esakal | नवीन अटी-शर्तींसह पेस्ट कंट्रोल ठेका स्थायीवर; शिवसेनेसह विरोधी पक्षांची भूमिका संशयास्पद
sakal

बोलून बातमी शोधा

nmc.jpg

कल्पना पांडे यांनी मात्र एकाच ठेकेदाराला डोळ्यांसमोर ठेवून काम दिले जात असल्याचा आरोप केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या समीना मेमन व भाजपच्या वर्षा भालेराव, प्रा. शरद मोरे यांनी नवीन अटी व शर्तींवर नवीन निविदाप्रक्रिया राबविण्याची मागणी केली. 

नवीन अटी-शर्तींसह पेस्ट कंट्रोल ठेका स्थायीवर; शिवसेनेसह विरोधी पक्षांची भूमिका संशयास्पद

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : मे. दिग्विजय एन्टरप्राइजेस कंपनीला ठेका देण्यास नगरसेवकांचा विरोध असतानाही स्थायी समितीमध्ये कोविड चर्चेच्या निमित्ताने पेस्ट कंट्रोलचा ठेक्याचा विषय आणून पुढील स्थायीच्या सभेत नवीन अटी व शर्तींसह प्रस्ताव ठेवण्याच्या सूचना सभापती गणेश गिते यांनी दिल्या. प्रस्तावाला होकार ना नकार, या भूमिकेवरून शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका संशयास्पद ठरत आहे. 

शिवसेनेसह विरोधी पक्षांची भूमिका संशयास्पद 

गेल्या वर्षी ऑगस्टपासून पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याला सातत्याने मुदतवाढ दिल्यानंतर पुन्हा नव्याने त्याच म्हणजे मे. दिग्विजय एन्टरप्राइजेसला ठेका देण्याची तयारी सुरू झाली आहे. निविदाप्रक्रिया राबविल्यानंतर निविदा समितीने अनुभव नसणे, आयुक्तांच्या मान्यतेशिवाय मूळ प्राकलनात बदल, तांत्रिक व जीवशास्त्राशी संबंधित काम असताना अतांत्रिक कंपनीला ठेका देणे, प्राकलन तपासण्यासाठी व्यवस्था नसताना त्रयस्थ संस्थेकडून तपासणी न करणे, दिग्विजय एन्टरप्राइजेसची नोंदणी इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशनकडे नसणे, मालेगाव महापालिका हद्दीत दिग्विजय एन्टरप्राइजेसवर गुन्हा दाखल असणे, या मुद्द्यांवर ठेका नाकारण्यात आला होता. निविदा समितीने ठेका नाकारल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांकडून दिग्विजयसाठी प्रयत्न केले जात होते. 

नवीन अटी व शर्तींवर नवीन निविदाप्रक्रिया राबविण्याची मागणी

स्थायी समितीच्या मंगळवार (ता. ८) च्या सभेत कोविड प्रादुर्भावाचा मुद्दा उपस्थित करताना पेस्ट कंट्रोलचा विषय चर्चेला आणताना सभापती जो निर्णय घेतील ते मान्य राहील, अशी भूमिका घेण्यात आली. काँग्रेसचे राहुल दिवे यांनी शहरात साथीचे आजार पसरू नये म्हणून ठेका देण्याची मागणी केली. शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी निविदा समितीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताना चुकीचा प्राकलन तयार केल्याचा आरोप केला. कल्पना पांडे यांनी मात्र एकाच ठेकेदाराला डोळ्यांसमोर ठेवून काम दिले जात असल्याचा आरोप केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या समीना मेमन व भाजपच्या वर्षा भालेराव, प्रा. शरद मोरे यांनी नवीन अटी व शर्तींवर नवीन निविदाप्रक्रिया राबविण्याची मागणी केली. 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

शिवसेनेची भूमिका 'नरोवा कुंजरोवा' 

शिवसेनेने पेस्ट कंट्रोलच्या प्रस्तावाला होकार दिला नसला तरी, नकारही दिला नाही. त्याशिवाय विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी पेस्ट कंट्रोलसंदर्भात प्रशासनाकडे खुलासा मागविला, त्याबाबतही अद्याप माहिती समोर आली नाही. त्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेची भूमिका दिग्विजय एन्टरप्राइजेसला ठेका देताना संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे.  

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

संपादन - किशोरी वाघ