नाशिकचा 'तिसरा' हॉटस्पॉट अजूनही दुर्लक्षित...चौफेर कोरोनाचा फास..!

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 3 July 2020

मालेगावपाठोपाठ नाशिक शहरातील कोरोनाचा प्रसार लक्षात येण्यासारखा आहे. मात्र नाशिक शहराभोवती चौफेर विस्तारलेल्या नाशिक तालुक्‍यातील या भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव मात्र अजूनही दुर्लक्षित आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या एकमेव रुग्णालयाचा अपवाद सोडला तर जिल्हा रुग्णालयाशिवाय पर्यायच नसलेल्या या खेड्यांत 83 पॉझिटिव्ह झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा हॉटस्पॉट ठरू पाहत असलेल्या येथील रुग्णांची गणना जिल्हा रुग्णालयात होत असल्याने येथील प्रादुर्भाव दुर्लक्षित आहे. 

नाशिक : मालेगावपाठोपाठ नाशिक शहरातील कोरोनाचा प्रसार लक्षात येण्यासारखा आहे. मात्र नाशिक शहराभोवती चौफेर विस्तारलेल्या नाशिक तालुक्‍यातील ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव मात्र अजूनही दुर्लक्षित आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या एकमेव रुग्णालयाचा अपवाद सोडला तर जिल्हा रुग्णालयाशिवाय पर्यायच नसलेल्या या खेड्यांत 83 पॉझिटिव्ह झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा हॉटस्पॉट ठरू पाहत असलेल्या येथील रुग्णांची गणना जिल्हा रुग्णालयात होत असल्याने येथील प्रादुर्भाव दुर्लक्षित आहे. 

भौगोलिक रचना मुळात गुंतागुंतीची
नाशिक तालुक्‍याची भौगोलिक रचना मुळात गुंतागुंतीची आहे. मुंबई आग्रा महामार्गावर वाडीवऱ्हे, पुणे महामार्गावर शिंदे-पळसे, औरंगाबाद महामार्गावर ओढा-शिलापूर, तर इकडे देवळाली कॅम्प-भगूरपासून तर सिन्नर तालुक्‍याच्या सीमावर्ती गावापर्यंत आणि पश्‍चिमेला त्र्यंबकेश्‍वर मार्गावरील गावापर्यंत अवाढव्य स्वरूपात व शहराभोवती गोलाकार स्वरूपात विस्तारलेल्या तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 

चौफेर फैलाव 
शहराभोवती चौफेर विस्तारलेल्या नाशिक तालुक्‍यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. नाशिक-पुणे महामार्ग, भगूर-देवळाली कॅम्प परिसर, औरंगाबाद महामार्गासह त्र्यंबकेश्‍वर महामार्गावरील लहान लहान गावांत कोरोनाबाधित वाढत आहेत. त्यामुळे आतापर्यंत मालेगाव, नाशिक शहरापुरताच असलेला केंद्रबिंदू तालुक्‍यातील ग्रामीण भागाकडे सरकत असल्याचे चित्र आहे. 
नाशिक तालुक्‍यात शेवगेदारणा येथे सर्वांत जास्त रुग्ण सापडले. त्यानंतर संसरी, भगूर, देवळाली कॅम्प, लॅम रोड यासह भगूर-सिन्नर सीमावर्ती भागातील गावांत रुग्ण सापडले. 

हेही पाहा> VIDEO : मुलाच्या विवाहाचा आनंद..अन् विधानसभा उपाध्यक्षांच्या नृत्याची झलक..एकदा बघाच!

गावोगाव रस्ते बंद 
औरंगाबाद महामार्गावर माडसांगवी परिसरात रुग्ण सापडल्यानंतर लगतच्या गावामध्ये शिरकाव वाढत गेला. हेच चित्र पुणे महामार्गावरील गावांत पाहायला मिळते. शिंदे-पळसे, चेहेडीलगतच्या गावांत कोरोनाचा प्रभाव वाढतो आहे. तालुक्‍यातील पूर्वेकडील गावांत कोरोनाचा प्रभाव वाढत असताना पश्‍चिम पट्ट्यात आतापर्यंत कोरोना पोचला नव्हता. मात्र या आठवड्यात गिरणारे पश्‍चिम पट्ट्यातील वाडगाव व लगतच्या गावातही कोरोनाचा शिरकाव वाढतो आहे. देवळाली कॅम्प, संसरीगाव, शिंदे-पळसे, बेलतगव्हाणपासून पांढुर्लीपर्यंत रुग्णांची संख्या वाढत आहे. 

हेही पाहा> ह्रदयद्रावक "...पण पप्पा तर खूप दूर निघून गेले" या वाक्याने सर्वांचेच पाणावले डोळे

तिसरा हॉटस्पॉट 
जवळपास 100 च्या जवळ रुग्णसंख्या चाललेला नाशिक ग्रामीण भाग हा नाशिक शहर आणि मालेगावनंतर तिसरा हॉटस्पॉट म्हणून वेगाने वाढत आहे. दुर्दैवाने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयाचा अपवाद वगळता येथील रुग्णांना मात्र समर्थ पर्याय नसल्याने येथील फास लक्षात येत नाही, ही ग्रामीण तालुक्‍याची चिंता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik's third hotspot is still neglected nashik marathi news