वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या परीक्षा २४ फेब्रुवारीपासून; परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

अरुण मलाणी
Monday, 11 January 2021

सर्व संलग्‍न महाविद्यालयांचे अधिष्ठाता, संचालक, प्राचार्यांना यासंदर्भात पत्र पाठवत परीक्षा अर्ज (एक्‍झाम फॉर्म) भरण्याची प्रक्रिया सुरू असल्‍याचे कळविले आहे. कोविड-१९ आजाराच्‍या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठ हिवाळी-२०२० च्‍या पदवी अभ्यासक्रमांच्‍या परीक्षा दोन टप्प्‍यात घेण्याचे नियोजित आहे.

नाशिक : कोरोनाच्‍या प्रादुर्भावानंतर परिस्‍थिती पूर्वपदावर येत असताना, विविध परीक्षांच्‍या‍ तारखा जाहीर होत आहेत. महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठानेदेखील हिवाळी- २०२० सत्राच्‍या परीक्षांच्‍या संभाव्‍य तारखा जाहीर केल्‍या आहेत. त्‍यानुसार पदवी अभ्यासक्रमाची अंतिम वर्षाची परीक्षा २४ फेब्रुवारीपासून घेतली जाणार आहे. तर, दुसऱ्या टप्प्‍यात प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाच्‍या तसेच, पदव्‍युत्तर अभ्यासक्रमांचे लेखी पेपर २३ मार्चपासून सुरू होतील. सध्या परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

लेखी परीक्षा २३ मार्चपासून घेतल्‍या जाणार

महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठातर्फे हिवाळी-२०२० लेखी परीक्षेबाबतची माहिती असलेली पुस्‍तिका संकेतस्‍थळावर जारी केली आहे. सर्व संलग्‍न महाविद्यालयांचे अधिष्ठाता, संचालक, प्राचार्यांना यासंदर्भात पत्र पाठवत परीक्षा अर्ज (एक्‍झाम फॉर्म) भरण्याची प्रक्रिया सुरू असल्‍याचे कळविले आहे. कोविड-१९ आजाराच्‍या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठ हिवाळी-२०२० च्‍या पदवी अभ्यासक्रमांच्‍या परीक्षा दोन टप्प्‍यात घेण्याचे नियोजित आहे. यात पहिल्‍या टप्प्‍यात अंतिम वर्ष पदवी परीक्षा २४ फेब्रुवारीपासून सुरू होतील. तर प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष पदवी परीक्षा आणि विद्यापीठ अभ्यासक्रम (पदवी व पदव्‍युत्तर) लेखी परीक्षा २३ मार्चपासून घेतल्‍या जाणार आहेत. 

अर्ज भरण्यासाठी अशी आहे मुदत 

पदवी अभ्यासक्रमाच्‍या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना नियमित शुल्‍कासह परीक्षा अर्ज भरण्यासाठी २१ जानेवारीपर्यंत, विलंब शुल्‍कासह २८ जानेवारीपर्यंत, तर अतिरिक्‍त विलंब शुल्‍कासह ४ फेब्रुवारीपर्यंत पात्र विद्यार्थी अर्ज भरू शकतील. प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षातील पदवीच्‍या तसेच, अन्‍य पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्‍या विद्यार्थ्यांना नियमित शुल्‍कासह २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येईल. विलंब शुल्‍कासह २७ फेब्रुवारी तर, अतिरिक्‍त विलंब शुल्‍कासह ६ जानेवारीपर्यंत परीक्षा अर्ज भरता येणार आहे. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

प्रथम वर्षाची परीक्षा 
यापूर्वीच्‍या विद्यार्थ्यांसाठी 

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्‍यामुळे अशा विद्यार्थ्यांच्‍या परीक्षेचे वेळापत्रक नंतर स्‍वतंत्रपणे जाहीर केले जाईल. सध्या विद्यापीठाने जाहीर केलेल्‍या वेळापत्रकात प्रथम वर्षाचाही समावेश आहे. यापूर्वी प्रवेश घेतलेल्‍या व प्रथम वर्षात अनुत्तीर्ण किंवा काही विषयांत अनुत्तीर्ण असलेल्‍या विद्यार्थ्यांसाठी हिवाळी-२०२० सत्रात प्रथम वर्षाच्‍या परीक्षा घेतल्‍या जात असल्‍याचे जाणकारांनी सांगितले.

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Of medical courses Winter examination from 24th February nashik marathi news