दूध दरवाढ आंदोलन : महायुतीतर्फे ‘मातोश्री’वर पाठवली जाणार पाच लाख पत्रे 

महेंद्र महाजन
Wednesday, 12 August 2020

दुधाची दरवाढ न केल्याच्या निषेधार्थ घरात अथवा गोठ्यांमध्ये बसून सरकारचा निषेध करायचा, अशी आंदोलनाची हाक मंगळवारी (ता. ११) महायुतीतर्फे देण्यात आली

नाशिक : दुधाची दरवाढ न केल्याच्या निषेधार्थ घरात अथवा गोठ्यांमध्ये बसून सरकारचा निषेध करायचा, अशी आंदोलनाची हाक मंगळवारी (ता. ११) महायुतीतर्फे देण्यात आली. तसेच, १३ ते १८ ऑगस्ट या कालावधीत दूध उत्पादकांच्या मागण्यांसंबंधी पाच लाख पत्रे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी पाठविण्यात येणार आहेत. माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

दूध आंदोलन आणखी तीव्र

दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी महायुतीतर्फे दोनदा आंदोलन करण्यात आले. पण, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीची पर्वा न करता शेतकऱ्यांच्या समस्यांकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. मात्र, महायुतीतले घटक पक्ष शांत बसणार नाहीत. शेतकरीबांधवांना असे वाऱ्यावर सोडणार नाही. जोपर्यंत त्यांना अनुदान मिळत नाही तोपर्यंत लढण्यासाठी हे दूध आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय आजच्या महायुतीच्या बैठकीत घेण्यात आला, असे खोत म्हणाले.

यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत, शिवसंग्राम संघटनेचे आमदार विनायक मेटे आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अविनाश महातेकर, भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे ऑनलाइन बैठकीसाठी उपस्थित होते. 

हेही वाचा > क्रूर नियती! "बाबा..तुमच्या दशक्रियेला नाही येऊ शकले..म्हणून तुमच्याकडेच आले" वडिलांमागे लेकीचीही अंत्ययात्रा

 दूध उत्पादकांच्या मागण्या 
- शेतकऱ्यांना लिटरला दहा रुपये अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे 
- दूध भुकटीच्या निर्यातीसाठी किलोला ५० रुपये अनुदान द्यावे 
- अथवा राज्य सरकारने गायीचे दूध ३० रुपये लिटरप्रमाणे खरेदी करावे

हेही वाचा >  थरारक! नांदगाव हत्याकांडाने जाग्या केल्या सुपडू पाटील हत्याकांडच्या स्मृती..आजही ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: milk agitation mahayuti will send five lakh letters to matoshree nashik marathi news