esakal | महापालिकेचा 'तो' रिलायन्स जिओचा करार रद्द; नगरसेवकांच्या विरोधानंतर महापौरांचा निर्णय 
sakal

बोलून बातमी शोधा

reliance.jpg

सोलापूर महापालिकेच्या धर्तीवर शहरातील वीजखांबांवरून ऑप्टिकल फायबर वायर टाकण्याचा प्रशासनाचा प्रयत्न नगरसेवकांच्या विरोधामुळे हाणून पाडण्यात आला. नाशिक महापालिकेचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी करार करण्यास नकार देताना  विषय रद्द करण्याच्या सूचना दिल्या. 

महापालिकेचा 'तो' रिलायन्स जिओचा करार रद्द; नगरसेवकांच्या विरोधानंतर महापौरांचा निर्णय 

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : सोलापूर महापालिकेच्या धर्तीवर शहरातील वीजखांबांवरून ऑप्टिकल फायबर वायर टाकण्याचा प्रशासनाचा प्रयत्न नगरसेवकांच्या विरोधामुळे हाणून पाडण्यात आला. महापौर सतीश कुलकर्णी यांनी करार करण्यास नकार देताना  विषय रद्द करण्याच्या सूचना दिल्या. 

रिलायन्स जिओचा करार रद्द 
स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी रिलायन्स जिओला वीजखांबांवरून ऑप्टिकल फायबर टाकण्यासंदर्भातील करार करू नये, असे पत्र महासभेला दिले होते. त्यावर भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी शहर सौंदर्यीकरणाला बाधा पोचणार असल्याचा दावा केला. एकीकडे स्मार्टसिटींतर्गत सौंदर्यीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना अगदी क्षुल्लक म्हणजे एक रुपये १८ पैशांना प्रतिदिन खांब वापरास देणे चुकीचे असल्याचे सांगितले.

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

नगरसेवकांच्या विरोधानंतर महापौरांचा निर्णय 

सभागृहनेते सतीश सोनवणे यांनीही विषयाला विरोध दर्शविला. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार यांनी विषय स्थगित ठेवण्याऐवजी रद्द करण्याची मागणी केली. नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी वीज वितरण कंपनीच्या नियमात शहरी भागात वीजखांबांवरून केबल टाकण्यास विरोध दर्शविला असताना महापालिकेकडून रिलायन्सला ऑप्टिकल फायबर वायर टाकण्यास परवानगी दिली जात असल्याचा विरोधाभास समोर आणला. महापौर कुलकर्णी यांनी अखेर विषय रद्द करत असल्याचे जाहीर केले. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

संपादन - ज्योती देवरे