Marathi Sahitya Sammelan : संमेलन नाशिककरांचे की मित्रपरिवाराचे? यजमानांमध्ये फुटले विसंवादाचे धुमारे!

महेंद्र महाजन
Saturday, 30 January 2021

संमेलनाच्या तयारीसाठी उत्सुक असलेल्यांपैकी काही माणसं तोडायला सुरवात झाली आहे. त्याबद्दलची कसलीही फिकीर यजमानांमध्ये पाहायला मिळत नाही. त्यामुळे तयारीच्या अनुषंगाने साहित्यातील ‘नाट्य’चा उघडलेला पडदा कुठलं नाट्य पुढे आणणार? असा प्रश्‍न नाशिककरांना भेडसावू लागला आहे.

नाशिक : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीच्यादृष्टीने आजवर जाहीर झालेल्या स्वागत, मार्गदर्शक अन्‌ सल्लागार समितीच्यापुढे संमेलनाशी नाशिककरांना जोडून घेण्याच्या दिशेने पाऊल पडताना दिसत नाही. एवढेच नव्हे, तर विश्‍वस्तपदाच्या अनुषंगाने यजमानांमध्ये विसंवादाचे धुमारे फुटले आहेत. संमेलनाच्या तयारीसाठी उत्सुक असलेल्यांपैकी काही माणसं तोडायला सुरवात झाली आहे. त्याबद्दलची कसलीही फिकीर यजमानांमध्ये पाहायला मिळत नाही. त्यामुळे तयारीच्या अनुषंगाने साहित्यातील ‘नाट्य’चा उघडलेला पडदा कुठलं नाट्य पुढे आणणार? असा प्रश्‍न नाशिककरांना भेडसावू लागला आहे. 

संमेलन नाशिककरांचे की मित्रपरिवाराचे?
स्वागताध्यक्ष पालकमंत्री छगन भुजबळ तीन दिवस नाशिकमध्ये मुक्कामी आहेत. त्यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. ३१) सकाळी अकराला गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आवारात संमेलन आयोजकांची बैठक होत आहे. मुळातच, संमेलनाच्या तयारीला सुरवात झाली आणि ‘सकाळ’मधून साहित्यातील ‘नाट्य’ ही वृत्तमालिका प्रसिद्ध होऊ लागल्याने नाशिककरांपुढे ‘मेरी आवाज सुनो’चे किस्से येऊ लागले आहेत. जो भेटेल, जसे सुचेल तशी माहिती देण्याच्या ‘कार्यक्रम’मधून नाशिकच्या सामाजिक जीवनात कार्यरत असलेल्यांची सुटका झालेली नाही. विश्‍वस्त असल्याबद्दल सांगण्यात आले असताना त्यांचे कार्यकारी मंडळात नाव नसल्याची बाब लपून राहिलेली नाही. स्वाभाविकपणे एकेक माणूस तोडण्याच्या ‘कार्यक्रम’मधून यजमानांमध्ये सक्रिय असलेल्यांमध्ये अस्वस्थता वाढीस लागली आहे. त्याबद्दल शहरात खुलेआम चर्चा सुरू आहे. 

नाशिककर थबकलेत 
संमेलनाच्या तयारीला वेग देत मायमराठीचा उत्सव कुसुमाग्रज, प्रा. वसंत कानेटकर, ज्येष्ठ साहित्यिक बाबूराव बागूल, लोककवी वामनदादा कर्डक आदींच्या नगरीत झोकात व्हायला हवा, अशी भावना नाशिककरांमध्ये निर्माण होऊ लागली होती. मात्र, त्यात काहीसा मिठाचा खडा पडल्याची बाब प्रकर्षाने साहित्य वर्तुळात होऊ लागलेल्या चर्चेमुळे पाहायला मिळू लागली आहे. संमेलनासाठी देणगी देण्यासाठी कोणत्या बँकेतील खात्यात पैसे जमा करायचे? अशी विचारणा करणारे लघुसंदेश यजमानांपर्यंत पोचवण्यात आले होते. त्यास उत्तर दिले गेले नाही. तोपर्यंत नाशिककरांनी उत्स्फूर्तपणे धनादेश जमा करण्यास सुरवात केली. हा उत्साह कायम वाढत राहील, यासाठी नाशिककरांना हे संमेलन आपले आहे, असे वाटण्यासाठी खटाटोप होणे अपेक्षित होते.

नाशिक महापालिकेकडून तेवढ्याच निधीची अपेक्षा

शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संमेलनासाठी ५० लाखांचा निधी जाहीर केल्याबद्दलचा आनंदभाव नाशिककरांमध्ये आहे. काही जणांनी सोशल मीडियातून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. इतरांच्या वाट्याला मात्र आभार आले नाहीत. अशातच, संमेलनाच्या अनुषंगाने बँकेत खाते उघडल्याची माहिती संमेलनाच्या कार्यालयातून पोचवण्यास सुरवात झाली. सायंकाळपर्यंत कार्यालयातून शहरवासीयांपर्यंत दोन बँकांमध्ये खाते उघडल्याचा निरोप पोचला होता. सरकारचा निधी जाहीर व्हायला आणि बँकेत खाते उघडल्याची माहिती धाडण्यास सुरवात होण्यास ‘योगायोग’ म्हणावे लागेल. सरकारकडून पन्नास लाख मिळणार म्हटल्यावर नाशिक महापालिकेकडून तेवढ्याच निधीची अपेक्षा केली गेली, तर त्यात वावगे ठरणार नाही. परंतु महापौर सतीश कुलकर्णी यांनी स्थळपाहणी केलेल्या दिवशी उपस्थितांपैकी काहींनी चर्चेवेळी महापालिका तीन लाखांपर्यंत निधी देऊ शकते, अशी माहिती दिली होती. 

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

सरकारचा निधी नेमका कोणाकडे जाणार? 
राज्य सरकारने ५० लाखांचा निधी जाहीर केला आहे. मात्र हा निधी नेमका कोणाकडे जाणार? याबद्दलची उत्सुकता नाशिककरांमध्ये आहे. त्याचअनुषंगाने यापूर्वीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीत सक्रिय सहभागी असलेल्यांकडून माहिती घेण्यात आली. त्यानुसार राज्य सरकारचा निधी यजमानांकडे दिला जातो. तसे घडण्यातून निधी संकलनाला हातभार लागणार आहे. लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष तथा संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी यापूर्वी पै न पैचा विनियोग करण्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे. 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Sahitya Sammelan nashik marathi news