कांदा निर्यातबंदी होताच तासाभरात लाखोंचं नुकसान; केंद्रच्या भुमिकेने शेतकरी संतप्त

एस. डी. आहीरे
Monday, 14 September 2020

पिंपळगाव बाजार समितीत सोमवारी उन्हाळ कांद्याच्या दरात जोरदार तेजी आली. तब्बल ४ हजार २५ रूपये कमाल तर सरासरी तीन हजार रूपये प्रति क्विंटल असा वर्षभरानंतर विक्रमी दर कांद्याला मिळाला. सुमारे चौदा हजार क्विंटल आवक झाली. मात्र दरवाढीने केंद्र शासनाच्या पोटात गोळा आला आहे.

पिंपळगाव बसवंत : कांद्याने सोमवारी (ता.१४) पिंपळगाव बाजार समितीत चार हजार रूपये प्रतिक्विंटल असा आकर्षक भाव खाल्ला असताना केंद्र शासनाच्या डोळ्यांतही बाब खुपलेली दिसते. बांग्लादेशच्या सीमेवर व मुंबईच्या जे.एन.पी.टी बंदरावर होणारी निर्यात तुर्त थांबविली आहे. त्यामुळे १८ हजार टन कांदा निर्यातीअभावी खोळंबला आहे. कांद्याची निर्यात रोखुन दर आवाक्यात ठेवण्याचा निर्णय केंद्र शासन घेण्याच्या पवित्र्यात असल्याने त्याचा दबाव दुपारच्या सत्रात कांदा लिलावावर झाला. तासाभरात एक हजार रूपयांनी दर कोसळले असुन तीन हजार रूपये क्विंटलपर्यंत घसरले. केंद्र शासनाच्या भुमिकेने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

निर्यातबंदीच्या जोखंडात कांदा अडकवला 

पिंपळगाव बाजार समितीत सोमवारी उन्हाळ कांद्याच्या दरात जोरदार तेजी आली. तब्बल ४ हजार २५ रूपये कमाल तर सरासरी तीन हजार रूपये प्रति क्विंटल असा वर्षभरानंतर विक्रमी दर कांद्याला मिळाला. सुमारे चौदा हजार क्विंटल आवक झाली. मात्र दरवाढीने केंद्र शासनाच्या पोटात गोळा आला आहे. सकाळच्या सत्रात आलेली जोरदार तेजी रोखण्यासाठी केंद्र शासनाच्या वाणीज्य विभागाने फतवा काढत पुढील आदेश येईपर्यंत कांद्याची निर्यात थांबविण्याचे कळविले. त्यामुळे दोन दिवसांपासुन दुबई, कोलंबो, मलेशिया येथे मुंबईच्या जे.एन.पी.टी बंदरावर १२ हजार टन कांदा परदेशात पोहचण्यापुर्वीच रोखला गेला. अशीच स्थिती बांग्लादेश सिमेवर असुन तेथे ३०० ट्रक थांबविल्याने सहा टन कांदा पडुन आहे. सुमारे ५० कोटी रूपयांच्या कांद्याचा खोळंबल्याने कांदा व्यापारी दबावात आले असुन त्यांनी निर्यातीसाठी लागणाऱ्या कांद्याची पॅंकीग थांबविली आहे.केंद्र शासन दर वाढ रोखण्यासाठी एमईपी वाढविते की थेट निर्यातबंदीच्या जोखंडात कांद्या अडकविते याकडे नजरा खिळल्या आहेत. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश

तासाभरात २५ लाखांचे नुकसान 

पुढील आदेश येईपर्यंत कांद्याची निर्यात थांबविण्याचा निर्णय येताच पिंपळगाव बाजार समितीतील शेतकऱ्यांमध्ये एकच खबराट उडाली. सरासरी तीन हजार रूपयांचे दर ही बातमी धडकताच व्यापारी दबावाखाली आले. त्यात पाचशे रूपये प्रतिक्विंटलने कांदा गडगडला. सकाळी अकरानंतर पाच हजार क्विंटलची आवक झाली. तासाभरात कोसळलेल्या दरामुळे शेतकऱ्यांचे २५ लाख रूपयांचे नुकसान झाले. 

तरी कांद्याचे दर दहा हजारचा टप्पा  गाठणार

दरम्यान, कर्नाटक, बेळगाव यासह साऊथमध्ये मुसळधार पावसाने तेथील कांद्याच्या पिकाची नासाडी केली. त्यात फक्त नाशिक, नगर, मध्यप्रदेश येथेच कांद्याची मध्यम प्रमाणात आवक सुरू असल्याने देशासह परदेशाला कांदा पुरविण्याची भिस्त आहे. त्यामुळे दरात उसळी आली आहे. नव्याने येणारा लाल कांदा अतिवृष्टीमुळे महिनाभर उशीराने म्हणजे डिसेंबरमध्ये दाखल होण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे केंद्र शासनाने कितीही प्रयत्न केले तरी कांद्याचे दर गत वर्षाप्रमाणे पुन्हा दहा हजार रूपये प्रतिक्विंटलचा टप्पा गाठु शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. हे गृहित धरून पिंपळगाव शहर व परराज्यातुन आलेल्या व्यापारी कांदा साठवणुकीवर भर देत आहेत. 
 
परराज्यात कांद्याच्या पिकाची नासाडी झाली आहे. फक्त महाराष्ट्र व मध्यप्रदेशमध्ये कांदा शिल्लक असुन देशांसह परदेशांला कांदा पुरविण्यात मालाचा तुटवडा होत आहे. त्यामुळे दराला झळाळी आली आहे. नव्याने कांदा दाखल होण्यास विलंब व उन्हाळ कांद्याचा तुटवडा यामुळे दरातील तेजी रोखणे अशक्य आहे. 
- अतुल शाह, दिनेश बागरेचा (कांदा निर्यातदार) 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

 
महिन्याभरापुर्वी कांदा ७०० रूपये क्विंटलने विकला गेला तेव्हा केद्र शासन झोपले होतेका? शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू लागले की लगेच हस्तक्षेप करायचा. कांदा उत्पादकांवरील असा अन्याय केल्यास रस्त्यावर उतरावे लागेल. 
- अर्जुन गांगुर्डे (शेतकरी, निंबाळे, ता. चांदवड). 

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Millions lost in an hour after onion export was banned nashik marathi news