
काही दिवसांपासून विविध कारणांनी वादग्रस्त कामकाजामुळे चर्चेत असलेल्या जिल्हा रुग्णालयात पुन्हा प्रसूती कक्षातील झुरळांचा विषय गाजला.
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील झुरळांचा संसार जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता.१४) चांगलाच गाजला. जिल्हा शल्यचिकित्सकांनी रुग्णालयात असे कुठलेच झुरळ नसल्याचा दावा केला, तर त्याचवेळी प्रसूती कक्षात झुरळ असतील, तर त्याचा शोध घेण्याचे जाहीर केल्याने त्यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे अखेर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी हस्तक्षेप करीत, रुग्णालयातील आरोग्य सेवेत लक्ष देण्याचे निर्देश दिले.
अखेर जिल्हाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप
काही दिवसांपासून विविध कारणांनी वादग्रस्त कामकाजामुळे चर्चेत असलेल्या जिल्हा रुग्णालयात पुन्हा प्रसूती कक्षातील झुरळांचा विषय गाजला.
जिल्हा रुग्णालयात असे कुठलेही झुरळ नसल्याचा दावा जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. रत्ना रावखंडे यांनी केला, तर जिल्हा प्रशासनाने गुरुवारी दिलेल्या निवेदनात झुरळांच्या बंदोबस्तांसाठी नियोजन केले जाणार असल्याचे कसे म्हटले, या प्रश्नावर डाॅ. रावखंडे यांनी ‘नो काॅमेंटस’ म्हणत प्रतिक्रिया देणे टाळले. अखेर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी हस्तक्षेप करीत, रुग्णालयात सुधारणासाठी निधी कमी पडणार नाही. असुविधांबाबत प्रशासनाने दिरंगाई करू नये. खासगी वैद्यकीय सेवा महागली असताना, सामान्यांना दिलासा देणारे जिल्हा रुग्णालय व तेथील व्यवस्था टिकली पाहिजे. त्यावरील लोकांचा विश्वास टिकावा आणि तो वाढावा, म्हणून सगळ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे निर्देश मांढरे यांनी दिले.
हेही वाचा > लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?
आधी सिलिंडर आता झुरळ
भंडारा येथील आग दुर्घटनेनंतर जिल्हा रुग्णालयातील आगप्रतिरोधक यंत्राची (फायर इन्विस्टिगेशर) मुदत संपल्याचे पुढे आले. डिसेंबरमध्ये मुदत संपलेल्या सिलिंडरचा पंचनामा प्रसार माध्यमांनी केला. तेव्हा जिल्हा प्रशासनाने यंत्राची मुदत ३१ मार्चला संपत असून, आवश्यक असलेले फायर ऑडिट झाल्याचा दावा केला होता. पाठोपाठ काही कक्षात झुरळ असल्याचा प्रकार गुरुवारी (ता. १४) उघडकीस आला. नंतर प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांच्या नातेवाइकांच्या पिशव्यातून झुरळ येत असल्याचा अनोखा खुलासा प्रशसानाने केला. त्यासाठी पेस्ट कंट्रोल केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. ही सगळी प्रक्रिया सुरू असताना, रुग्णालयात असे झुरळच नसल्याचे पाहणीत आढळल्याचे स्वत: जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले. मात्र, त्यावर बरीच चर्चा रंगली.
हेही वाचा > देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस
अल्पवयीन मुलीचे सिझेरियन
जिल्हा रुग्णालयात अल्पवयीन मुलीचे सिझेरियन करताना तिचे वय दडविल्याच्या प्रकाराबाबत प्रशासनाने रुग्णालयात वय पाहून नव्हे, तर रुग्णाची स्थिती पाहून उपचार करावे लागतात. तसेच संबंधितांच्या नातेवाइकांनी जे वय सांगितले तेच कागदावर येते. त्याचा प्रशासनाशी कुठलाही संबंध येत नसल्याचे स्पष्ट केले.