जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी चौदाशेहून अधिक कोरोना रुग्ण; बरे झाले ५६२

अरुण मलाणी
Wednesday, 9 September 2020

बुधवारी आढळलेल्‍या एक हजार ४१९ बाधितांमध्ये नाशिक शहरातील ९७२, नाशिक ग्रामीण ४१३, मालेगावचे ३४ रुग्ण आहेत. बरे झालेल्‍या ५६२ रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील २३०, ग्रामीणचे २६२, मालेगावचे ६७, तर जिल्‍हाबाह्य तीन रुग्णांचा समावेश आहे.

नाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी चौदाशेहून अधिक नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. बुधवारी (ता. ९) दिवसभरात एक हजार ४१९ बाधित आढळल्‍याने एकूण बाधितांची संख्या ४७ हजार ७४४ झाली आहे. ५६२ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या ३७ हजार ६३९ झाली आहे. तर अठरा रुग्‍णांचा मृत्‍यू झाल्‍याने मृतांची संख्या ९९१ झाली आहे. 

बुधवारी आढळलेल्‍या एक हजार ४१९ बाधितांमध्ये नाशिक शहरातील ९७२, नाशिक ग्रामीण ४१३, मालेगावचे ३४ रुग्ण आहेत. बरे झालेल्‍या ५६२ रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील २३०, ग्रामीणचे २६२, मालेगावचे ६७, तर जिल्‍हाबाह्य तीन रुग्णांचा समावेश आहे. तसेच, अठरा मृत्‍यूंमध्ये शहरातील नऊ, नाशिक ग्रामीणचे आठ व मालेगाव महापालिका हद्दीतील एक रुग्ण आहे.

संशयित रुग्‍ण देखील लक्षणीय

दिवसभरात संशयित रुग्‍णांची संख्यादेखील लक्षणीय राहिली. नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार १७४, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात १९९, मालेगाव महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ३६, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात ३१, जिल्‍हा रुग्‍णालयात १३ संशयित दाखल झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ९५० अहवाल प्रलंबित होते. त्‍यापैकी एक हजार ३६९ अहवाल नाशिक ग्रामीणमधील आहेत. दरम्‍यान, आतापर्यंत जिल्ह्यात एक लाख ६१ हजार ७६३ संशयित रुग्‍णांचे स्‍वॅब तपासण्यात आले आहेत. यापैकी ४७ हजार ७४४ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले असून, हे प्रमाण २९.५१ टक्‍के आहे. एक लाख १२ हजार ६९ रुग्‍णांचे अहवाल निगेटिव्‍ह आले असून, हे प्रमाण ६९.२८ टक्‍के आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

येवल्यात तीन रुग्णांचा मृत्यू 

येवला : दिवसभरात तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने येवलावासीयांची चिंता वाढली आहे. अंदरसूल येथील ६० वर्षीय पुरुष, उंदीरवाडी येथील ६२ वर्षीय पुरुष आणि भुलेगाव येथील ५० वर्षीय पुरुषाचा बुधवारी मृत्यू झाला. त्यापैकी दोघांवर नाशिकला जिल्हा रुग्णालयात, तर एका रुग्णावर कोकमठाण (ता. कोपरगाव) येथील आत्मा मलिक रुग्णालयात उपचार सुरू होते. शहर व तालुक्यातील कोरोनाबळींची संख्या आता ३६ झाली आहे. दरम्यान, नव्याने १३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात बुरुड गल्ली, पटेल कॉलनी व विठ्ठलनगर येथील प्रत्येकी एक, अनकाई व उंदीरवाडी येथील प्रत्येकी दोन, अंदरसूल येथील तीन, तर सावरगाव, सायगाव, वाघाळे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. येथील एकूण रुग्णसंख्या ४५२ झाली असून, ३२५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. उर्वरित ९२ जण उपचार घेत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी सांगितले. 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

मालेगावमध्ये ३९ पॉझिटिव्ह 

मालेगाव : शहर व तालुक्यात बुधवारी ३९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले, तर एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये शहरातील ३४, तर ग्रामीण भागातील पाच रुग्णांचा समावेश आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ७४ वरून ७६.२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. गृहविलगीकरण व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्यांसह एकूण रुग्णांची संख्या ६४८ आहे. आज नव्याने ३५ रुग्ण दाखल झाले. दोनशे अहवाल प्रलंबित आहेत.  
 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: more than 14 hundred new patient found in nashik marathi news