
नाशिक : कोरोना संसर्गाचा आणखी एक प्रकार समोर आल्यानंतर नाशिक शहरात ब्रिटनमधून आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांची चाचणी घेतली असतानाच शनिवारी (ता. २६) स्कॉटलंडहून परतलेला एक प्रवासी बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे नाशिककरांची धडधड वाढली आहे. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करतानाच संबंधिताचा स्वॅब पुणे येथील एनआयव्ही लॅबकडे पाठविण्यात आला असून, जेनेटिक्स मॅपिंगदेखील केले जाणार आहे.
नाशिक शहर व जिल्ह्यात परतले १२१ प्रवासी
जिल्हा प्रशासनाकडे ब्रिटनहून आलेल्या नागरिकांची यादी पाठवून स्वॅब टेस्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या. २५ नोव्हेंबरपासून १२१ प्रवासी नाशिक शहर व जिल्ह्यात परतले आहेत. त्यात शहरात ९६, तर ग्रामीण भागात २१ प्रवाशांचा समावेश आहे. गेल्या १३ डिसेंबरला स्कॉटलंडहून नाशिकमध्ये परतलेल्या एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी (ता. २५) संबंधिताची तपासणी करण्यात आली. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोरोना-२ चा विषाणू तपासण्यासाठी पुणे येथील नॅशनल व्हायरॉलॉजी इन्स्टिट्यूट (एनआयव्ही)कडे जेनेटिक मॅपिंगसाठी स्वॅब पाठविण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीला आईकडून संसर्ग झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
४९ प्रवाशांची स्वॅब तपासणी
ब्रिटनहून परतलेल्या ९६ नागरिकांची यादी महापालिकेला प्राप्त झाली असून, भ्रमणध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे. शुक्रवारपासून संपर्कात आलेल्या ४९ जणांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. त्यांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाही. रविवार (ता. २७)पर्यंत अहवाल मिळतील, असे पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले.
स्कॉटलंडहून परतलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला असून, जेनेटिक मॅपिंगसाठी स्वॅब पाठविण्यात आला आहे. या तपासणीत कोरोनाचा नवा प्रकार तपासला जाणार आहे.
-डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका
संपर्क साधण्याचे आवाहन
कोरोना विषाणूमध्ये झालेल्या जनुकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे विशेष सर्वेक्षण केले जात असून, २५ नोव्हेंबरनंतर ब्रिटनहून परतलेल्या नागरिकांनी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे. जे प्रवासी नाशिकमध्ये २८ दिवसांपेक्षा अधिक काळ झालेला आहे ते वगळून इतरांनी आरटीपीसीआर चाचणी करावी. स्वतःहून नाशिक महापालिकेशी संपर्क साधावा.
दोन दिवसांत सहा मृत्यू
दरम्यान, जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत ५३३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६३१ आहे. सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २५) दिवसभरात २३५ कोरोनाबाधित आढळले. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या २९८ होती. शनिवारी (ता. २६) दिवसभरात २९८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३३३ होती. या दोन दिवसांत सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात तीन शहरातील, तर तीन रुग्ण नाशिक ग्रामीण भागातील आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.