
नाशिक : सध्या कोरोनामुळे पर्यटन क्षेत्र सर्वाधिक प्रभावी झालेले असले, तरी जगभरात सर्वांत झपाट्याने वाढलेल्या क्षेत्रांपैकी हे एक क्षेत्र आहे. अगदी टूर मॅनेजर, टुरिस्ट गाइडपासून अन्य विविध स्तरांवर या क्षेत्रात करिअरचे पर्याय उपलब्ध आहेत. फिरण्याची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना पर्यटनाच्या संधींसोबत चांगले करिअर घडविता येऊ शकते. पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी शिक्षण उपलब्ध असून, पर्यटनाशी संलग्न शाखांतून नोकरी, व्यवसायाचे पर्याय उपलब्ध आहेत.
संलग्न शाखांतून नोकरी, व्यवसायाचे पर्याय उपलब्ध
पर्यटनाची व्याप्ती वाढण्यासह या क्षेत्राला कॉर्पोरेट स्वरूप प्राप्त झालेले आहे. अनेक नामांकित कंपन्यांकडून देश-विदेशातील टूर नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जातात. कसलीही चिंता न करता केवळ पर्यटनाचा मनमुराद आनंद घेण्याची संधी नागरिकांना यातून मिळत असल्याने टुर्सला चांगला प्रतिसाद मिळत असतो. या टूरच्या संयोजनापासून विविध पातळ्यांवर नोकरीच्या संधी आहेत. शिवाय स्वतःचा ट्रॅव्हल्स, टुरिझमचा व्यवसायदेखील सुरू करता येऊ शकतो. नाशिकच्या एचपीटी, केटीएचएम, एसएमआरके, मेट भुजबळ नॉलेज सिटी यांसह यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, तसेच खासगी टूर कंपन्यांकडून शिक्षणक्रम राबविला जातो. पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी स्तरावरील शिक्षणाचे पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत.
प्रात्यक्षिकांवर आधारित शिक्षणक्रम
ट्रॅव्हल ॲन्ड टुरिझम क्षेत्रातील शिक्षणक्रमात प्रात्यक्षिकांवर आधारित अभ्यासक्रम असल्याने प्रत्यक्ष भेटींचे आयोजन केले जात असते. टूरचे व्यवस्थापन व नियोजन, ऐतिहासिक स्थळांचे महत्त्व, भौगोलिक ज्ञानासह विद्यार्थ्यांना विविध स्थळांच्या परिचयासह शास्त्रीय दृष्टिकोन शिकविला जातो. अगदी भूगोल विभागातर्फे जीपीएसवर आधारित शिक्षणक्रमदेखील उपलब्ध आहे. उच्च शिक्षणाचे पर्यायदेखील उपलब्ध आहेत.
आयटा, आयआयटीटीएममध्ये शिक्षणाची संधी
ट्रॅव्हल ॲन्ड टुरिझमचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी आयटा (आयएटीए) अंतर्गत एव्हिएशन क्षेत्रात करिअर घडवू शकतात. एअर होस्टेजपासून ऑपरेशन मॅनेजमेंट क्षेत्रात करिअरचा पर्याय याद्वारे खुला होतो. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल ॲन्ड टुरिझम मॅनेजमेंट (आयआयटीटीएम) या राष्ट्रीय स्तरावरील इन्स्टिट्यूटमध्ये अगदी पदविकेपासून पीएच.डी.पर्यंत शिक्षणाचा मार्ग खुला आहे.
नाशिकमध्ये धार्मिक पर्यटनासह ॲग्री टुरिझम, वाइन टुरिझम या नावीन्यपूर्ण शाखांमध्ये करिअरच्या संधी निर्माण झालेल्या आहेत. पदविका अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांवर आधारित शिक्षण देत असल्याने विद्यार्थ्यांना नोकरी, व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतात. अन्य शिक्षणासोबत पदविका शिक्षण घेता येऊ शकते. पूर्णपणे पर्यटन क्षेत्राचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर पदवीपर्यंतचे विकल्प उपलब्ध आहेत. - रामनाथ रावळ, सहाय्यक प्राध्यापक तथा समन्वयक, ट्रॅव्हल ॲन्ड टुरिझम कोर्स, केटीएचएम महाविद्यालय
संपादन - किशोरी वाघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.