मोसम नदीमधील रक्तमिश्रित पाणी थांबवा! रामसेतूजवळ ठिय्या आंदोलन

प्रमोद सावंत
Saturday, 8 August 2020

नदीपात्रात मांसाचे तुकडे रक्तमिश्रित व दर्पयुक्त पाणी येताना आढळल्यानंतर बोरसे व सहकाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. सात वर्षांपासून ते याप्रश्‍नी लढा देत आहेत.

नाशिक/मालेगाव : महापालिका क्षेत्रातील मोसम नदीपात्रात सर्रासपणे रक्तमिश्रित व सांडपाणी वाहून मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होत आहे. हेच पाणी गिरणा धरणाला जाऊन मिळते. प्रशासन या प्रश्‍नावर निष्क्रिय असल्याने शहरातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. रक्तमिश्रित व सांडपाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, यासाठी सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांनी बुधवारी (ता.५) रामसेतूजवळ नदीपात्रानजीक ठिय्या आंदोलन केले. 

सात वर्षांपासून याप्रश्‍नी लढा

बकरी ईदच्या काळात रक्तमिश्रित पाण्याचा प्रवाह वाढतो. या वेळी बकरी ईदला तात्पुरते कत्तलखाने उभारण्यात न आल्याने हे प्रमाण वाढले होते. यातच नदीपात्रात मांसाचे तुकडे रक्तमिश्रित व दर्पयुक्त पाणी येताना आढळल्यानंतर श्री. बोरसे व सहकाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.
 सात वर्षांपासून श्री. बोरसे याप्रश्‍नी लढा देत आहेत. 

हेही वाचा > नांदगाव हादरले...एकाच कुटुंबातील सर्वांची निघृण हत्या; मोठी खळबळ

नदी प्रदूषणाकडे दुर्लक्ष

नदी प्रदूषणाकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असून, हा प्रकार शहरवासीयांच्या जिविताशी खेळण्यासारखा असल्याचा आरोप श्री. बोरसे यांनी केला. आंदोलनाची माहिती मिळताच उपायुक्त नितीन कापडणीस, सहाय्यक आयुक्त तथा स्वच्छता विभागप्रमुख अनिल पारखे, पोलिस निरीक्षक प्रवीण वाडिले यांनी श्री. बोरसे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
उपायुक्त कापडणीस यांच्या आश्‍वासनानंतर श्री. बोरसे यांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान, यापूर्वी बकरी ईदलाच रक्तमिश्रित पाण्यासंदर्भात उपाययोजना न केल्याने श्री. बोरसे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या वेळी पोलिस प्रशासनाने त्यांना कोरोना संसर्ग व जमावबंदी लागू असल्याने आंदोलन करू नये, यासाठी प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती. 
श्री. बोरसे यांनी २८ जुलै ते ४ ऑगस्ट यादरम्यान रोज धरणे आंदोलनाची परवानगी मागितली होती. त्या वेळी पोलिसांनी महापालिका अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून हा प्रश्‍न मार्गी लावावा, असे पत्र देतानाच आंदोलन करण्यास प्रतिबंध केला होता.

हेही वाचा : दुर्दैवी! खर्च करूनही हाती काहीच नाही; विवंचनेने ग्रासलेल्या शेतकऱ्याची अखेर हिम्मत सुटलीच

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mausam river pollution agitation near ramsetu malegaon marathi news