World Tourism Day : इगतपुरीतील पर्यटन स्थळांची उपेक्षाच; वेलनेस हबचा प्रस्ताव अद्यापही लाल फितीत

विजय पगारे / गौरव परदेशी
Sunday, 27 September 2020

या काजवा महोत्सवाला हजारो लोक येतात. मात्र, यंदा कोरोनामुळे सहा ते सात महिन्यांपासून राज्यात पर्यटन बंदी आहे. पर्यटन स्थळे, मंदिर बंद आहेत. गड-किल्ल्यांवर जाण्यास मनाई असल्याने येथील पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांना यंदा कोट्यवधींचा फटका सहन करावा लागला आहे.

नाशिक : (इगतपुरी-खेडभैरव) निसर्गाची मुक्तपणे उधळण झालेला इगतपुरी-त्र्यंबकेश्वर परिसर पर्यटन स्थळ, धबधबे, विपश्‍यना केंद्र, गड-किल्ले, अशी विपुल समृद्धी लाभलेल्या या भागाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची जुनी मागणी आहे. महाबळेश्‍वरच्या धर्तीवर या भागाला पर्यटन स्थळ विकासाचे आश्‍वासन हवेत विरले आहे. 

कोरोनाने मोठा दणका 

तालुक्यातील पर्यटनाचा महाबळेश्‍वरच्या धर्तीवर विकास करण्याचे माजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी जाहीर केले होते. अनेकदा भावली धरणासह येथील पर्यटन स्थळांना भेटी देऊन अनेक कल्पना राबविण्याचा मनोदय वेळोवेळी मांडला. जगातून येणाऱ्या भाविकांसाठी विपश्यना केंद्र, तालुक्याच्या सीमेवर राज्यातील उंच असणारे कळसूबाईचे शिखर, रामायण काळातील जटायू मंदिर, कुंभमेळ्याचे महत्त्वाचे स्थान असलेले कावनई, तसेच दहा ते पंधरा मोठमोठी धरणंही आहेत. 

पर्यटकांची पाठ 

वैतरणा धरण, भंडारदरा धरण, देवबांध सुंदरनारायण गणेश मंदिर, महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई, अलंग-मलंग गड, मदन गड, रतन गड, उंट दरी, पाच धबधबे, रंधा फॉल, अंब्रेला फॉल, नवरा-नवरीचा डोंगर प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात इगतपुरी-भंडारदरा परिसरात काजव्यांची लुकलुकणारी दुनिया अवतरते. या काजवा महोत्सवाला हजारो लोक येतात. मात्र, यंदा कोरोनामुळे सहा ते सात महिन्यांपासून राज्यात पर्यटन बंदी आहे. पर्यटन स्थळे, मंदिर बंद आहेत. गड-किल्ल्यांवर जाण्यास मनाई असल्याने येथील पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांना यंदा कोट्यवधींचा फटका सहन करावा लागला आहे. 

वेलनेस हब बासनात 

इगतपुरीत १०० ते १५० एकर जमिनीवर जागतिक दर्जाचे आरोग्य केंद्र अर्थात वेलनेस हब तयार करण्यासाठी राज्याचे पर्यटन विकास महामंडळ सरसावले आहे. यात गुंतवणूक करणाऱ्या व्यक्ती व संस्थांकडून २०१७ मध्ये प्रस्ताव मागवले होते. श्री. रावल यांनी इगतपुरीत वेलनेस हबची घोषणा केल्यानंतर कामाला गती मिळणार असे वाटले होते. गुंतवणूकदार व महाराष्ट्र पर्यटन मंडळ संयुक्तपणे राबवणार होते; मात्र यालाही लाल फितीचा फटका बसला आहे. 

हेही वाचा > तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

कोरोनामुळे कळसूबाई शिखरावर गेल्या सहा ते सात महिन्यांपासून बंदी आहे. पुढील काळातही कोरोना संसर्ग कमी होईपर्यंत बंदी असणार आहे. पर्यटन बंदी असल्याने येथील स्थानिक व्यवसायांचा रोजगार बुडाला आहे. 
-तुकाराम खाडे, उपाध्यक्ष, श्री कळसूबाई देवस्थान ट्रस्ट  

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Neglect of tourist places in Igatpuri taluka nashik marathi news