esakal | Marathi Sahitya Sammelan : सारस्वतांच्या मेळ्याचे चोख नियोजन; कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडी निघणार 
sakal

बोलून बातमी शोधा

sahitya sammelan 123.jpg

नाशिकमध्ये होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी लोकहितवादी मंडळाकडून तयारी सुरू आहे. तीनदिवसीय सारस्वतांच्या मेळ्याचे चोख नियोजन करण्यात येत आहे.

Marathi Sahitya Sammelan : सारस्वतांच्या मेळ्याचे चोख नियोजन; कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडी निघणार 

sakal_logo
By
तुषार महाले

नाशिक : नाशिकमध्ये होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी लोकहितवादी मंडळाकडून तयारी सुरू आहे. तीनदिवसीय सारस्वतांच्या मेळ्याचे चोख नियोजन करण्यात येत आहे. संमेलनात उद्‌घाटनपासून ते समारोपापर्यंत विविध कार्यक्रमांची मेजवानी आलेल्या सारस्वत पाहुण्यांना मिळणार आहे. 

तीनदिवसीय सारस्वतांच्या मेळ्याचे चोख नियोजन
मराठी साहित्य संमेलनाची सुरवात २६ मार्चला सकाळी कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून निघणाऱ्या ग्रंथदिंडीपासून होईल. दुपारी चारला ध्वजारोहण व त्यानंतर मावळते संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्‌घाटन होईल. त्यानंतर संमेलनाचा मुख्य कार्यक्रम होईल. सायंकाळी ‘कवीकट्टा’ हे निमंत्रित कवींचे संमेलन गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कुसुमाग्रज सभागृहात होणार आहे. २७ मार्चला सकाळी लेखक/प्रकाशक यांची मुलाखत, संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांचा सन्मान आदी कार्यक्रमांनंतर कथाकथन, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम होतील. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणातील कँटीनसमोर बालकवी कट्टा, बालसाहित्य मेळाव्याचे संयोजन करण्यात येईल. याच परिसरात ग्रंथप्रदर्शन होणार असून, ३०० स्टॉलचे नियोजन करण्यात आले आहे. 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

नाशिकच्या साहित्यिकांसाठी पुस्तक प्रदर्शन
दरम्यान, संमेलनातील काही परिसंवाद महाविद्यालयाच्या बंदिस्त सभागृहात घेण्याचे नियोजन करण्यात येत असून, मुख्य परिसंवाद मुख्य सभागृहात होतील. संमेलनात बोली भाषेचा कट्टा असावा, असे प्रयत्न संयोजकांकडून सुरू आहेत. नाशिकच्या साहित्यिकांसाठी पुस्तक प्रदर्शन होणार आहे. चित्रकला, शिल्पकलाचे प्रदर्शन संमेलनात भरविण्यात येणार आहे. २८ मार्चला ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप होईल. 

भुजबळ नॉलेज सिटी, संदीप फाउंडेशनचे सहकार्य 
मराठी साहित्य संमेलनात २०० प्रमुख साहित्यिक, ६०० प्रतिनिधी, तसेच ४०० माध्यम प्रतिनिधी सहभागी होतील, असा अंदाज असून, त्यांच्या निवास, भोजनाची व्यवस्था भुजबळ नॉलेज सिटी व संदीप फाउंडेशनच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. तसेच, शहरातील हॉटेल व्यवस्थापनांशीही बोलणी सुरू आहे. शहरातील मंगल कार्यालये, लॉन्स असोसिएशच्या पदाधिकाऱ्यांनी निवास व्यवस्थेसंदर्भात सकारात्मकता दर्शवली आहे. तसेच जिल्ह्यातील विविध संस्थांकडून संमेलनासाठी सहकार्य मिळत असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले. 

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

संमेलनाच्या प्रांगणात तीन प्रवेशद्वार 
गोखले एज्युकेशन संस्थेच्या प्रांगणात तीन प्रवेशद्वार असतील. त्यातील मुख्य प्रवेशद्वार एचपीटी महाविद्यालयाचे असून, ते ‘व्हीआयपी’साठी असेल, दुसरे प्रवेशद्वार बीवायके महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालयाचे असेल. तर येवलेकर मळा परिसरातील मोकळ्या भूखंडाचा वापर चारचाकी, दुचाकी पार्किंगसाठी करण्यात येईल. तसेच, संमेलनासाठी आलेल्या पाहुण्यांसाठी नाशिकदर्शनसाठी बस उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचनाही पुढे आली आहे.