‘स्वच्छ, हवेशीर शहर’ नाशिकला हवीय पर्यावरणपूरक बससेवा

विक्रांत मते
Friday, 30 October 2020

शहर व ग्रामीण मिळून जिल्ह्यात अकरा लाख ६९ हजार ८६१ वाहनांची नोंद गेल्या वर्षी झाली. शहरात २२ हजार ६५१ रिक्षा, एक लाख ७१ हजार ४२५ चारचाकींची नोंद झाली होती. खासगी वाहनांची संख्या वाढीमागे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याचे कारण आहे.

नाशिक : ‘स्वच्छ, हवेशीर शहर’ बिरुदावलीचे प्रमाणपत्र मिळालेल्या नाशिकमध्ये प्रदूषण वाढण्यास सध्या सुरू असलेली बससेवा कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक बससेवेची शहराला गरज असून, यातून पर्यावरण संवर्धनासह खासगी वाहतुकीवरचा ताण कमी होण्याचा हेतू साध्य होणार आहे. 

वाहतूक व्यवस्था बळकटीकरण महत्त्वाचे ठरणार

शहराच्या प्रगतीची मोजपट्टी तेथे पुरविल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांची स्थिती व गुणवत्तेवर ठरविली जाते. सध्या शहर बससेवेचा विचार केल्यास अगदी खालच्या स्तरावरची सुविधा आहे. त्याशिवाय त्यातून पर्यावरणाला हानी होईल, अशी स्थिती आहे. देशभरातील स्वच्छ, सुंदर व हवेशीर शहरांमध्ये नाशिकचे नाव वरच्या स्थानावर आहे. स्वच्छ भारत अभियानात गेल्या वर्षी देशात अकरावे, तर राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान नाशिकला प्राप्त झाले होते. त्यामुळे भविष्यातही हवेशीर नाशिकचे स्थान टिकविण्याची जबाबदारी नागरिक व संस्थांवर आहे. हवा प्रदूषणात औद्योगिक कारखान्यांबरोबरच वाढत्या वाहनांची संख्या कारणीभूत आहे. औद्योगिक कारखाने रोजगाराचे महत्त्वाचे घटक असल्याने ते हलविता येणे शक्य नाही. त्यामुळे वाहनांची संख्या कमी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकटीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. 

शहरात सीएनजी, इलेक्ट्रिक बसची नितांत गरज

शहर व ग्रामीण मिळून जिल्ह्यात अकरा लाख ६९ हजार ८६१ वाहनांची नोंद गेल्या वर्षी झाली. शहरात २२ हजार ६५१ रिक्षा, एक लाख ७१ हजार ४२५ चारचाकींची नोंद झाली होती. खासगी वाहनांची संख्या वाढीमागे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याचे कारण आहे. यातून रस्त्यांवर वाहनांचा ताण वाढून पर्यावरणाचा समतोल बिघडण्यास मदत होत आहे. त्यामुळे शहरात सीएनजी, इलेक्ट्रिक बसची नितांत गरज असून, महापालिकेमार्फत नव्याने सुरू होणाऱ्या बससेवेला चालना दिल्यास पर्यावरण ऱ्हासाचा प्रश्‍न काही प्रमाणात निकाली लागेल. 

वाढते प्रदूषण चिंताजनक 

त्र्यंबक रोड ते सातपूर आयटीआय सिग्नलदरम्यान शहरात धूलिकेचे प्रमाण ८५.२ मिलिग्रॅम, सल्फर डाय ऑक्साइडचे प्रमाण ५०.३ मिलिग्रॅम, नायट्रोजन डाय ऑक्साइड ४०.५ मिलिग्रॅम, तर कार्बन मोनाक्साइडचे प्रमाण एक मिलिग्रॅम आहे. मेन रोड, मुंबई नाका, जुने सीबीएस, पंचवटी कारंजा, द्वारका भागातही सरासरीपर्यंत प्रदूषण पातळी घसरली आहे. साधारण धूलिकेचे प्रमाण १०० मिलिग्रॅम, सल्फर डाय ऑक्साइड ८० मिलिग्रॅम, नायट्रोजन डाय ऑक्सॉइड ८० मिलिग्रॅम, तर कार्बन मोनाक्साइडचे प्रमाण चार मिलिग्रॅम असल्यास धोकादायक पातळी दर्शविते. 

हेही वाचा > विवाह समारंभाला आलेल्या कुटुंबियांना बनविला निशाणा! दहा लाखांहून अधिक ऐवज लंपास

हवेशीर शहर म्हणून नाशिकची सर्वदूर ओळख आहे. त्यामुळे पर्यावरण जपण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. हवा व ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट झाली पाहिजे. - निशिकांत पगारे, अध्यक्ष, गोदावरी गटारीकरण विरोधी मंच  

हेही वाचा > सिनेस्टाईल थरार! पोलिसांची चाहूल लागताच रिक्षाचालकाने ठोकली धूम; अखेर संशय खरा ठरला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik city needs eco-friendly bus service nashik marathi news