धक्कादायक.. मुंबई-पुण्यानंतर आता नाशिकमध्येही कोरोनाने घेतला पोलीसाचा बळी...इथेही मालेगाव कोरोना इफेक्ट..

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 9 May 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन, पोलीस व आरोग्य विभाग सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. तरीही, नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.  जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू असतानाच नाशिक शहरात एका ५१ वर्षीय कोरोनाबाधित पोलिसाचा मृत्यू झाला आहे.

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन, पोलीस व आरोग्य विभाग सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. तरीही, नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.  जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू असतानाच नाशिक शहरात एका ५१ वर्षीय कोरोनाबाधित पोलिसाचा मृत्यू झाला आहे. याआधी पहिला बळी गर्भवती महिलेचा गेला होता. वाढत्या रुग्णांमुळे जिल्ह्यात चिंताजनक वातावरण आहे.

रिपोर्ट येऊन ३ तासही उलटले नव्हते..

शनिवारी (ता.९) सकाळी प्राप्त झालेल्या रिपोर्टमध्ये कोणार्कनगरमध्ये एक पोलीस करोनाबाधित आढळून आला. रिपोर्ट येऊन अवघे तीन तास झाले असतानाच त्या पोलिसाचा मृत्यू झाला. नाशिक शहरात आत्तापर्यत दोन करोनाचे बळी गेले आहेत.आत्तापर्यंत नाशिक शहरात एक महिला व पुरुषाचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित मृत १८ करोनाबाधित रुग्ण एकट्या मालेगावातील आहेत. नाशिक जिल्ह्यात एकूण ६२२ कोरोनाबाधित आहेत. मालेगाव येथे कर्तव्य बजावत असताना कोणार्क नगर येथील रहिवाशी ग्रामीण पोलीस हे कोरोना बाधित झाले होते.त्यांचा शनिवार (ता.९) रोजी मृत्यू झाला.

लक्षणे आढळून आल्याने कोविड कक्षात भरती

मालेगाव इथे कर्तव्य बजावल्यानंतर ते विलिगीकरण कक्षात दाखल होते. शनिवारी (ता.२) त्यांना सौम्य लक्षणे आढळून आल्याने संशयित म्हणून त्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात भरती करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्यावेळी त्यांची तब्येत बरी होती. पण शनिवारी (ता.९) पहाटेपासून त्यांना अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागला. तसेच त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ लागले. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर घेण्यात आले. त्यानंतर त्यांनी उपचारास प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जगदाळे यांनी दिली.

हेही वाचा > मालेगाव भीषण वास्तव! "रोज उठ रहे जनाजोंसे सबक न सिका तो.."सहा दिवसांत चक्क 'इतके' मातीत दफन 

शनिवार चिंतेचा

कोरोनाचा फैलाव बघून कोरोनाचा धोका वाढतोय असेच चिन्ह दिसत आहे. मालेगावमध्ये शनवारची सकाळ चिंताजनक निघाली. शनिवारी (ता.९) सकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये मालेगावात ४९, नाशिक शहरात १ असे नवीन ५० कोरोनाचे रुग्ण निष्पन्न झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून ही चिंताजनक बाब आहे.याचबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भाग आणि शहरात कोरोनाने आता शिरकाव केला आहे.

हेही वाचा >मालेगावात शासकीय रुग्णालयातच छापा..धक्कादायक माहिती उघड.. वैद्यकीय क्षेत्रात खळबळ!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik police death due to Corona virus nashik marathi news