दिवाळीच्या फराळानंतर खवय्यांचा मटणावर ताव! गोड फराळाला कंटाळून तिखट मसालेदार मांसाहाराला पसंती

राजेंद्र दिघे
Monday, 16 November 2020

कोरोनाच्या सावटात दिवाळीची धामधूम सुरू आहे. बाजारपेठांमधील गर्दी व रस्त्यांवरील दळणवळण वाढले आहे. गेल्या सात-आठ दिवसांपासून घराघरांत दिवाळीच्या फराळावर ताव मारला जात आहे. मात्र यास विटलेल्या खवय्यांकडून मिठाईनंतर मटण, चिकनवर ताव मारला जात आहे.

मालेगाव कॅम्प (जि.नाशिक) : कोरोनाच्या सावटात दिवाळीची धामधूम सुरू आहे. बाजारपेठांमधील गर्दी व रस्त्यांवरील दळणवळण वाढले आहे. गेल्या सात-आठ दिवसांपासून घराघरांत दिवाळीच्या फराळावर ताव मारला जात आहे. मात्र यास विटलेल्या खवय्यांकडून मिठाईनंतर मटण, चिकनवर ताव मारला जात आहे.

गोड जेवण, फराळाला कंटाळून तिखट मसालेदार मांसाहाराला पसंती

दोन दिवसांच्या दिवाळीच्या सुटीत गावाकडे आलेले सर्वजण गोड जेवण, फराळाला कंटाळून तिखट मसालेदार चिकन, मासे, मटणच्या जेवणाला पसंती देत आहेत. अनेकांनी भाऊबीजेनंतर मळ्याखळ्यासह घराघरांत सामिष जेवणाची तयारी केली आहे. परिणामी चिकन, मासे, मटणाला मागणी वाढू लागली आहे. दिवाळीनिमित्त नातेवाईक व मित्रपरिवार एकत्र आल्याने शहरासह ग्रामीण भागातील विविध हॉटेल व ढाब्यांवरची गर्दी वाढत आहे. मटणाचा बाजार तेजीत येऊन मांसाहारी पदार्थांना मोठी मागणी असल्याने विक्रेत्यांना आठ महिन्यांनंतर ‘अच्छे दिन’ आले आहेत. लॉकडाउननंतर सुटीत प्रथमच मित्र गोतावळा एकत्र जमत आहे. लालपरी सुरू झाल्याने नात्यागोत्यांची गर्दी वाढली आहे.

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

पाहुणचाराची जोड मिळाल्याने उलाढाल वाढली

दिवाळीच्या फराळानंतर पाहुण्यांना सामिष भोजनाची जणू कसमादेत पद्धतच आहे. खास करून मटणाचेच बेत आखले जात आहेत. विशेषतः चुलीवरच्या मटणाचा स्वाद घेण्यास सर्वजण आतूर असतात. त्यातही मटणाचा खास खानदेशी मसाला वाटूनघाटून तर्रीदार भाजी बनविण्यासाठी कसमादे भागातील खवय्ये प्रसिद्ध आहेत. भाव वाढूनही मागणी चांगली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. हिवाळ्यात विशेषतः चिकन, अंडी मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. त्यात दिवाळीनंतरच्या पाहुणचाराची जोड मिळाल्याने उलाढाल वाढली आहे. 

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात 

मांसाहारी दरपत्रक 
प्रकार लॉकडाउनपूर्वी लॉकडाउनंतर सध्याचे 

मटण ५२० ५४० ५८० 
चिकन १०० १२० १८० 
गावरान ५२० ५६० ६०० 
कॉकलर ३०० ३२० ३५० 
मासे २५० ३०० ३५० 
----- 
कोट 
मटणाच्या दरात भाववाढ नियमित असते. महागलेल्या चाऱ्यामुळे बोकडाचे बाजारभाव वाढतात. दिवाळीनंतर हिवाळ्यात मटण, चिकनला चांगली मागणी असते. 
-मुख्तार शहा, 
मटण विक्रेता, मालेगाव कॅम्प  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mutton meat demand in diwali nashik marathi news