धरणांचे पाणलोट क्षेत्र अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत; यावर्षी उपयुक्त जलसाठ्यातही मोठी घट

Thursday, 6 August 2020

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात गेल्या वर्षीच्या तुलनेत ५२ टक्के जलसाठा आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये धरणात ८४ टक्के साठा होता. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत पुरेसा पाऊस होऊन धरण न भरल्यास नाशिककरांना पाणीकपातीला सामोरे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिक ः जिल्ह्यातील सात मोठ्या आणि १७ मध्यम प्रकल्पांची क्षमता ६५.८१ टीएमसी इतकी आहे. गेल्या वर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जलसाठा ४४.०१ टीएमसी (म्हणजेच ६७ टक्के) होता. आता हाच साठा २७.८६ टीएमसी (म्हणजेच ४२ टक्के) आहे. अर्थात, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत जलसाठ्यात २५ टक्के घट झाली आहे. 

जूनच्या सुरवातीला पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणात आवक राहिली. मात्र जुलैमध्ये जलसाठ्यात वाढ झाली नाही. जून आणि जुलैमध्ये पावसाने दिलेले दोन मोठे खंड हे त्यामागील कारण आहे. शिवाय एकीकडे पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी असला तरी लाभक्षेत्रात अधिक पाऊस असल्याची यंदाची स्थिती आहे. गेल्या वर्षी ५ ऑगस्टअखेर गंगापूरमधून १८ हजार ९०९, दारणामधून ४० हजार ३४२, पालखेडमधून ४६ हजार १३० क्युसेक विसर्ग सुरू होता. नांदूरमध्यमेश्वरमधून दोन लाख ७६ हजार ६०५ क्यूसेक विसर्ग जायकवाडी धरणात सुरू होता. पावसाने ओढ दिल्याने पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पिण्यासाठी आणि सिंचनाच्या आरक्षणाचे सूक्ष्म नियोजन करण्यास अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

हेही वाचाः आणखी किती अंत! आधी विष प्राशन..नंतर मित्राला व्हिडिओ कॉल करून म्हणतो...

नाशिकमध्ये पाणीकपातीचे संकट अन् लॉकडाउनच्या काळात अतिरिक्त पाणीवापर

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात गेल्या वर्षीच्या तुलनेत ५२ टक्के जलसाठा आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये धरणात ८४ टक्के साठा होता. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत पुरेसा पाऊस होऊन धरण न भरल्यास नाशिककरांना पाणीकपातीला सामोरे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गंगापूर धरण ९० टक्के धरण भरल्याने गेल्यावर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात धरणातून पाणी सोडण्यात आल्याने गोदावरीला पूर आला होता. आता काश्‍यपी, गौतमी या गंगापूर धरणसमूहात पुरेसा जलसाठा झालेला नाही. नाशिकला मुकणे धरणातून थेट पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा होतो. या धरणामध्ये गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ५९ टक्के साठा होता. आता २८ टक्के जलसाठा आहे.

पाणी आरक्षण संपले, अतिरिक्त उपसा 

गेल्या वर्षी दमदार पाऊस झाल्याने विविध संस्थांकडून पाण्याची मागणी नोंदविली गेली नाही. त्यामुळे धरणातून पाणी सोडले गेले नाही. चार हजार ८०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले होते. ३१ जुलैला आरक्षित पाणी उचलण्याची मुदत संपुष्टात आली आहे. मार्चमध्ये लॉकडाउन सुरू झाले. एप्रिल व जूनमध्ये नागरिक घरामध्ये असल्याने पाण्याचा अतिरिक्त वापर झाला. रोज सरासरी ४८० दशलक्ष लिटर पाणी शहराला पुरविले जाते. मात्र लॉकडाउनच्या काळात ५०० ते ५१० दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा झाला. 

हेही वाचाः ह्रदयद्रावक! "अखेर आज माझी लेकरं मला मिळाली.." संघर्षाला यश अन् मातेच्या कुशीत विसावली लेकरं ...

 मोठ्या प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस 
(५ ऑगस्टअखेर आकडे मिलिमीटर दर्शवतात)

धरण २०१९ २०२० तफावत 
गंगापूर १९३१ ८२८ ११०३ 

करंजवण ७१३ ३४५ ३६८ 

दारणा १४०९ ४४८ ९९१ 

मुकणे १५९६ ३५३ १२४३
कडवा १११३ ४७८ ६६५ 

चणकापूर ५१५ ३३१ १८४ 
 

जिल्ह्यातील उपलब्ध जलसाठा 
(आकडे टीएमसीमध्ये)

धरण... साठवणूक क्षमता... मागील वर्षाचा साठा... सद्यःस्थिती... घट टक्क्यांमध्ये 

गंगापूर....५.६३०...४.९४३...२.९२७...३६

कश्यपी...१.८५२...१.८०८...०.४६४...७३ 

गौतमी गोदावरी...१.८६८...१.७६४...०.३९७...७३ 

आळंदी...०.९७०...०.९७०....०.००७...९९ 

पालखेड...०.६५३...०.४५९...०.२१०...३८

करंजवण...५.३७१...४.५७७...१.०३२...६६

वाघाड...२.३०२...२.३०२...०.२८२...८८ 

ओझरखेड २.१३०...१.१५३...०.८६४...१३

दारणा...७.१४९...६.६३१...५.१४३...२१ 

भावली...१.४३४...१.४३४...१.४३४...० 

मुकणे... ७.२३९...६.४०९...२.०४३...६१ 

वालदेवी...१.१३३...१.१३३...०.४०१...६५
कडवा...१.६८८...१.४७०...०.४३८...६१ 

नांदूरमध्यमेश्वर...०.२५७...०.२५७...२३९...७ 

भोजापूर...०.३६१...०.३६१...०.१४६...६० 

चनकापूर...२.४४७...१.६०१...०.६३१...४० 

हरणबारी...१.१६६...१.१६६...०.९९९...१४

केळझर...०.५७२...०.५४९...०.१८५...६४ 

नाग्यासाक्या...०.३९७...०...०.१९६...+४९ 

गिरणा...१८.५००...३६०५...८७८०...+३८ 

पुनंद...१.३०६...०.८७३...०.६०१...२१ 

माणिकपुंज...०.३३५...०...०.३३४...० 

उपलब्ध जलसाठा काटेकोरपणे वापरावा. पाऊस होऊन जलसाठा पुरेसा होत नाही, तोपर्यंत सुयोग्य नियोजन करण्याच्या सूचना क्षेत्रीय पातळ्यांवर देण्यात आल्या आहेत. 
-राजेश गोवर्धने (कार्यकारी अभियंता, पालखेड) 

सध्याची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करावा. सध्या उपयुक्त साठ्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाऊस झाल्यास परिस्थितीत बदल होईल. 
-लक्ष्मीकांत वाघावकर (संचालक, वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर संस्था)  
 

रिपोर्ट- महेंद्र महाजन

संपादन- रोहित कणसे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik district dams waiting for heavy rain Marathi news