Positive Story : सुई-धाग्याला बनवलं नशिब; नैराश्य झटकून आशाताईं बनल्या इतर महिलांचा आधार!

ज्योती देवरे
Thursday, 10 December 2020

चूल आणि मूल या गर्तेतून बाहेर पडण्यासाठीच्या अनेक अडचणींचा डोंगर पार करताना महिला खचून जातात... प्रसंगी नैराश्‍येमुळे अनेकांना टोकाची भूमिकाही घ्यावी लागते. त्याच वेळी दुसरीकडे याला अनेक महिला अपवादही ठरतात. अशा अनेक महिला आजही "परिस्थिती कधीही कायम राहत नाही' या आत्मविश्‍वासाच्या बळावर स्वतःला सिद्ध करत असतानाच समाजालाही दिशा देत आपली वाटचाल पुढे नेताहेत! यातीलच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे आशाताई कदम.

नाशिक : अनेक महिला आजही "परिस्थिती कधीही कायम राहत नाही' या आत्मविश्‍वासाच्या बळावर स्वतःला सिद्ध करत असतानाच समाजालाही दिशा देत आपली वाटचाल पुढे नेताहेत! यातीलच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे आशाताई कदम. सुईदोरा हेच आयुष्यातील जगण्याचं साधन न ठेवता इतरांसाठी आधार बनत आपल्या कर्तृत्वातून त्यांनी जगाच्या नकाशावर आपलं नाव कोरलंय नव्हे, अक्षरशः बिंबवलयं ! सोशल मिडियाच्या माध्यमातून आशाताईंचे सातासमुद्रापार 25 लाख व्हिवर्स आहेत. यामुळे त्या इतर महिलांसाठी देखील प्रेरणादायी ठरत आहेत. केवळ कुटुंबासाठीच नव्हे, तर आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगाला खंबीरपणे सामोरे जात आशाताई आज महिलांसाठी आधार बनल्या आहेत

घरातील अठराविश्‍वे दारिद्य्राने जगायला शिकवलं.

आशा बाळासाहेब कदम... शिक्षण बारावी, लॅब टेक्‍निशियन... माहेर रवंदा, तर सासर शेवगाव येथील. दोन्ही नगर जिल्ह्यातील. वडील आबासाहेब शंकर बोडके टेलरिंगच्या दुकानात कामाला, तर आई पुष्पाबाई गवंड्याच्या हाताखाली बांधकाम मजूर म्हणून कामाला होत्या. एक मुलगा व एक मुलगी असा परिवार. आशाताई लहानपणापासूनच अभ्यासात हुशार.. मात्र, घरातील अठराविश्‍वे दारिद्य्राने त्यांना जगायला शिकवलं. सातवीत शिकत असताना स्नेहसंमेलनात सहभागाची संधी मिळाली. मात्र, घागरा नसल्याने अडचण होती. त्या वेळी आईने घरातील जुन्या साडीचे दोन तुकडे करत परकर आणि ओढणी शिवून मुलीला प्रोत्साहन दिले. ज्या शाळेच्या बांधकामावर आई मजूर म्हणून काम करत होती, त्याच शाळेच्या व्यासपीठावर मुलीने प्रथम क्रमांक पटकावत स्वतःला सिद्ध केले. त्यातून शिक्षकांनीही मजुरी करणाऱ्या आईला हातातील रेतीची पाटी बाजूला ठेवत व्यासपीठावर बोलावले अन्‌ दोघींचा सत्कार केला... हा क्षण मायलेकींसाठीच नव्हे, तर उपस्थित सर्वांनाच अश्रूंचा बांध रोखून धरायला लावणारा होता.  

हेही वाचा > सह्यांनी केला घात! भाजपवर निवडणुक स्थगितीची नामुष्की; शिवसेनेला आयते उपसभापती पद

एवढीच परीक्षा घेऊन थांबेल ती नियती कसली..? 
आशाताईंना नोकरी करायची इच्छा अन्‌ सामर्थ्य असतानाही, परिस्थितीमुळे लग्नाच्या बोहल्यावर चढावे लागले... दहावी नापास एवढेच शिक्षण असलेले पती बाळासाहेब नाशिकमध्ये खासगी गाडीवर चालक... दरमहा पगार अवघा साडेतीन हजार रुपये... त्यामुळे आर्थिक तोंडमिळवणी करणे अवघड... तशाही परिस्थितीत मुलगा सूरज आणि मुलगी वैष्णवी यांचे संगोपन करताना दमछाक होत असल्याने आशाताईंनी खंबीर होत, शिवणकामाच्या माध्यमातून संसाराला हातभार लावण्याची इच्छा पतीजवळ व्यक्त केली. शिक्षणाच्या बाबतीत पतीपेक्षा एक पाऊल पुढे असलेल्या आशाताईंना त्यांनीही नुसता होकारच नव्हे, तर प्रोत्साहनही दिले. सन 2005 मध्ये नाशिक रोड भागात शिवणकामाचे प्रशिक्षण आणि जुने शिलाईयंत्र विकत घेतले. साड्यांना पिको फॉलद्वारे कामाला सुरवात झाली, तेव्हा पहिल्या दिवसाची कमाई होती 30 रुपये. हीच आशाताईंच्या जीवनाला कलाटणी देणारी घटना ठरली! 
 

