'नियोजन व अंमजबजाणीतून पल्स पोलिओ मोहिम यशस्वी करा' - उपजिल्हाधिकारी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

उपजिल्हाधिकारी अंतुर्लीकर पुढे म्हणाले, जिल्ह्यात 01 नोव्हेंबर 2020 रोजी  राबविण्यता येणाऱ्या  उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा हा तिसरा टप्पा आहे.

नाशिक : जिल्ह्यात उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम 01 नोव्हेंबर 2020 रोजी राबविण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेच्या शंभर टक्के यशस्वीतेसाठी सुयोग्य नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांनी केले. आज सकाळी 10 वाजता जिल्हास्तरीय समन्वय समितीने आयोजित केलेल्या दूरदृष्यप्रणालीद्वारे  झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

या वेळी जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. रविंद्र चौधरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, जागतिक आरोग्य संघटनेचे, वरिष्ट आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश नांदापूरकर व नाशिक जिल्हा, वरिष्ट आरोग्य अधिकारी डॉ. मोहम्मद अब्दुल हाजिम अझहर, मालेगांव महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ सपना ठाकरे व आरोग्य विभागाच्य डॉ.अलका भावसार आदी दूरदृष्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीसाठी उपस्थित होते.

खबरदारी घेवून लसीकरण

उपजिल्हाधिकारी अंतुर्लीकर पुढे म्हणाले, जिल्ह्यात 01 नोव्हेंबर 2020 रोजी  राबविण्यता येणाऱ्या  उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा हा तिसरा टप्पा आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आरोग्य यंत्रणा, पोलिओ बुथ कर्मचारी, अंगणवाडी  व आशा  कर्मचारी यांनी योग्य समन्वय ठेवणे गरजेचे आहे. कोविड -19 नियमांचे पालन करून प्रत्येक पोलिओ लसीकरण बुथवर एकाच वेळी गर्दी होणार नाही याची खबरदारी घेवून व सामाजिक अंतराचे पालन करावे. बुथवर मास्क, हॅण्डवॉश, सॅनिटाझर यांची पुरेशी व्यवस्था ठेवावी अशा सूचना अंतुर्लीकर यांनी यावेळी दिल्या आहेत.

हेही वाचा > दुर्दैवी! शेतातील ती भातकापणी ठरली शेवटची; तरुण शेतकरीच्या बातमीने गाव हळहळले

समाज प्रबोधन होणे गरजेचे

डॉ. प्रकाश नांदापूरकर यांनी या मोहिमेची माहिती देतांना सांगितले की, ज्याप्रमाणे भारतात कोरोना विषाणूचा प्रसार हा अन्य देशातून झाला आहे. त्याचप्रमाणे पोलिओचे प्रमाण पाकिस्तान व अफगाणिस्थान या देशात जास्त प्रमाणात असून या देशातून भारतात याचा शिरकाव होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे पोलिओचे समूळ निर्मूलन करणे हाच या पोलीओ लसीकरण मोहिमेचा उद्देश आहे. भारताच्या तिन्ही सिमारेषेंवर सुध्दा टिम तैनात करण्यात आल्या आहेत. 01 नोव्हेंबर 2020, रोजी राबविण्यात येणाऱ्या पोलिओ लसीकरण मोहिमेत मालेगाव तालुका व मालेगांव मनपा कार्यक्षेत्रातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. मालेगांव शहरात बहुतेक नागरिक हे धार्मिक रूढी व योग्य माहितीच्या अभावामुळे बालकांना लसीकरण करून घेण्यास तयार होत नाहीत. त्यासाठी समाज प्रबोधन होणे गरजेचे आहे. यासाठी मुस्लिम धर्मगुरूंमार्फत हे प्रबोधन झाल्यास ही मोहिम प्रभावीपणे पार पडेल असा विश्वास डॉ. नांदापूरकर यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा > भररस्त्यात थरार! गळ्याला लावली तलवार आणि घेतले पाच लाख; नागरिकांत दहशत

यावेळी मालेगाव तालुका व मालेगाव महानगरपालिका यांचा या मोहिमेच्या पुर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी मालेगांव महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. अलका भावसार यांनी सांगितले की, मालेगांव शहरातील पोलिओ लसीकरण घटीचे प्रमाण कमी करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत ही मोहिम पोहचविण्याचे दृष्टीने टिमद्वारे घरोघरी जाऊन लसीकरणाचे जनजागृती करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका व आशा कर्मचारी यांना देखील या मोहिमेत सहभागी करून घरोघरी भेटींद्वारे नवजात बालकांच्या जन्मांची नोंदणी करण्यात आली आहे व होर्डीग्ज, पोस्टर्स व बॅनर्सद्वारे सुध्दी  या लसीकरण मोहिमेची जनजागृती करण्यात असल्याचे डॉ.अलका भावसार यांनी सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make the Pulse Polio Campaign a success through planning and implementation