esakal | ह्रदयद्रावक! हळद लागली अन्‌ अक्षता रुसल्या! सप्तपदीच्या फेऱ्यांपूर्वीच नववधूचा संसार उद्‌ध्वस्त
sakal

बोलून बातमी शोधा

navvadhu fire.jpg

काजल घुगे हिचा 24 मेस विवाह आहे. तिची लग्नासंदर्भातील तयारीही सुरू होती. धुणीभांडीच्या कामातून मिळणाऱ्या वेतनातून लग्नासाठी लागणाऱ्या गोष्टींची जुळवाजुळव ती करत होती. काही वस्तू जुळवल्याही होत्या. आणखी काही पैशांची आवश्‍यकता भासेल म्हणून भिशीची उचल करून रक्कम घरात ठेवली होती.

ह्रदयद्रावक! हळद लागली अन्‌ अक्षता रुसल्या! सप्तपदीच्या फेऱ्यांपूर्वीच नववधूचा संसार उद्‌ध्वस्त

sakal_logo
By
युनूस शेख : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लग्नाच्या आदल्या दिवशी भीमवाडी झोपडपट्टीला लागलेल्या आगीत हळद लागलेल्या दीपाली पारखे या नववधूचा संसार उद्‌ध्वस्त झाला. हळदीच्या अंगाने जीव धोक्‍यात टाकत लग्नाचे साहित्य आणि कुटुंबीयांना वाचविण्यासाठीची तिची धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते. जणू अक्षता रुसल्याची प्रतिक्रिया तिच्या डोळ्यातील अश्रू देऊन जात होत्या. 

सप्तपदीच्या फेऱ्यांपूर्वीच संसार उद्‌ध्वस्त
शनिवारी (ता. 25) भीमवाडी झोपडपट्टीच्या आगीचे तांडव सर्वांना अनुभवास मिळाले. सुमारे दीडशे कुटुंबीयांचा संसार होत्याचा नव्हता झाला. त्यात पारखे कुटुंबीयांवर, तर दुःखाचा डोंगरच कोसळला. त्यांचा संपूर्ण संसार उद्‌ध्वस्त झाला. शिवाय रविवारी (ता.26) पारखे कुटुंबीयातील दीपालीचा लग्न सोहळा होता. तोही रद्द करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. लग्नामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. शनिवारी हळद लावत नसल्याने तिला शुक्रवारी (ता.24) हळद लागली. दोन दिवसांनी तिच्या नवीन आयुष्याची सुरवात होणार म्हणून आनंदाने तिचा चेहरा फुलला होता. लग्नाच्या सुखमय जीवनाची तिने रंगवलेली स्वप्नं डोळ्यात घेऊन झोपलेल्या दीपालीच्या मनिध्यानी ही नव्हते, की शनिवारची सकाळ तिच्यासाठी दुःखाचा डोंगर घेऊन येणार आहे. 
रविवारी लग्न असल्याने शनिवारी सकाळी संपूर्ण पारखे कुटुंबीय लग्नाच्या तयारीला लागले होते. तोच सकाळी सव्वानऊच्या सुमारास परिसरात किंचाळण्याचा आवाज आला. त्यांनी बाहेर येऊन पाहिले, तर शेजारील झोपड्यांना आग लागली होती. आगीचे लोळ त्यांच्या घराकडे सरकत असल्याचे पाहून संपूर्ण कुटुंबीय बाहेर पळाले. तोच त्यांच्या घरास आगेने कचाट्यात घेतले. अन्य झोपड्यांसह त्यांचे घर जळून भस्मसात झाले. नवरीचा बस्ता, दागिने, रोख रक्कम, धान्य क्षणार्धात खाक झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर आईने दूरवर जाऊन कचरा, भंगार वेचून जुळवलेला संसार, जमवलेल्या पैशातून केलेली खरेदी, यातून निर्विघ्न लग्नसोहळा पार पडेल, असे वाटत होते. परंतु येथेही संकटाने त्यांची पाठ सोडली नाही. या घटनेने लग्न, तर थांबलेच; परंतु उदरनिर्वाहासाठी निवारागृहात जावे लागले. कोणावर अशी वेळ येऊ नये, अशी प्रार्थना पीडित युवती आणि तिच्या आईने केली. 

नशिबाने थट्टा मांडली... 
काजल घुगे हिचा 24 मेस विवाह आहे. तिची लग्नासंदर्भातील तयारीही सुरू होती. धुणीभांडीच्या कामातून मिळणाऱ्या वेतनातून लग्नासाठी लागणाऱ्या गोष्टींची जुळवाजुळव ती करत होती. काही वस्तू जुळवल्याही होत्या. आणखी काही पैशांची आवश्‍यकता भासेल म्हणून भिशीची उचल करून रक्कम घरात ठेवली होती. शनिवारी लागलेल्या आगीत घरासह सर्व जळून राख झाले. त्यामुळे विवाहाचे काय होणार, असा प्रश्‍न तिला पडला आहे. नशिबाने चांगलीच परीक्षा घेतली आहे. लग्नाच्या काही दिवस अगोदर संपूर्ण संसार उद्‌ध्वस्त झाला असून, त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहोत, असे काजल घुगे हिने सांगितले. 

हेही वाचा > रंगात आला डाव...पण पोलिसांना बघून टांगा पलटी घोडे फरार...अन् मग चांगलीच झाली फजिती!

हळद लागली अन्‌ अक्षता रुसल्या! 
कचरा आणि भंगार वेचून लग्नाचा बस्ता केला होता. लग्नाच्या आदल्या दिवशी घरास लागलेल्या आगीत सर्व होत्याचे नव्हते झाले. आमच्यावर तर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. - अनिता पारखे, नववधूची आई 

आगेची घटना नवरा मुलाच्या घरी कळवून लग्न रद्द केले. लग्नाच्या दिवशी घटना घडली असती, तर काय झाले असते. आता केवळ अंगावरील कपडे शिल्लक राहिले आहेत. पुढील आयुष्याची चिंता लागली आहे. - दीपाली पारखे, नववधू 

हेही वाचा > धक्कादायक! टेम्पोवर बोर्ड अत्यावश्यक सेवेचा...अन् आतमध्ये मात्र भलतंच

go to top