मालेगावत वर्षभरात आगीच्या तब्बल २१० दुर्घटना; सव्वादोन कोटीच्या मालमत्तेची रांखरांगोळी

malegaon fire.jpg
malegaon fire.jpg

मालेगाव (नाशिक) : शहर व परिसरात जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या काळात आगीच्या २१० दुर्घटना घडल्या. यात तब्बल दोन कोटी दहा लाख ८५ हजार रुपयांच्या मालमत्तेची हानी झाली. महापालिका अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे जीवितहानी मात्र झाली नाही. अग्निशमन दलाला विविध आगींच्या दुर्घटनांमध्ये १४ कोटींची मालमत्ता वाचविण्यात यश आले. 

सव्वादोन कोटीच्या मालमत्तेची हानी 

मेशी (ता. देवळा) बस दुर्घटनेत मनपा अग्निशमन दलाने मोलाची कामगिरी बजावली. या भीषण दुर्घटनेने जानेवारी २०२० ची सुरवात झाली. शहरातील रमजानपुरा व नागछाप झोपडपट्टी या नागरी वस्तीला लागलेल्या आगीच्या घटना चिंताजनक होत्या. शहर व परिसरातील विविध दुर्घटनांमध्ये ४० व्यक्ती मृत्युमूखी पडल्या. विविध धरणे, तलाव यात बुडालेल्या अनेकांचे अग्निशमन दलाच्या जवानांनी प्राण वाचविले. येथील रमजानपुरा व नागछाप झोपडपट्टीत लागलेल्या आगीनंतर अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली. या दुर्घटनांमुळे शहरातील अतिक्रमणांची समस्या पुन्हा ‘आ’ वासून उभी राहिली आहे. 

त्याक्षणी कर्मचारी सामान्य नागरिकांच्या रोषाचे बळी

शहराचा कॅन्सर समजला जाणारा हा दुर्धर विकार दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने हातात हात घालून काम करणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांचीही यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती असायला हवी. मुळातच शहरात अतिक्रमण पाय पसरवित असताना अधिकारी ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करीत असल्याची टीका सातत्याने होत आहे. २५ हजार विद्यार्थ्यांच्या मोर्चासह अतिक्रमण हटविण्यासाठी शेकडो आंदोलने झाली. त्याचे फलीत मात्र शून्य आहे. आगीची दुर्घटना घडल्यानंतर अतिक्रमणांमुळे घटनास्थळी पोचण्यास अग्निशमन बंबांना पोचण्यास विलंब झाला. अशावेळी कर्मचारी सामान्य नागरिकांच्या रोषाचे बळी ठरतात. 

एप्रिलमध्ये तब्बल ४१ प्रकार घडले

मार्च व उन्हाळ्याच्या सुरवातीला शहरात आगीच्या सर्वाधिक दुर्घटना घडल्या. एप्रिलमध्ये तब्बल ४१ प्रकार घडले. जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत आगीच्या अवघ्या २० घटना घडल्या. शहरातील १३४ झोपडपट्ट्यांमध्ये लहान-मोठ्या आग विझवितांना अरुंद रस्त्यांमुळे अनेक प्रश्‍न निर्माण होतात. विलंबामुळे वित्त व जीवितहानी वाढण्याची भीती असते. अग्निशमन दलाने ५५ ठिकाणी बचावकार्यात सहभाग घेतला. चार ठिकाणी बंदोबस्तकामी सहकार्य केले. कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला असताना औषध फवारणीसाठी ४४ वेळा अग्निशमन दलाने आरोग्य व स्वच्छता विभागाला सहकार्य करत कोरोनायोद्ध्यांची भूमिका पार पाडली. 

अग्निशमन दलाने वाचविलेली मालमत्ता सातपट अधिक 

या वर्षभरात अग्निशमन विभागाला एकही बोगस कॉल आला नाही, ही समाधानाची बाब आहे. वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये झालेल्या नुकसानीच्या तुलनेत अग्निशमन दलाने वाचविलेली मालमत्ता सातपट अधिक आहे. त्यावरूनच या दलाची कामगिरी अधोरेखित होते. प्रतिकूल परिस्थितीत व मोजक्या साधनसामग्रीत उल्लेखनीय काम करून अग्निशमन दलाने विविध पुरस्कार मिळविले आहेत. त्या मुळे अग्निशमन अधीक्षक संजय पवार व त्यांचे सहकारी गौरवास पात्र ठरले आहेत. 

२०२० मध्ये दरमहा घडलेल्या आगीच्या दुर्घटनांची संख्या अशी 

जानेवारी - १३ 
फेब्रुवारी - २० 
मार्च - ३४ 
एप्रिल - ४१ 
मे - ३७ 
जून - आठ 
जुलै - दोन 
ऑगस्ट - चार 
सप्टेंबर - सहा 
ऑक्टोबर - १७ 
नोव्हेंबर - १८ 
डिसेंबर - दहा 

एकूण - २१० दुर्घटना  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com