नाशिकमधील 'हा' परिसर ठरतोय आता कोरोनाचा नवा हॉटस्पॉट!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जुलै 2020

नाशिकरोडच्या अनेक भागांत शासनाने दिलेल्या नियमांचे पालन होत नाही. परिसरात सम-विषम नियमांची पायमल्ली केली जात आहे. सायंकाळी पाचनंतर दुकाने बंद ठेवावीत, असा आदेश आहे. परंतु या आदेशाला दुकानदार केराची टोपली दाखवत असल्याचे चित्र आहे. 

नाशिक : (नाशिक रोड) आठ दिवसांपासून नाशिकरोड परिसरात कोरोनाने कहर केला असून, तब्बल २७५ पेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने नाशिकरोड परिसर हॉटस्पॉट बनला आहे. मंगळवार (ता. ७) पासून परिसरात रोज किमान ३० ते ३५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. नागरिकांची बेशिस्त वागणूक या सर्व प्रकाराला जबाबदार आहे. 

या भागात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

गोसावीवाडी, देवळालीगाव, विहितगाव, जेल रोड, दसक, दत्त मंदिर रोड, जय भवानी रोड, राजवाडा, चेहेडी, सिन्नर फाटा आदी भागात रोज रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. बिटको चौक, दत्त मंदिर चौक, देवी चौक, रेल्वेस्थानकाच्या आसपासचा परिसर त्याचप्रमाणे आंबेडकर पुतळा व शिवाजी पुतळ्याच्या आसपासचा परिसर, राजवाडा, जियाउद्दीन डेपो, अण्णा हजारे मार्ग, बिटको हॉस्पिटलजवळ असणारा भाजी बाजार, उड्डाणपुला खालील भाजी बाजार येथे सोशल डिस्टन्सिंग ठेवणे कठीण झाले आहे. नित्याच्याच गर्दीमुळे वाहतुकीबरोबरच नागरिक कसलेच नियम पाळत नाहीत. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, कोरोनाचा संसर्ग वाढण्यामागे नागरिकांची बेशिस्त व सोशल डिस्टन्सिंग न पाळणे हे कारण आहे. 

हेही वाचा > आश्चर्यच! लग्नानंतर दहा वर्षांनी दाम्पत्याला लागली लॉटरी...एक सोडून तिघांची एंन्ट्री!

सम-विषम नियमांची पायमल्ली

देवळालीगाव, राजवाडा, जियाउद्दीन डेपो, विहितगाव या भागांत दोन महिन्यांपूर्वी कोरोनाचा शिरकावही नव्हता. आता या भागात रोज कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. नाशिकरोडच्या अनेक भागांत शासनाने दिलेल्या नियमांचे पालन होत नाही. परिसरात सम-विषम नियमांची पायमल्ली केली जात आहे. सायंकाळी पाचनंतर दुकाने बंद ठेवावीत, असा आदेश आहे. परंतु या आदेशाला दुकानदार केराची टोपली दाखवत असल्याचे चित्र आहे. 

हेही वाचा > भरदुपारी चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला; परिसरात खळबळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik Road area Corona's hotspot nashik marathi news