यंत्रमागधारकांना दिवाळीत उलाढाल वाढीची अपेक्षा! गुजरात-राजस्थानमधील प्रोसेसिंग युनिट सुरू  

गोकुळ खैरनार
Thursday, 8 October 2020

कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात मालेगावच्या मुस्लिम बहुल भागात शिरकाव केला. त्यामुळे जवळपास तीन महिने यंत्रमागाचा खडखडाट बंद होता. या उद्योगावर राज्यातील जवळपास पंधरा लाख कामगार बेरोजगार झाले होते. यंत्रमागाचा खडखडाट सुरू झाल्यानंतर कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निकाली निघाला. यंत्रमागाचे उत्पादन होत असतानाच बाजारपेठा बंद असल्याने मालाला उठाव नव्हता.

मालेगाव (जि.नाशिक)  : लॉकडाउनमुळे बंद झालेल्या यंत्रमागाचा खडखडाट सुरू झाल्यानंतर आता गुजरात, राजस्थान व मुंबईतील या उद्योगावरील प्रोसेसिंग युनिट सुरू झाल्यामुळे उद्योगाला मोठा दिलासा मिळाला. नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने होणार असला तरी कापड उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू असून, यंत्रमागधारकांना दिवाळीतील उलाढालीची अपेक्षा आहे. दिवाळीत कपड्यांचा बाजार फुलला तर या उद्योगापुढचे मोठे संकट दूर होणार आहे. 

पंधरा लाख कामगार बेरोजगार झाले होते
राज्यातील मालेगाव, भिवंडी, इचलकरंजी व सोलापूर येथील यंत्रमाग व्यवसाय लॉकडाउनमुळे डबघाईस आला होता. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात मालेगावच्या मुस्लिम बहुल भागात शिरकाव केला. त्यामुळे जवळपास तीन महिने यंत्रमागाचा खडखडाट बंद होता. या उद्योगावर राज्यातील जवळपास पंधरा लाख कामगार बेरोजगार झाले होते. यंत्रमागाचा खडखडाट सुरू झाल्यानंतर कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निकाली निघाला. यंत्रमागाचे उत्पादन होत असतानाच बाजारपेठा बंद असल्याने मालाला उठाव नव्हता. त्यातच यंत्रमागावरील गुजरात, राजस्थान व मुंबईतील प्रोसेसिंग युनिट बंद असल्याने कापड गुदामात पडले होते. 

गुजरात-राजस्थानमधील प्रोसेसिंग युनिट सुरू 
मालेगावातील दोन लाख यंत्रमागावरील कापड प्रोसेसिंगसाठी राजस्थानातील पाली, बालोत्रा व जेधपूर, तसेच गुजरातमधील सुरत व अहमदाबाद येथे जातो. भिवंडीतील कापडाची प्रोसेसिंग मुंबईला होते. प्रोसेसिंग युनिट सुरू न झाल्याने यंत्रमागावरील कापडाचे उत्पादन बंद करावे लागले असते. महिन्यापासून सर्वच प्रोसेसिंग युनिट सुरू झाल्याने मोठे संकट टळले आहे. सध्या कापड बाजारात बऱ्यापैकी व्यवहार होऊ लागले आहेत. नवरात्र ते दिवाळी हा कापड उद्योगाचा महत्त्वाचा सिझन असतो. नवरात्र साध्या पद्धतीने होत असला तरी दिवाळीत खरेदीची धूम नक्कीच दिसून येईल. दिवाळीच्या खरेदीतून गुदामातील माल कमी होईल. तसेच उलाढालीतून या व्यवसायाला उभारी मिळेल, अशी अपेक्षा यंत्रमागधारक बाळगून आहेत. 

हेही वाचा > चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा

लाखो मजुरांनाही बऱ्यापैकी काम मिळू लागले
राज्यातील सर्वच भागातील यंत्रमाग सुरू आहेत. मालेगावात ८० टक्के, सोलापूरमधील ७० टक्के, तर भिवंडी व इचलकरंजीमधील ६० टक्के यंत्रमाग सुरू आहेत. मजुरांच्या रोजीरोटीसाठी काही ठिकाणी आठवड्यातील चार ते पाच दिवस उत्पादन घेतले जाते. कोरोना परिस्थितीवर मात करून यंत्रमाग उद्योग पुन्हा उभारी घेत आहे. यंत्रमाग कामगारांखेरीज या व्यवसायावर अलंबून असलेल्या इतर लाखो मजुरांनाही बऱ्यापैकी काम मिळू लागले आहे. 

हेही वाचा >  भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी
 
प्रोसेसिंग युनिट सुरू झाल्यामुळे मालाचे उत्पादन वाढत आहे. शासन हळूहळू निर्बंध उठवित आहे. दिवाळीत कापड बाजारांमध्ये गर्दी वाढली तर उत्पादीत माल विक्री होऊन व्यवसाय पूर्वपदावर येण्यास मदत होईल. -युसूफ इलियास, अध्यक्ष, मालेगाव पॉवरलूम ॲक्शन कमिटी  

संपादन - भीमराव चव्हाण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Machine owners expect turnover growth on Diwali malegaon nashik marathi news