आठवणीतील अयोध्या : जेव्हा शिवसैनिकांच्या चैतन्याने भारावला होता ‘शरयू’चा काठ.. नाशिकमधील शिवसैनिकांची कार्यक्रमात छाप

विक्रांत मते
Wednesday, 5 August 2020

पहिल्या वर्षी स्पेशल रेल्वे अयोध्येकडे रवाना झाली. त्यात एक हजार ६०० शिवसैनिक सहभागी झाले होते, तर दुसऱ्या वर्षी बसचे नियोजन करताना शरयू महाआरतीच्या कार्यक्रमात नाशिकमधील शिवसैनिकांची छाप दिसून आली. 

नाशिक : अयोध्येत श्रीराम मंदिर झालेच पाहिजे, अशी ठाम भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या रथयात्रेला त्या वेळी शिवसैनिकांची कुमक मिळाली. एकीकडे आठ दिवस अगोदर नियोजन करताना नाशिकमधून अधिकाधिक शिवसैनिकांना अयोध्येत नेण्यासाठीच्या नियोजनाची जबाबदारीदेखील टाकली होती. पहिल्या वर्षी स्पेशल रेल्वे अयोध्येकडे रवाना झाली. त्यात एक हजार ६०० शिवसैनिक सहभागी झाले होते, तर दुसऱ्या वर्षी बसचे नियोजन करताना शरयू महाआरतीच्या कार्यक्रमात नाशिकमधील शिवसैनिकांची छाप दिसून आली. 

महाआरतीवर नाशिकची छाप 

बाबरी मशिद ढासळल्यानंतर माझ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे, असे सांगणाऱ्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने दोन वर्षांपासून अयोध्येतील शरयू नदीच्या किनारी महाआरती करून श्रीराम मंदिराच्या मुद्याला कायम हवा दिली आहे. दोन वर्षांपासून शिवसेनेकडून शरयू नदीच्या किनारी रामलल्लाची आरती केली जाते. शिवसेनेची ही महाआरती संपूर्ण देशात कायम चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे नाशिक शिवसेनेकडेच महाआरतीचे नियोजन करण्याची जबाबदारी असल्याने अयोध्येत श्रीराम मंदिराची मुहूर्तमेढ रोवली जात असताना नाशिकच्या शिवसैनिकांना त्याचा अभिमान वाटत आहे. 

नियोजनासाठी नाशिकची टीम 
प्रभू श्रीरामचंद्राचे नाशिकच्या पंचवटीत वास्तव्य असल्याने नाशिकला पौराणिक काळापासून महत्त्व आहे. आजही त्याचा संदर्भ नाशिकमधील प्रत्येकाच्या जीवनाशी आहे. म्हणूनच शिवसेनेतर्फे अयोध्येत महाआरतीचा कार्यक्रम करताना नाशिकमधील शिवसैनिकांकडेच जबाबदारी सोपविली जाते. फेब्रुवारी २०१८ मध्ये शिवसेनेने अयोध्येत महाआरतीचा कार्यक्रम घोषित केला. त्यावेळी नियोजनासाठी टीम तयार करण्यात आली. शिवसेनेचे नाशिकचे संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे व माजी सभागृहनेते सुधाकर बडगुजर यांचा त्यात समावेश हहोता. नदीची आरती, आरतीची पंचागानुसार वेळ, शासकीय परवानग्या, व्हीआयपी नेत्यांच्या वास्तव्याचे नियोजन, साधू-महंतांना निमंत्रणे, पुजारी आदीबाबतचे नियोजन महाआरतीच्या आठ दिवस आधी करण्यात आले. शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर मिळालेले समाधान आयुष्यभर विसरता येणार नसल्याचे श्री. बोरस्ते यांनी सांगितले. पहिल्या वर्षाचे यशस्वी नियोजन झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणजे मार्च २०१९ मध्ये पुन्हा याचप्रमाणे नियोजनाची जबाबदारी नाशिकच्या टीमवर सोपविण्यात आली होती. 

रिपोर्ट - विक्रांत मते

संपादन - ज्योती देवरे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: memories of ayodhya of maha aarti nashik shivsainik nashik marathi news