यातील माशाच्या काही जाती असून, त्यांच्या मत्स्यबीजांची निवड चांगल्या प्रकारे करावी लागते. आपल्या भागातील मागणीनुसारच मिश्रबीज सोडले जाते. मत्स्यबीजांची आवक आंध्र प्रदेश, गुजरात व कोलकता येथून होते, तर येथील सप्लायर त्यांची दोनशे बीजांची एक पिशवी करून विक्री करतात. एका पिशवीत २०० ते २५० मत्स्यबीज असते व त्याची किंमत १६० ते २०० रुपयांपर्यंत असते. 


संरक्षणासाठी स्रोतांवर जाळी
मत्स्यबीज सोडायचा हंगाम जून ते सप्टेंबर असून, मत्स्यबीज सोडल्यानंतर एक महिन्यापर्यंत पीठ टाकायचे आणि एक महिन्यानंतर मका, बाजरी, ज्वारी व सोयाबीन यांचा भरडा करून टाकावा लागतो. चार-पाच दिवसांआड चार ते पाच पाटी शेणखत, एक महिन्याच्या अंतरात १५ ते २० किलो चुना व अर्धा एक किलो हळद टाकली जाते. पाणकोंबडी खोलवर पाण्यात जाऊन मासे खाते तसेच इतर पक्ष्यांपासून संरक्षणासाठी स्रोतांवर जाळी वापरली जात आहे. मत्स्यबीज सप्लायर माशांच्या जाती व आकारानुसार ८० ते १२० रुपये भावाने खरेदी करतो. यामुळे उत्पादकांना मोठ्या प्रमाणात नफा मिळण्यास मदत होते. 

मासे खरेदीतून चांगले पैसे
मत्स्यबीज व्यवसाय परिसरातील शेतकरी व आदिवासी बांधवांना चांगले उत्पन्न मिळावे, तसेच बर्फातले मासे खाण्यापेक्षा ताजे, जिवंत व प्रदूषणविरहित मासे खाण्यात आनंद ग्राहक व्यक्त करतात. मत्स्यबीज विक्री व मासे खरेदीतून चांगले पैसे मिळतात, असे महल्हारवाडी ता. नांदगाव येथील मत्स्यबीज सप्लायर बापू जाधव यांनी सांगितले.


चार ते पाच लाखांचे उत्पन्न
मला व माझ्या कुटुंबाला एक वेळचे जेवण मिळत नव्हते. परंतु मत्स्यव्यवसाय करून आज माझ्याजवळ ऊस वाहण्यासाठी दोन ट्रक, दोन ट्रॅक्टर, ऊसतोडणीसाठी दहा मजुरांच्या दहा टोळ्या आहेत. आजही तीन ते चार धरणांचा लिलाव घेतला असून, त्यातून माशांपासून चार ते पाच लाखांचे उत्पन्न मिळणार असल्याचे नांदगाव येथील मत्स्य सोसायटीच्या संगीता वाघ यांनी सांगितले.

रिपोर्ट - भगवान हिरे

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com