चाळीसहून अधिक वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून कामावर येण्यास नकार; वैद्यकीय विभागाची कोंडी

विक्रांत मते
Saturday, 19 September 2020

डॉक्टरांना व वॉर्डबॉय, आयांसाठी देण्यात आलेले वेतन यात मोठी तफावत असून, कोविड रुग्ण हाताळण्याचे काम करणाऱ्यांना कमी वेतन मिळत असल्याचा आरोप करताना चाळीसहून अधिक वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कामावर येण्यास नकार दिला आहे.

नाशिक : कोविडच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेची आरोग्य व वैद्यकीय सेवा भक्कम करण्याच्या उद्देशाने मानधनावर नियुक्त केलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी वेतन व जोखमीचा ताळमेळ मांडत कामास नकार दिल्याने वैद्यकीय विभागाची कोंडी झाली आहे. डॉक्टरांना व वॉर्डबॉय, आयांसाठी देण्यात आलेले वेतन यात मोठी तफावत असून, कोविड रुग्ण हाताळण्याचे काम करणाऱ्यांना कमी वेतन मिळत असल्याचा आरोप करताना चाळीसहून अधिक वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कामावर येण्यास नकार दिला आहे.

मानधन परवडत नसल्याचा आरोप; वैद्यकीय विभागाची कोंडी

एप्रिलमध्ये शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर मेअखेरपर्यंत रुग्णसंख्या सातत्याने वाढत गेली. जुलै व ऑगस्टमध्ये कोरोनाचा स्फोट झाल्याने नाशिक शहर कोरोनाचा हॉटस्पॉटमध्ये आले. आता रुग्णसंख्या ४० हजारांपार पोचण्याची शक्यता आहे. रुग्णसंख्या वाढताना महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता होती. भविष्यात रुग्णसंख्या अधिक वाढणार असल्याचा अंदाज लावून तात्पुरत्या स्वरूपात पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. वॉर्डबॉय, फार्मासिस्ट, आयुष, फिजिशियन, लॅब टेक्निशियन, रेडिओलॉजिस्ट अशा १५ पदांसाठी ८४९ उमेदवार भरण्याची तयारी महापालिकेने केली. यातील ५५५ जागा भरण्यात आल्या; परंतु तांत्रिक पदांचे वेतन व वॉर्डबॉय, आयांचे वेतन यात मोठा फरक आहे. मानधनावर सात हजार रुपये वॉर्डबॉयसाठी, तर फिजिशियनसह अन्य तांत्रिक पदांसाठी दोन ते तीन लाख रुपये वेतन दिले जात असल्याने वाद निर्माण झाला आहे. कोविड रुग्णांना ॲम्ब्युलन्समधून ने-आण करण्यापासून ते कोविडमुळे मृत व्यक्तीला वॉर्डबॉयला हाताळावे लागत असल्याने सर्वाधिक जोखमीचे काम करूनही वेतन कमी, त्याशिवाय १२ तास ड्यूटी करावी लागत असल्याने महापालिकेचे मानधन परवडत नसल्याची भावना व्यक्त करत चाळीसहून अधिक वॉर्डबॉयनी काम करण्यास नकार दिला आहे.

 

चाळीसच्यावर वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून कामावर येण्यास नकार

वैद्यकीय विभागात एकूण ८४९ पदांसाठी जाहिरात काढण्यात आली होती. त्यातील ५५५ पदे भरण्यात आली असून, त्यांपैकी ५२६ कामावर हजर आहेत. कामास कोणी नकार दिला असेल तर प्रशासनापर्यंत अद्याप माहिती आलेली नाही.-डॉ. प्रवीण अष्टीकर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

 

संपादन : रमेश चौधरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: medical staff refusal come to work nashik marathi news