Mission Admission : एमपीएससीतून शासकीय सेवेत व्‍हा दाखल; पदवीनंतर 'हे' पर्याय उपलब्ध

make a career through mpsc exams nashik marathi news
make a career through mpsc exams nashik marathi news

नाशिक : सध्या कोरोनाच्‍या काळात शासकीय सेवेत महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडताना अधिकारी-कर्मचारी वर्ग अहोरात्र मेहनत घेत आहेत. शासकीय सेवेत चांगले करिअर करण्यासह समाजसेवेची संधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपलब्‍ध होत असते. पदवी शिक्षणानंतर आयोगाच्‍या परीक्षांचा मार्ग खुला होत असला, तरी खूप आधीपासून तयारी करणे महत्त्वाचे ठरते. जिल्‍हास्‍तरावरही ‘क’ प्रवर्गावर भरतीची संधी उपलब्‍ध आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध परीक्षा घेतल्‍या जातात. यापैकी राज्‍यसेवा परीक्षा सर्वांत महत्त्वाची समजली जाते. या माध्यमातून उपजिल्‍हाधिकारी, डीवायएसपी, जिल्‍हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार अशा १८ ते २० पदांसाठी ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी कुठल्‍याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी प्रविष्ट होऊ शकतो. याशिवाय महाराष्ट्र वनसेवा परीक्षेला विज्ञान शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांना संधी असते. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेला अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर उमेदवार प्रविष्ट होऊ शकतात. याशिवाय एमपीएससीतर्फे पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय), सहाय्यक विक्रीकर निरीक्षक (एसटीआय), सहाय्यक कक्ष अधिकारी (एएसओ) अशा विविध पदांसाठीही परीक्षा घेतली जाते. 

 
वयोमर्यादा अन्‌ शिक्षणक्रमाची माहिती 

एमपीएससीतर्फे घेतल्‍या जाणाऱ्या परीक्षांना प्रविष्ट होण्यासाठी किमान १९ वर्षे तर कमाल ३८ वर्षे (खुल्‍या वर्गासाठी), ४३ वर्षे (इतर राखीव प्रवर्गासाठी) अशी वयाची मर्यादा असते. या परीक्षांतील प्रयत्‍नांना कुठल्‍याही स्‍वरूपाची मर्यादा नसल्‍याने वयाच्‍या पात्रतेनुसार उमेदवार कितीही वेळा परीक्षा देऊ शकतात. पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशा साधारणतः तीन महत्त्वाच्‍या टप्प्यांमध्ये निवड प्रक्रिया पार पडते. काही पदांसाठी केवळ पूर्व आणि मुख्य परीक्षेद्वारे निवड केली जाते. तर पीएसआयसारख्या परीक्षेसाठी मैदानावरील कामगिरीदेखील महत्त्वाची ठरते. या परीक्षेसाठी साधारणतः आधुनिक भारताचा इतिहास, भूगोल, भारतीय राज्‍यघटना व राजकारण, भारतीय अर्थव्‍यवस्‍था यांसह सामान्‍य ज्ञान, चालू घडामोडी, पर्यावरण आदी विषयांचा समावेश असतो. तसेच राष्ट्रीय पातळीवरील व राज्‍याशी संबंधित अभ्यासक्रम असा समतोल साधलेला असतो. 

 
जिल्‍हापातळीवर भरतीची संधी 

जिल्‍हाधिकाऱ्यांच्‍या अध्यक्षतेखाली जिल्‍हा निवड मंडळातर्फेही तृतीय श्रेणीतील पदांची भरती होते. यात प्रामुख्याने ग्रामसेवक, तलाठी, लिपिक, पर्यवेक्षक, शिपाई आदी पदांचा समावेश असतो. जिल्‍हास्‍तरावर ही स्‍पर्धा होत असल्‍याने तुलनेने स्‍पर्धकांची संख्या कमी असते. 

कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर शासकीय क्षेत्रातून कशा प्रकारे जबाबदारी निभावता येऊ शकते, याचा अनुभव सर्वांनी घेतला. स्‍पर्धा परीक्षांतून शासकीय सेवेत भरती होताना समाजासाठी काहीतरी करण्याची संधी उमेदवारांना उपलब्‍ध होते. सध्याच्‍या काळात सरकारी नोकरीकडे करिअरचा सुरक्षित पर्याय म्‍हणून पाहिले जात आहे. स्‍पर्धा परीक्षांना सामोरे जाताना योग्‍य नियोजन, मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते. 
- प्रा. राम खैरनार, संचालक, युनिव्‍हर्सल फाउंडेशन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com