केवळ नावापुरतीच उरली 'इथली' औद्योगिक वसाहत..! व्यवसाय उभा करण्यासाठी आशाळभूत नजरा

peth midc.jpg
peth midc.jpg

नाशिक / पेठ : जिल्ह्यातील आदिवासी तालुका अशी ओळख असलेल्या पेठ तालुक्‍यात विकासाच्या दृष्टीने 1987 मध्ये औद्योगिक वसाहत निर्माण झाली. आज 33 वर्षांनंतर औद्योगिक क्षेत्राचा विकास तर मात्र जे व्यवसाय सुरू झाले तेदेखील असुविधांमुळे स्थालांतरित झाल्याने येथील औद्योगिक वसाहत केवळ नावापुरती उरली आहे.

या वसाहतीकडे आशाळभूत नजरा
1987 मध्ये पेठ औद्योगिक वसाहती विकास महामंडळाने 15 एकर जागा आरक्षित करून अंतर्गत रस्ते, वीजपुरवठ्यासह सर्व प्रक्रिया पूर्ण करीत 1990 मध्ये 11 एकर क्षेत्रात 40 प्लॉट औद्योगिक, तर तीन प्लॉट व्यावसायिक वापरासाठी टाकण्यात आले. यातील 30 प्लॉट विकलेदेखील गेले. उद्योगांना पाण्याची सोय-सुविधा करताना विहीर आणि कूपनलिकेच्या माध्यमातून टाकीत पाणी आणून त्याचे पाइपलाइनद्वारे वितरण करण्याचे नियोजन केले. त्यामुळे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये अनेकांनी पुढाकार दाखविला. सुविधांमुळे तीन तीन कंपनी उद्योजकांनी व्यवसाय थाटून कामास सुरवात केली. मात्र, काही काळातच पाण्यामुळे उद्योगांचे स्थलांतर झाल्याने ज्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची स्वप्ने पाहिली, ते तरुण आज वार्धाक्‍याकडे झुकली असून, त्यांची मुले या वसाहतीकडे आशाळभूत नजरेने पाहत आहे.

अल्पावधीतच घरघर
पेठ औद्योगिक वसाहतीमध्ये महामंडळाकडून आवश्‍यक त्या मूलभूत सुविधा देण्यात आल्या. मात्र कालांतराने येथे पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागल्याने उद्योजकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. यामुळे येथील उद्योजकांनी आपले उद्योगांचे स्थलांतर केले. यामुळे इतर उद्योजकांनीही येथे येण्यास नकार दिला. त्यामुळे या औद्योगिक क्षेत्रात आज अवघे सहा युनिट सुरू असून, यात एक हॉटेल, एक टेलिफोन एक्‍स्चेंज ऑफिस, एक राइस मिल, एक गॅस गोडावून, एक सिमेंट पाइप कारखाना, एक वर्कशॉप यांचा समावेश आहे.

हेही वाचा >ह्रदयद्रावक! पुत्रवियोगाचा धक्का..अवघ्या अर्ध्या तासातच मातेचाही जगाचा निरोप.. गावात हळहळ 

विकासाचा प्रयत्नदेखील "फेल'
राज्य शासनाने विकासाच्या दृष्टीने राज्यात 54 ग्रोथ सेंटर घोषित केले. त्यामध्ये पेठ तालुक्‍याचाही समावेश होता. अविकसित भागाचा विकास होण्यासाठी स्थानिक स्तरावरील लघुउद्योगांना चालना देण्यासाठी हा प्रदेश "डी झोन' घोषित करण्यात आला. उद्योगासाठी 35 टक्के अनुदानाची योजना घोषित करून स्थानिक तरुणांनी व्यवसायकडे वळविण्याचा प्रयत्न झाला. मात्र उद्योगवाढीसाठी शासन पातळीवर लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा न झाल्याने हा प्रयत्नही फेल गेला.

महामंडळाचा पाण्यासाठी प्रयत्न
पेठ येथील शिराळा धरणात 1.2 टीसीएम पाणी साठवले जाते, या धरणातून पेठच्या औद्यगिक वसाहतील पाणी मिळावे, यासाठी महामंडळाने इरिगेशन विभागाशी पत्रव्यवहार केला. मात्र धरणातील पाणी शेती व पिण्यासाठी आरक्षित असल्याने उद्योगांना पाणी देणे अशक्‍य असल्याचे उत्तर महामंडळाला देण्यात आले आणि उद्योगासाठी स्वतंत्र पाणीयोजना करणे विकास महामंडळास जास्त खर्चिक असल्याने हा प्रयत्नदेखील अपयशीच ठरला.

तो प्रश्न लवकरच मार्गी लागेल

पेठ औद्योगिक वसाहतीला शिराळा धरणातील मृत साठ्यातील पाणी मिळविण्यासाठी आपण इरिगेशन विभागाकडे पाणीवाटप ना हरकत प्रमाणपत्राबाबत पत्रव्यवहार केला असून, मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. तो प्रश्न लवकरच मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे.- नरहरी झिरवाळ (विधानसभा उपाध्यक्ष)

उच्च शिक्षण घेऊनही स्थानिक रोजगार नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी मोबाईल रिपेअरिंगचा व्यवसाय करतो. कारखानदार आले, तर नक्कीच फायदा होऊन रोजगार मिळेल.- विक्रम चौधरी (पेठ)

येथील उद्योगनगरीला गती मिळाली, तर स्थानिक तरुण बेरोजगार होणार नाही. आज उच्च शिक्षण घेतलेले तरुण शेतमजुरी अथवा जनावरं चारण्यापलीकडे काहीही करत नाहीत.-अरबाज शेख (सचिव, दादासाहेब बीडकर महाविद्यालय)

आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी पेठ औद्योगिक वसाहतीचा पाणीप्रश्‍न सोडवून उद्योगांना चालना देणे गरजेचे आहे. काम नसल्याने येथील तरुण पिढी व्यसनाधिनतेकडे चालली आहे.- रामदास वाघेरे (सरपंच, कोपुर्ली खुर्द)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com