'लॉकडाऊन' परिस्थितीत किराणा संपलाय?...चिंता नको हे वाचा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी संघटनेने घरपोच किराणा देण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच गहू, हरभराडाळीचा पुरवठा कमी असल्याने अनावश्‍यक खरेदी ग्राहकांनी टाळण्याची सूचना संघटनांनी केली आहे. 

नाशिक : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी संघटनेने घरपोच किराणा देण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच गहू, हरभराडाळीचा पुरवठा कमी असल्याने अनावश्‍यक खरेदी ग्राहकांनी टाळण्याची सूचना संघटनांनी केली आहे. 

व्हॉट्‌सऍपवर किराणा मालाची यादी पाठविल्यावर घरपोच किराणा माल

जनता कर्फ्यूच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी (ता. 21) रात्री अकरापर्यंत ग्राहकांना किराणा माल दुकानदारांना द्यावा लागला. सुटीमध्ये उन्हाळी काम करण्यासाठी मुख्यत्वे पापडखार, नागली, वड्यासाठीचा किराणा खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. दुकानात प्रवेश मिळावा म्हणून अनेक जण नाक-तोंड दाबून शिरत असल्याचे दुकानदारांनी पाहिले आहे. ही सारी परिस्थिती पाहता, दोन ते तीन महिन्यांचा अनावश्‍यक किराणा खरेदी करण्याची आवश्‍यकता नसल्याच्या मतापर्यंत दुकानदार पोचले आहेत. एवढेच नव्हे, तर दुकाने टप्प्याटप्प्याने उघडी ठेवणे, बंद करणे असे धोरण जिल्हा प्रशासनातर्फे स्वीकारण्याची आवश्‍यकता असल्याचा सूर दुकानदारांनी व्यक्त केला. घाऊक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी राजेश भंडारी, परेश बोधाणी, मनोज वडेरा, प्रसाद जाजू आणि किरकोळ व्यापारी संघटनेचे महेंद्र पटेल, सुरेश मंत्री, एकनाथ अमृतकर, विजय काकड, संतोष राय, शेखर दशपुत्रे आदींशी संवाद साधून व्हॉट्‌सऍपवर किराणा मालाची यादी पाठविल्यावर घरपोच किराणा माल देण्याचा निर्णय जाहीर केला. 

घरपोच किराणा देण्यावर शोधला उपाय 

किरकोळ दुकानदारांपैकी काही दुकानांमध्ये कुटुंबातील दोघे काम करतात. मग घरपोच किराणा कसा पोचवायचा, असा प्रश्‍न अनेकांशी संवाद साधताना उपस्थित झाला होता. त्यावर मोबाईलवरून किराणा मालाची यादी मागवून घ्यायची. माल काढल्यावर एक ते दोन दिवसांमध्ये घरपोच किराणा द्यायचा हा उपाय शोधण्यात आल्याची माहिती श्री. संचेती यांनी दिली. 

हेही वाचा > 'या' तरुणाने केली मंदीवर मात...रोजगारनिर्मितीसाठी लढविली अशी शक्कल!

गुजरातमध्ये दुकानांमधून दोन ते तीन ग्राहकांखेरीज प्रवेश दिला जात नसल्याची माहिती उपलब्ध झाली. त्याचबरोबर गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानमधून गहू, हरभराडाळीचा पुरवठा कमी होत आहे. अशा पार्श्‍वभूमीवर दुकानांमध्ये गर्दी करून वर्षभराचा माल एकदाच विकत घेण्याची आवश्‍यकता नाही. गर्दी करून आरोग्याचे प्रश्‍न उद्‌भवणार नाहीत याची काळजी ग्राहकांनी घ्यावी. - प्रफुल्ल संचेती, अध्यक्ष, घाऊक व्यापारी संघटना  

हेही वाचा > PHOTOS : COVID-19 : पाळणाघर विसावलं कोरोनाच्या खांद्यावर!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashikkar will get groceries after sending a WhatsApp list nashik marathi news