नाशिककरांना मास्क वापरणे बंधनकारक; अन्यथा भरावा लागेल 'इतका' दंड

विक्रांत मते
Tuesday, 15 September 2020

मुख्य बाजारपेठेतील दुकानदारांनीही शारीरिक अंतर ठेवून हॅन्डग्लोज, मास्क व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. अन्यथा त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 

नाशिक : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिक गर्दीच्या ठिकाणी काळजी घेत नसल्याचे निदर्शनास येत असल्याने महापौर सतीश कुलकर्णी यांनी मास्क बंधनकारक केले आहे. जे लोक नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर मुख्य बाजारपेठेतील दुकानदारांनीही शारीरिक अंतर ठेवून हॅन्डग्लोज, मास्क व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. अन्यथा त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 

उपमहापौर भिकूबाई बागूल व राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार यांनी मंगळवारी (ता. १५) महासभेवर कोविडबाबत उपाययोजना व ज्येष्ठ नगरसेवक म्हणून सूचना देण्यासाठी लक्षवेधी मांडली. श्रीमती बागूल यांनी खासगी डॉक्टर मानधनावर नियुक्त करावे, बंद पडलेली कारखाने, मंगल कार्यालयांमध्ये कोविड सेंटर सुरू करावे, बिटको रुग्णालयातील सीटी स्कॅन मशिन सुरू करावे, तसेच शहरात संसर्गजन्य आजाराचे सुसज्ज रुग्णालय असावे, अशी मागणी केली.  शेलार यांनी खासगी रुग्णालयांमध्ये ८० टक्के बेडवर रुग्ण दाखल करताना महापालिकेच्या माध्यमातून भरती करण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी डॉक्टरांची सुसज्ज फळी निर्माण करण्याच्या सूचना केल्या. गुरुमित बग्गा यांनी सामाजिक दायित्वाच्या निधीतून फंड जमा करण्यासाठी दात्यांची बैठक घ्यावी, तपासणी वाढवावी, कोविडनंतर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयारी ठेवावी, शाळांचे शुल्क कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, तसेच ठक्कर डोमचे रुग्णालयात रूपांतर करण्याच्या सूचना केल्या. सुधाकर बडगुजर, दिनकर आढाव, श्‍याम बडोदे, डॉ. हेमलता पाटील, शाहू खैरे, अजिंक्य साने, सुषमा पगारे, वर्षा भालेराव, राहुल दिवे आदींनी कोविडबाबत प्रशासनाला सूचना केल्या. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

आढाव्यासाठी दोन वैद्यकीय अधिकारी 

रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट वाढविताना पॉझिटिव्ह आढळल्यास आरटीपीसीआर टेस्ट न करता त्यावर तातडीने उपचार सुरू करणार आहे. कोरोनाचे सौम्य लक्षणे आढळलेल्या व्यक्तींची आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक केली जाणार आहे. महापालिका व खासगी रुग्णालयांचा दैनंदिन आढावा घेण्यासाठी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. कोरोनाबाधित क्षेत्राचे निर्जंतुकीकरण करणे, नगरसेवकांनी जनहितार्थ होर्डिंग लावणे, ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याच्या सूचना महापौर कुलकर्णी यांनी दिल्या. 

आयुक्तांकडून ‘माझे नाशिक, निरोगी नाशिक’ 

नवनियुक्त आयुक्त कैलास जाधव यांनी पहिल्याच महासभेत नगरसेवकांच्या सूचनांची दखल घेण्याचे आश्‍वासन देत कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी नगरसेवक व प्रशासन समन्वयाने काम करेल, अशी ग्वाही दिली. कोरोना प्रतिबंधासाठी शासनाच्या निर्देशानुसार ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत ‘माझे नाशिक, निरोगी नाशिक’ हा उपक्रमही हाती घेण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: masks are mandatory for everyone in nashik city nashik marathi