पोलिस रस्त्यावर दिसला.. तरच नागरिक-पोलिसातील दुरावा कमी होईल

vishwas-nangre-patil-nashik_.jpg
vishwas-nangre-patil-nashik_.jpg

नाशिक : पोलिस आयुक्तालय हद्दीतील अनेक पोलिस चौक्‍या अधिकाऱ्यांच्या बदलत्या धोरणांमुळे अडगळीत गेल्या होत्या. याच पोलिस चौक्‍या आता पुन्हा नव्याने उभ्या राहत असून, मिनी पोलिस ठाणे म्हणून नावारूपाला येत आहेत. आधुनिकीकरण केलेल्या 60 पोलिस चौक्‍याच आता गुन्हेगारांवर फास आवळण्याच्या भूमिका बजावणार आहेत. 

पोलिस चौक्‍यांच्या पुनरुज्जीवनाने गुन्हेगारांवर फास 

शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत 13 पोलिस ठाणी आहेत. वाढते नागरीकरण व विस्तारीकरणामुळे पोलिस ठाणे हद्दीच्या एका बाजूला पडल्याने पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना गस्तीला अडचणीचे होते. शहरात यापूर्वीही सुमारे 35-40 पोलिस चौक्‍या होत्या; परंतु कलानुरूप त्यांच्यात कोणताही बदल न झाल्याने आणि नित्याने बदलणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या धोरणांमळे त्या अडगळीत गेल्या होत्या. बहुतेक चौक्‍यांची जागा परिसरातील टवाळखोरांनी बळकावली होती. अशोक स्तंभ येथील मल्हारखाण पोलिस चौकीजवळ अनेकदा गंभीर गुन्हेगारी घटनाही घडल्या होत्या. त्यामुळे अनेकदा नागरिकांची पोलिस चौक्‍या सुरू करण्याची मागणी होत होती. आयुक्तालयाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी पोलिस चौक्‍यांचे पुनरुज्जीवन करण्याचे काम हाती घेतले. यातून पोलिस चौक्‍या म्हणजे मिनी पोलिस ठाणे, अशी भूमिका घेत त्यादृष्टीने शहरात 60 पोलिस चौक्‍या उभ्या राहत आहेत. 

चौकी नव्हे मिनी पोलिस ठाणे 
पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या तीन-चार बीट मिळून एका पोलिस चौकीची निर्मिती केली. त्यामुळे तक्रारदारास पोलिस ठाण्यांऐवजी चौकीत पोचणे सोपे झाले. घडलेल्या गुन्ह्याची जबाबदारी त्या-त्या चौकीच्या प्रमुखावर आहे. जुन्या पोलिस चौक्‍यांचे नूतनीकरण केले तर सिंहस्थात उभारलेल्या, मात्र त्यानंतर पडून असलेल्या पोलिस चौक्‍यांचेही सुशोभीकरण झाले आहे. 24 तास सुरू असलेल्या एका चौकीसाठी सहाय्यक निरीक्षक वा उपनिरीक्षकाच्या नेतृत्वाखाली किमान 12 कर्मचाऱ्यांचा ताफा दिला आहे. तसेच चौकीतच बिनतारी संदेशवहन यंत्रणेसह संगणक, अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. 

...त्यामुळे पहिल्या टप्प्यात 60 पोलिस चौक्‍या उभ्या केल्या
पोलिस रस्त्यावर दिसला तरच नागरिक-पोलिसातील दुरावा कमी होईल. पोलिस चौक्‍या बसण्यासाठी नव्हे, तर त्या नागरिकांच्या सोयीसाठी असतात. तसेच गुन्हेगारांना रोखण्यासाठी चौक्‍या अत्यंत उपयुक्त ठरतात. त्यामुळे पहिल्या टप्प्यात 60 पोलिस चौक्‍या उभ्या केल्या आहेत. आगामी काळात त्यात आणखी वाढ होईल. - विश्‍वास नांगरे-पाटील, पोलिस आयुक्त 

नक्की बघा > PHOTOS : सहनशीलतेची हद्द पार..ज्येष्ठ रुग्णाचा पाहिला अंत.. रुग्णालय सामान्यांसाठी की धनदांडग्यांसाठी?

आकडेवारी बोलते 
- पोलिस आयुक्तालयातील मनुष्यबळ : सुमारे 3,200 
- 13 पोलिस ठाणी : 60 पोलिस चौक्‍या 
- एका पोलिस ठाण्यांतर्गत : पाच पोलिस चौक्‍या 

एका पोलिस चौकींतर्गत 
- सहाय्यक निरीक्षक वा उपनिरीक्षक, 15 पोलिस कर्मचारी 
- तीन बीटमार्शल - तीन शिफ्टमध्ये (सहा कर्मचारी) 
- एका शिफ्टमधील एक दुचाकी किमान 75 किलोमीटरचे पेट्रोलिंग बंधनकारक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com