शेकडो वर्षांत प्रथमच जगदंबा मातेचा नवरात्रोत्सव रद्द; घटी बसवण्याची परंपरा खंडित

navratri festival canceled
navratri festival canceled

नाशिक/वणी : श्री सप्तशृंगी मातेचे मुळरुप समजले जाणाऱ्या येथील जगदंबा मातेचा नवरात्रोत्सवही रद्द करण्यात आला असल्याने शेकडो वर्षांपासून देवी मंदीरात नऊ दिवस घटी बसून उपवास करण्याची प्रथा नवरात्रोत्सवाच्या इतिहासात प्रथमच खंडित होणार आहे.

गेल्या सात महिन्यापासून कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील प्रार्थनास्थळे बंद ठेवलेली आहेत. यामूळे जगदंबा मातेचा एप्रिल महिन्यातील चैत्रोत्सव पाठोपाठ शनिवार, ता. १७ पासून सुरु होणारा शारदीय नवरात्रोत्सवही रद्द करण्यात आला आहे. बुधवारी, ता. १४ सांयकाळी साडेसात वाजता वणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांच्या अध्यक्षतेखाली श्री जगदंबा मंदीर सभामंडपात श्री सप्तशृंगी देवी ट्रस्ट विश्वस्त मंडळाची बैठक झाली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, जेष्ठ विश्वस्त पोपटराव थोरात, उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, सुरेश देशमुख, रमेश देशमुख, गणेश देशमुख, राकेश थोरात, पुजारी सुधीर दवणे, पोलिस हवालदार चव्हाण, शिंदे, देवा पवार आदी उपस्थित होते.

हजारो महिला भाविकांची घटी बसवतात

यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांनी प्रशासनाने नवरात्र साजरा करतांना जारी केलेल्या नियमावली, घालण्यात आलेले निर्बंध याबाबत माहीती देवून मार्गदर्शन केले. यावेळी न्यासाचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळाच्यावतीने नवरात्रोत्सव दरम्यान संपन्न होणारे विविध धार्मिक विधी, पालखी, दसरा उत्सव याबाबतची माहीती देवून कोविड १९ च्या अनुषंगाने धार्मिक विधी करतांना अवलंबलेल्या  उपाययोजना व  नियमवलीनूसारच नवरात्रोत्सव साजरा करणार असल्याचे सांगण्यात आले. दरवर्षी नवरात्रोत्सवात जगदंबा माता मंदीर न परीसरात दोन हजारावर महिला भाविक घटस्थापना करुन नऊ दिवस घटी बसून उपवास करतात. मात्र शेकडो वर्षांत प्रथमच घटी बसणाऱ्या हजारो महिला भाविकांची घटी बसण्याची परंपरा खंडित झाली.

देवीचे ऑनलाईन दर्शन

यावर्षी महिलांना घरीच घटस्थापना करुन उपवास करावा लागणार आहे. दरम्यान देवी संस्थानच्यावतीने नागरिकांना घरबसल्या देवीचे ऑनलाईन दर्शन व्हावे यासाठी केबल नेटर्वक, सोशल मिडीयाद्वारे करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच आदिमायेच्या नवरत्रोत्सवातील नऊ दिवस गावातील प्रत्येक समाजातून साडी, पुजा विधी साहित्य सवाद्य मिरवणूकीने देवी मंदीरात नेवून पुजा विधी करण्याची प्रथा आहे. मात्र ही प्रथा खंडित होवू न देवीसाठी साडी व पुजा साहित्य प्रत्येक समाजाच्या  प्रतिनिधीलकडून स्विकारण्यात येणार असल्याची माहीती न्यासाचे अध्यक्ष राजेंद्र थोरात व विश्वस्त मंडळाने दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com