
नाशिक : (नामपूर) येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेने बुधवारी (ता. १५) ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. नाशिक येथील वैद्यकीय पथकाकडून सर्व कर्मचाऱ्यांची नामपूर येथेच तपासणी होणार असून खबरदारीचा उपाय म्हणून नामपूर रुग्णालय सील करण्यात आले आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश
कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून येथील ग्रामपंचायत प्रशासन सज्ज झाले आहे. मंगळवारी (ता. १४) रात्री येथील वैद्यकीय अधिकाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणेने दिले आहे. आमदार दिलीप बोरसे, उपविभागीय अधिकारी विजयकुमार भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ हेमंत अहिरराव, हेमंत वाघ, भूषण देसले, सरपंच अशोक पवार, उपसरपंच जयश्री सावंत, गुलाबराव कापडनीस, ग्रामविकास अधिकारी के. बी. इंगळे यांनी ग्रामीण रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला. १ एप्रिल ते ८ एप्रिलच्या काळात मोसम खोऱ्यातील ज्या रुग्णांनी नामपूर रुग्णालयात येऊन उपचार घेतले असतील त्यांनी त्वरित आपली माहिती ग्रामपंचायतीस किंवा जिल्हा प्रशासनाला द्यावी, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी के. बी. इंगळे यांनी केले आहे.
अफवा पसरणाऱ्यावर कडक कारवाई
नामपूर रुग्णालयातील कोरोनाबाधित वैद्यकीय अधिकारी मालेगाव येथे वास्त्यव्यास असल्याने तेथून ये - जा करीत असत. मालेगावात कोरोनाने थैमान घातले असतांनाच आता वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंतेचे ढग दाटले आहे. या वैद्यकीय अधिकाऱ्याची पत्नीला देखील कोरोनाची बाधा झाल्याची प्राथमिक माहिती समजते. ज्या रुग्णांनी त्यांच्याकडे उपचार घेतले असतील त्यांनी त्वरित याबाबतची माहिती प्रशासनाला दिल्यास कोरोनाचा वाढता फैलाव रोखणे शक्य आहे.
ग्रामपंचायत व आरोग्य प्रशासनाच्या वतीने समाज माध्यमामधून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. मालेगावमधून कोरोनाने बागलाण तालुक्यात शिरकाव केला असून सोशल मीडियावर पोलीस प्रशासनाची करडी नजर असून अफवा पसरणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, उपनिरीक्षक स्वप्निल कोळी यांनी दिला आहे. नामपूर रुग्णालयात आलेले रूग्ण किंवा नातेवाईक वरील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आले असतील तर त्यांचे सर्वेक्षण करून तात्काळ होम क्वारंन्टाईन करण्यात येणार असल्याचे आरोग्य कर्मचारी समाधान शेलार यांनी सांगितले.
नागरिकांनी संचारबंदीचे काटेकोर पालन करावे. घरात राहणे हाच एकमेव सुरक्षित उपाय आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने आशा सेविकांच्या माध्यमातून घरोघरी सॅनिटायझर वाटप करून मध्यवर्ती बसस्थानक, पेट्रोलपंप परिसरात सॅनिटायझर गेट बसविले आहे. सर्दी, ताप, खोकला, श्वास घेताना त्रास, डोकेदुखी ही कोरोनाची लक्षणं आहेत. त्यामुळे दीर्घकाळ ही लक्षणं दिसल्यास डॉक्टरकडे जाण्यास दिरंगाई करु नका.
- के बी इंगळे, ग्रामविकास अधिकारी, नामपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.