चीनसह पाक कांद्याला नाशिकच्या कांद्याची टक्कर! भाव गडगडलेले असताना काहीसा दिलासा

onion
onion

नाशिक : देशांतर्गत कांद्याचे भाव गगनाला भिडले असताना केंद्र सरकारने १४ सप्टेंबरला कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. पण तत्पूर्वी सीमाशुल्क विभागाचे बिल फाडले गेले होते. असा ६८ कंटेनर कांदा निर्यातदारांना पाठविता आला नाही. त्याविरोधात हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्स्पोर्टर असोसिएशनने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर ६८ कंटेनरमधून जवळपास दोन हजार टन कांद्याच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मुंबईच्या बंदरातून कांदा पाठविण्यासाठी निर्यातदारांनी नाशिककडे लक्ष केंद्रित केले आहे. परिणामी, सद्यःस्थितीत जागतिक बाजारपेठेत भाव खाणाऱ्या चीनसह पाकिस्तानच्या कांद्याला आता नाशिकचा कांदा टक्कर देणार आहे. 

६८ कंटेनरमधून दोन हजार टनांची निर्यात ​

उच्च न्यायालयाचा आदेश आला असताना स्थानिक बाजारपेठेत कांद्याचे भाव अधिक होते. त्यामुळे निर्यातदारांनी भाव कमी होण्याची वाट पाहिली. आता कांद्याचे भाव घसरू लागल्याने निर्यातदारांनी न्यायालयाच्या आदेशानुसार कांद्याच्या निर्यातीवर भर दिला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निर्यातदारांच्या माहितीनुसार ६८ पैकी ४० च्या आसपास कंटेनरभर कांदा रवाना करण्यात आला आहे. त्यात श्रीलंका, दुबई, सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनाम, फिलिपीन्स, हाँगकाँगचा समावेश आहे. उरलेले कंटेनर पुढील आठवड्यात रवाना होण्याची शक्यता अधिक आहे. ६८ पैकी जवळपास ५० कंटेनरभर कांदा श्रीलंकेत पोचणार असल्याचे निर्यातदारांनी सांगितले. 

परदेशातील भाव ३५ ते ४० रुपये किलो 

तुर्कस्तानचा कांदा संपला आहे. तेथील नवीन कांद्याची आवक मेमध्ये सुरू होईल. इराणचा नवीन कांदा मार्चमध्ये बाजारात येईल. अखेरच्या टप्प्यात असलेल्या हॉलंडच्या कांद्याचा भाव किलोला ३८ रुपयांपर्यंत आहे. चीनच्या कांद्याचा ३५ ते ४०, तर पाकिस्तानच्या कांद्याचा भाव ४० रुपये किलो असा आहे. अशा परिस्थितीत नाशिकचा कांदा पोचत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय कांद्याचे भाव कमी झाले असताना भारत निर्यातबंदी उठविण्याची शक्यता असल्याची अफवा पसरल्याने त्याची धास्ती पाकिस्तानने घेतल्याचे चित्र जगभर पाहायला मिळाले. टनाला ७०० डॉलरवरून पाकिस्तानच्या निर्यातदारांनी काही दिवस भाव टनाला ३०० डॉलर केला होता. मात्र कांदा निर्यातबंदी उठविण्याची अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यावर पाकिस्तानच्या निर्यातदारांनी हा भाव टनाला ५०० ते ५५० डॉलर इतका केला. भारतात देशांतर्गत कांद्याच्या उपलब्धतेची माहिती घेतल्यावर मध्य प्रदेशात कांद्याची आवक अधिक आहे. हीच परिस्थिती राजस्थानच्या कांद्याची आहे. पश्‍चिम बंगालमधील सुखसागर पट्ट्यातील कांदा फेब्रुवारीमध्ये बाजारात येण्यास सुरवात होईल. सुखसागर पट्ट्यात यंदा ३० टक्क्यांनी अधिक उत्पादन आहे. महाराष्ट्रातील नवीन लाल कांदा येत्या आठवड्याभरानंतर बाजारात मोठ्या प्रमाणात येण्यास सुरवात होईल. अशा परिस्थितीत कांद्याचे भाव आणखी गडगडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 



कांद्याच्या निर्यातबंदीचा केंद्र सरकारने निर्णय घेतला. पण तत्पूर्वी सीमाशुल्क विभागाचे बिल झाले होते. निर्यातबंदीच्या निर्णयाच्या अगोदर बंदरात आणि सीमांवर अडकलेल्या ४०० कंटेनरपैकी जवळपास ३३० कंटेनरमधील कांदा केंद्र सरकारच्या परवानगीने काही दिवसांनी निर्यातीसाठी रवाना झाला. मात्र त्या वेळी जहाज उपलब्ध नसल्याने निर्यातदारांना मुंबईच्या बंदरातून कांदा भरलेले ६८ कंटेनर परत आणावे लागले होते. या नुकसानीच्या अनुषंगाने उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. न्यायालयाने ६८ कंटेनरभर कांद्याच्या निर्यातीचे आदेश दिले आहेत. 

-विकास सिंह, कांदा निर्यातदार 


२०० ते ६५० रुपयांनी भाव गडगडले 

कांद्याचे आगर असलेल्या नाशिक जिल्ह्यात एका दिवसामध्ये कांद्याचे भाव क्विंटलला २०० ते ६५० रुपयांनी गडगडले आहेत. त्यात उन्हाळ आणि नवीन लाल कांद्याचा समावेश आहे.

नवीन लाल कांद्याचा क्विंटलचा सरासरी भाव रुपयांमध्ये (कंसात मंगळवारचा क्विंटलचा सरासरी भाव रुपयांमध्ये) 

लासलगाव- अडीच हजार (दोन हजार ७५०),

मुंगसे- दोन हजार १०० (अडीच हजार),

चांदवड- दोन हजार २०० (दोन हजार ८५०),

मनमाड- दोन हजार ३०० (दोन हजार ६००),

सटाणा- दोन हजार १५० (दोन हजार ५५०),

देवळा- दोन हजार ६५० (दोन हजार ९००),

उमराणे- दोन हजार (दोन हजार ६००),

पिंपळगाव बसवंत- दोन हजार ४५१ (दोन हजार ७३१).

तसेच उन्हाळ कांद्याचा बुधवारचा क्विंटलचा सरासरी भाव रुपयांमध्ये (कंसात मंगळवारचा क्विंटलचा सरासरी भाव रुपयांमध्ये) :

येवला- दोन हजार १०० (दोन हजार ३००),

मुंगसे- एक हजार ७०० (दोन हजार १५०),

चांदवड- दोन हजार (दोन हजार ३००),

मनमाड- दोन हजार २०० (दोन हजार ३००),

सटाणा- एक हजार ८९० (दोन हजार ४५०),

पिंपळगाव बसवंत- दोन हजार ३०० (दोन हजार ५०१),

उमराणे- दोन हजार २०० (दोन हजार ४००). 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com