ड्यूटीला न जाणे पडले महागात! शंभरपेक्षा जास्त दांडीबहाद्दर चालक-वाहकांचे निलंबन

st 2_3.jpg
st 2_3.jpg

येवला (नाशिक) : राज्यभरातून मुंबईत राज्य परिवहन महामंडळाच्या बससह चालक-वाहकांना प्रवाशांच्या वाहतुकीच्या सेवेसाठी पाठविले जात आहे. मात्र, कोरोनाची भीती व अन्य कारणांमुळे दांड्या मारणाऱ्या जवळपास शंभरावर चालक-वाहकांवर जिल्ह्यात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

भीतीपोटी ड्यूटी करण्यास धजावत नसल्याचे प्रकार सुरू

मुंबईत लोकल सुरू असली, तरी काही निकषांमुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. परिणामी, बेस्टची वाहतूक सेवा अपुरी पडत असल्याने बेस्ट व परिवहन महामंडळात करार झाला असून, राज्यातील अनेक बससह चालक-वाहक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यातूनही प्रत्येक आगारातून दहा दिवसांसाठी ४० ते ४५ जणांची टीम आलटूनपालटून मुंबईला ड्यूटीसाठी पाठविली जाते. मात्र, येवल्यासह अन्य तालुक्यांत मुंबईहून परतल्यानंतर काही कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अनेक जण भीतीपोटी ड्यूटी करण्यास धजावत नसल्याचे प्रकार सुरू आहेत. याशिवाय अन्य कारणांमुळे, तर काहींनी कुठलीही अडचण नसतानाही दांड्या मारल्याचे एसटी प्रशासनाचे म्हणणे आहे.

येवल्यातील तीन वाहक व चार चालकांवर कारवाई

अशा पार्श्‍वभूमीवर मनमाड, सिन्नर, इगतपुरी, लासलगाव, सटाणा, येवला, नांदगाव आदी आगारांतील शंभरावर कर्मचाऱ्यांवर त्या-त्या आगारप्रमुखांनी निलंबनाची कारवाई केली आहे. यातही गंभीर बाब म्हणजे यातील काही जण मुंबई तर सोडाच; परंतु स्थानिक ड्यूटीसाठीदेखील हजर झाले नाहीत. त्यामुळे ही कारवाई झाली आहे. येवला आगारातही तीन वाहक व चार चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. कर्मचारी संघटनांचा मात्र या कारवाईला विरोध असून, आमच्या अडचणी समजून न घेता निलंबनाची कारवाई केल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

पाच कर्मचारी पुन्हा बाधित

प्रासंगिक करारानुसार राज्य परिवहन महामंडळाच्या येवला आगारातील बेस्टच्या कामगिरीसाठी पाठविलेल्या आणखी पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. प्रत्येक आठवड्याला एसटीच्या येवला आगारातील २० चालक, २० वाहक, दोन वाहतूक नियंत्रक आणि दोन कार्यशाळा कर्मचारी अशा एकूण ४४ कर्मचाऱ्यांना बेस्टच्या कामगिरीवर पाठविण्यात येत आहे. अशाच पद्धतीने बेस्ट बससेवेची कामगिरी आटोपून परतलेल्या येवला आगाराच्या १६ कर्मचाऱ्यांना मागील आठवड्यात कोरोनाची बाधा झाली होती. हे कर्मचारी बरे होऊन घरी परतत नाहीत, तोच आणखी नव्याने सोमवारी पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाची बाधा झालेल्या या पाच कर्मचाऱ्यांमध्ये तीन चालक आणि दोन वाहकांचा समावेश आहे.  

सूचना व संधी देऊनही अनेक जण मुंबई, तसेच स्थानिक पातळीवरही ड्यूटीसाठी हजर झाले नाहीत. यामुळे फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यातून आगाराला लाखो रुपयांचे नुकसान सहन करण्याची वेळ आली. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. एसटी अडचणीत असल्याने कर्मचाऱ्यांनीही समजून घेऊन सेवा द्यावी. - प्रशांत गुंड, आगार व्यवस्थापक, येवला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com