#Lockdown : दिव्यांग बहिणीसोबत एका भावाची विवंचना! कोरोनाची अशीही झळ..

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 30 March 2020

बुलडाणा जिल्ह्यातील नांदुराजवळील निमगावचे रहिवासी असलेले प्रकाश पाऊलझाडे व त्यांची विकलांग बहीण ज्योती यांची ही वेदनादायी कहाणी आहे. घरात बहीण अपंग भाऊ हॉटेलातील कारागीर असे दोघेच सहा महिन्यांपूर्वी नाशिकला आले होते. परंतु सहा महिने होत नाहीत तोच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन जाहीर झाले. आता कमवायचे काय अन्‌ आपल्या बहिणीला खाऊ घालायचे काय, असा प्रश्‍न प्रकाश यांच्यासमोर होता.

नाशिक / नांदगाव : आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या भावाने गावाकडे पोटाची खळगी भरली जात नाही म्हणून दिव्यांग बहिणीला सोबत घेऊन नाशिक गाठले. येथे येऊन जेमतेम सहा महिने होत नाहीत तोच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या या भावापुढे कोरोनाच्या लॉकडाउनमुळे आभाळच कोसळले. हॉटेल बंद पडल्याने विवंचना वाढली. करावे काय म्हणून भाऊ व बहिणीने निमगाव (जि. बुलडाणा) येथे पायीच जाण्याचा निर्णय घेतला. 

बहिण-भावाची वेदनादायी कहाणी
बुलडाणा जिल्ह्यातील नांदुराजवळील निमगावचे रहिवासी असलेले प्रकाश पाऊलझाडे व त्यांची विकलांग बहीण ज्योती यांची ही वेदनादायी कहाणी आहे. घरात बहीण अपंग भाऊ हॉटेलातील कारागीर असे दोघेच सहा महिन्यांपूर्वी नाशिकला आले होते. परंतु सहा महिने होत नाहीत तोच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन जाहीर झाले. आता कमवायचे काय अन्‌ आपल्या बहिणीला खाऊ घालायचे काय, असा प्रश्‍न प्रकाश यांच्यासमोर होता. नाशिकला ज्या ठिकाणी काम करणार तेथेच बहिणीचा पांगुळगाडा सोबत ठेवून रोजंदारीचे काम करणाऱ्या या भावाची आपबीती ऐकणाऱ्याच्या मनात कालवाकालव करणारी ठरली.

हेही वाचा > ब्रेकिंग : नाशिकमध्ये कोरोनाचा शिरकाव; आढळला पहिला पॉझिटिव्ह रुग्ण

रस्त्याने पायी जाणाऱ्या लोकांची चौकशी करताना प्रभारी तहसीलदार योगेश जमदाडे यांचे लक्ष या भावा-बहिणीकडे गेले. बहिणीला अपंगांसाठी असलेल्या सायकलीने हा भाऊ घेऊन जात होता. संबंधितांची विचारपूस करून श्री. जमदाडे यांनी सावित्रीबाई कन्या विद्यालयाच्या निवास शिबिरात आणले. त्यांच्या राहण्या-खाण्याची सध्या सोय झाली असली तरी पुढे काय, असा प्रश्‍न उरतोच.  

हेही वाचा > #Lockdown : 'ताई, खूप दिवसांनी घरचं जेवण मिळालं!'...अन् 'त्या' पोलिसांचे डोळे पाणावले​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about mentally challenged sister with brother lockdown story Nashik Marathi News