हेही वाचा > दुर्दैवी! बहिणीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असतानाच भावाचा अंत; परिसरात हळहळ
 
कलाटणी मिळाली 
पुढे जेल रोड भागात स्वमालकीचे दुकान थाटण्यासाठी आशाताईंनी खूप मेहनत घेतली. पिको फॉलबरोबरच ब्लाऊज शिवण्याचे काम त्या करू लागल्या. आता मात्र त्यांचा व्यवसायात चांगलाच जम बसला आहे. दिवसाकाठी बऱ्यापैकी कमाई होत होती. याच काळात पतीचे काम सुटले. तरीही खचून न जाता त्या बाळासाहेबांना प्रोत्साहन देत स्वतःच आधार बनल्या. बॅंकेच्या सहकार्याने त्यांनी बाळासाहेबांना चारचाकी घेऊन दिली अन्‌ याच काळात "विशूज फॅशन डिझायनिंग' नावाने स्वमालकीचे दुकानही सुरू केले. आर्थिक जम बसत असताना पतीने दिलेली साथ कुटुंबासाठी मोलाची ठरली. या प्रवासात दोघांनीही आपले अर्ध्यावर सुटलेले शिक्षण मुलांच्या निमित्ताने पुढे नेले. त्यांना काहीही कमी पडणार नाही यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. सूरजने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून, वैष्णवी फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण घेत आहे. हे सर्व करत असताना कदम दांपत्याने आता स्वमालकीच्या दोन चारचाकी भाडेपट्ट्याने चालविण्यासाठी दिल्या आहेत. 

महिलांसाठी बनल्या आधार 
चूल आणि मूल या गर्तेतून बाहेर पडण्यासाठीच्या अनेक अडचणींचा डोंगर पार करताना महिला खचून जातात... प्रसंगी नैराश्‍येमुळे अनेकांना टोकाची भूमिकाही घ्यावी लागते. त्याच वेळी दुसरीकडे याला अनेक महिला अपवादही ठरतात.  केवळ कुटुंबासाठीच नव्हे, तर आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगाला खंबीरपणे सामोरे जात आशाताई आज महिलांसाठी आधार बनल्या आहेत. शिवणकामाच्या माध्यमातून हजारो महिलांना प्रशिक्षण देत, अनेक महिलांना त्यांनी स्वत:च्या पायावर उभे केले आहे. अनेक महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करत आर्थिक घडी बसवली आहे. 
 
सातासमुद्रापार 25 लाख व्हिवर्स 
आशाताईंनी आपली कला सर्वसामान्य महिलांपर्यंत पोचविण्यासाठी "आशाज्‌ फॅशन वर्ल्ड' या नावाने यू-ट्यूबवर सादर केली. या लिंकच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या शिवणकामाच्या टिप्स मिळण्याबरोबरच घरच्या घरी प्रात्यक्षिकांसह ब्लाऊजचे प्रकार शिकण्यास मोठी मदत झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून आशाताई जगभरातील 25 लाखांपेक्षा जास्त महिलांपर्यंत पोचल्याचे त्यांची यू-ट्यूबवरील "व्हिवर्स'ची संख्या दर्शविते. फॅशन डिझायनिंगच्या निमित्ताने जगभर पोचलेल्या आशाताईंनी या निमित्ताने नाशिकचे नाव कानाकोपऱ्यांत ग्रामीण भागापर्यंत पोचवले आहे. जगण्याच्या वाटचालीतील प्रसंगांना धीरोदात्तपणे सामोरे जात आशाताई कदम यांनी खेचून आणलेले हे यश आणि आशाज्‌ फॅशन वर्ल्ड या यू-ट्यूबच्या माध्यमातून महिलांसाठी दिलेला आधार नक्कीच शिवणकाम व्यवसायातील महिलांसाठी मोलाचा ठरला आहे.

"तनिष्का'ने दिला आधार 
"सकाळ'च्या तनिष्का व्यासपीठाच्या आशाताई सदस्या आहेत. त्यांच्या आयुष्यात तनिष्का व्यासपीठाने वेळोवेळी दिलेले पाठबळ त्यांना समाजात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी नक्कीच आधार ठरले आहे. तनिष्का व्यासपीठामुळे अनेक ठिकाणी सन्मानित करण्यात आल्याचे त्या सांगतात. तनिष्काच्या निमित्ताने महिलांच्या सक्षमीकरणात मोठे योगदान देतानाच तनिष्का सदस्यांना मोफत मार्गदर्शनासाठी आपण नेहमीच तत्पर असल्याचेही त्या अभिमानाने नमूद करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: motivational story of aashatai kadam nashik marathi news