राष्ट्रवादीची मनपा निवडणुकीसाठी एक सदस्यीय वॉर्डरचनेची मागणी 

महेंद्र महाजन
Sunday, 17 January 2021

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूर्वतयारी सुरू झाली आहे. वॉर्डरचना व विषयांवर राष्ट्रवादी भवनात माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची रविवारी (ता. १७) बैठक झाली. तीत एक सदस्यीय वॉर्डरचनेची मागणी पुढे आली.

नाशिक : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूर्वतयारी सुरू झाली आहे. वॉर्डरचना व विषयांवर राष्ट्रवादी भवनात माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची रविवारी (ता. १७) बैठक झाली. तीत एक सदस्यीय वॉर्डरचनेची मागणी पुढे आली. त्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. 

एक सदस्यीय वॉर्ड रचना व्हायला हवी

नाशिक महापालिका निवडणूक सव्वा वर्षांनी होत आहे. त्यादृष्टीने प्रभागनिहाय बैठकी घेण्यात आल्या आहेत. प्रभागनिहाय बैठकींमधून नागरी समस्या जाणून घेण्यात आल्या. या बैठकींमधून एक सदस्यीय प्रभागरचनेची मागणी पुढे आली. त्याचअनुषंगाने आजच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. महापालिकेच्या मागील निवडणुकीत तत्कालीन सत्ताधारी भाजपने चार सदस्यीय प्रभागरचना केल्यामुळे नाशिकचा विकास होऊ शकला नाही. प्रभागातील कामांमध्ये श्रेय मिळणार नाही म्हणून सीमारेषेमुळे प्रभागात कामे झाली नाहीत. एक सदस्यीय प्रभागरचनेत विकासकामे होतात. तसेच प्रभागात एकच नगरसेवक असल्याने नागरी समस्या सोडविण्यास वाव मिळत असल्याने नागरिकांच्या हितासाठी व पक्षाचे अधिक नगरसेवक निवडून येण्यासाठी एक सदस्यीय वॉर्डरचना व्हायला हवी, अशी चर्चा बैठकीत झाली. 

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, अशोक सावंत, महापालिका गटनेते गजानन शेलार, बाळासाहेब कर्डक, निवृत्ती अरिंगळे, संजय खैरनार, मनोहर कोरडे, मकरंद सोमवंशी, जीवन रायते, कुणाल बोरसे, मुजाहिद शेख, प्रशांत वाघ आदी बैठकीस उपस्थित होते.

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP demands one-member ward structure for municipal elections nashik marathi news