महापालिकेचा टास्क फोर्स! 'मिशन-ए-स्वच्छ सर्वेक्षण' सुरु; पहिल्या दहामध्ये येण्यासाठी धडपड

विक्रांत मते
Saturday, 31 October 2020

आता टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली असून निकषानुसार अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. फिल्ड ऑफीसर देखील नियुक्त करण्यात आले असून टास्क फोर्सने नेमुन दिलेल्या इंडिकेटरबाबत कामकाज करणे व कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना आयुक्त जाधव यांनी दिल्या.

नाशिक : गेल्या वर्षी स्वच्छ भारत अभियानात देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये येण्याचा मान हुकल्याने यंदा पुन्हा पालिकेने कंबर कसली. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी त्यासाठी स्पेशल टास्क फोर्स तयार केला आहे. टास्क फोर्स मध्ये नियुक्त करण्यात आलेल्या अधिकायांवर टास्क फोर्सची जबाबदारी देण्यात आली. टास्क फोर्सचे कामकाज कसे राहील यासंदर्भात आराखडा सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. 

पहिल्या दहा शहरांमध्ये येण्यासाठी धडपड

गेल्या पाच वर्षांपासून केंद्र सरकारच्या वतीने स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. स्वच्छतेसंदर्भात केलेल्या उपाययोजना व त्या उपाययोजनांची फलश्रृती तपासण्यासाठी जानेवारी महिन्यात केंद्र सरकारचे पथक शहरात दाखल होते. पेयजल, सांडपाणी, घनकचरा निर्मूलन सेवा, हागणदारी मुक्ती, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, शौचालये आदींची पाहणी सर्वेक्षण पथकाच्या माध्यमातून केली जाते. सर्वेक्षण करताना नागरिकांचा अभिप्राय घेताना त्यांचा सहभाग किती आहे याची देखील पाहणी केली जाते. स्वच्छतेच्या बाबतीत गेल्या वर्षी नाशिक देशात अकरावे तर राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आले होते. नागरिकांचा प्रतिसाद व बांधकामांचे डेब्रीजमुळे पहिल्या दहा शहरांमध्ये येण्याचा मान हुकला होता. 

आयुक्त जाधव यांच्या सूचना

यंदा मागील वर्षाप्रमाणेच उपाययोजना करताना अधिक सक्षमतेने काम करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. प्रथमता शहरातील डेब्रीज उचलण्यासाठी एजन्सी नियुक्त होत नाही तोपर्यंत घंटागाडीमार्फत प्रतिटन आठशे रुपये दराने बांधकाम मलबा उचलला जाणार आहे. मलबा न उचलल्यास दहा पट दंडाची आकारणी केली जाणार आहे. त्यानंतर आता टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली असून निकषानुसार अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. फिल्ड ऑफीसर देखील नियुक्त करण्यात आले असून टास्क फोर्सने नेमुन दिलेल्या इंडिकेटरबाबत कामकाज करणे व कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना आयुक्त जाधव यांनी दिल्या.

हेही वाचा > विवाह समारंभाला आलेल्या कुटुंबियांना बनविला निशाणा! दहा लाखांहून अधिक ऐवज लंपास

नाशिककरांची जबाबदारी

- स्वच्छतेसाठी नागरिक व संस्थांनी उपक्रम राबवावे. 

- स्वच्छता अभियानात सक्रीय सहभाग नोंदवावा. 

- विलगिकरण करूनचं कचरा घंटागाडीत टाकावा. 

- सार्वजनिक ठिकाणी व उघड्यावर कचरा जाळण्यास बंदी. 

- पालापाचोळा घंटागाडीतचं टाकावा. 

- वास्तव्य असलेले घऱ, कॉलनी, ईमारत परिसर स्वच्छ ठेवावे. 

- ओला व सुका कचरा विलगिकरण करावा. 

- बांधकामाचे डेब्रीज महापालिच्या घंटागाडीतचं टाकावे. 

हेही वाचा > सिनेस्टाईल थरार! पोलिसांची चाहूल लागताच रिक्षाचालकाने ठोकली धूम; अखेर संशय खरा ठरला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashiks attempt to be in the top ten cities in the clean survey nashik marathi news