कोरोना तपासणीत 'हे' शहर राज्यातच नव्हे, तर देशात आघाडीवर!

corona nashik.jpg
corona nashik.jpg

नाशिक : मुंबई, पुणे, औरंगाबादनंतर नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना महापालिकेतर्फे मोठ्या प्रमाणात रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट घेण्यात आल्या. त्याचा परिणाम कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढण्यात दिसून येत असला तरी त्यामुळे कोरोनाची साखळी खंडित करण्यास मदत होत आहे. पालिकेने ४५ दिवसांत केलेल्या चाचण्यांनी नवीन रेकॉर्ड तयार केले असून, देश व राज्यात नाशिक सर्वाधिक चाचण्या घेणारे शहर बनल्याचे महापालिकेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. 

दहा लाख लोकसंख्येमागे ९७ हजार टेस्ट

शहरात ६ एप्रिलला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर टप्प्याटप्याने रुग्णांची संख्या वाढत गेली. एप्रिल व मेमध्ये शहरात कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव नव्हता. पन्नासच्या पटीत रुग्ण आढळून येत होते. मात्र जूनपासून संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागला. जूनमध्ये दहा हजारांचा टप्पा, ऑगस्टमध्ये तीस हजार, तर सप्टेंबरच्या दहा तारखेपासून ४० हजारांकडे वाटचाल सुरू आहे. कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळतील याची चाहूल लागल्यानंतर महापालिकेने एक लाख रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किट खरेदी करून तपासणी सुरू केली. तपासणीमागे कोरोनाची साखळी खंडित करण्याचा हेतू होता. 

सर्वाधिक चाचण्या घेणारे आघाडीचे शहर

रॅपिड ॲन्टिजेन टेस्टच्या माध्यमातून नऊ हजार ५०१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर ४९ हजार ६१० तपासण्या निगेटिव्ह आढळल्या. त्याव्यतिरिक्त महापालिकेचे फिवर क्लिनिक, बिटको, डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, कोविड सेंटरमध्ये तपासण्या करण्यात आल्या. दहा लाख लोकसंख्येमागे नाशिक महापालिकेने तब्बल ९७ हजार ९१४ रॅपिड ॲन्टिजेन व स्वॅब टेस्ट करण्यात आल्या. देशात सर्वाधिक चाचण्या घेणारे आघाडीचे शहर म्हणून नाशिक शहर ठरले. 

'सकाळ'ची भूमिका महत्त्वाची 

सामाजिक भीतीमुळे टेस्ट करण्यासाठी नागरिक पुढे येत नव्हते. महापालिकेच्या वैद्यकीय पथकांनाही दाद दिली जात नव्हती. वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ल्यांचे प्रकार घडले होते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास लोक तपासणीसाठी पुढे येतील, असे मत ‘सकाळ’च्या व्यासपीठावरून तज्ज्ञांनी व्यक्त केले. नगरसेवकांनी त्यास प्रतिसाद दिल्यानंतर प्रत्येक प्रभागात आजी-माजी नगरसेवकांनी कोरोना तपासणी मोहीम राबविली. 

नाशिक देशात आघाडीवर
 
दर दहा लाख लोकसंख्येमागे २५ हजार स्वॅब अथवा रॅपिड ॲन्टिजेन तपासण्या झाल्या पाहिजेत, अशा सरकारच्या सूचना आहेत. त्यानुसार भारतात सर्व राज्ये मिळून दर दहा लाख लोकसंख्येमागे ३६ हजार ४९२ चाचण्या झाल्या. महाराष्ट्रात ३६ हजार दोन, नाशिक ग्रामीणला तीन हजार ६७, तर नाशिक महापालिका क्षेत्रात ९७ हजार ९१४.१७ चाचण्या करण्यात आल्या. देश व राज्याच्या तुलनेत नाशिक शहरात तिप्पट चाचण्या झाल्या आहेत. 

चाचण्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचार घेऊन बरे होण्याचे प्रमाण ७४ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. ही समाधानकारक बाब आहे. - कैलास जाधव, आयुक्त, महापालिका 

जूनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतर्फे तपासणी मोहीम वाढविण्यात आली. प्रभागनिहाय तपासण्या करण्यात आल्याने देश व राज्यात सर्वाधिक चाचण्या नाशिकमध्ये झाल्याने यातून कोरोना रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य झाले. - डॉ. प्रवीण अष्टीकर, अतिरिक्त आयुक्त  

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com