रासाकाच्या पिचवरून आमदार बनकरांचा मास्टरस्ट्रोक! निफाडच्या राजकीय पटलावर वाहणार मतलबी वारे 

political news
political news

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : क्रिकेट सामना जसा अनिश्‍चित व विजयाचा लंबक इकडून तिकडे झुकतो अन्‌ दोन्ही संघांना झुलवत असतो, तसेच निफाडचे राजकारणही बेभरवशाचे असते. निवडणुका नसल्या तरी राजकीय मैदानावर बाराही महिने शह-काटशहाच्या लढती दिसतात. आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल कदम यांच्या गटामधील संघर्षात कोण वरचढ याचा ठाव लागत नव्हता. पण, आमदार बनकर यांनी रासाकाची सूत्रे मिळविली अन्‌ रासाकाच्या पिचवरून मारलेला खणखणीत मास्टरस्ट्रोक विरोधकांना घायाळ करणारा ठरला. रासाकाच्या निमित्ताने निफाडच्या राजकारणातील मतलबी वारे व चेहरे हे आमदार बनकर यांच्या बाजूने वाहू लागल्यास नवल वाटायला नको. 

दिलीप बनकर व अनिल कदम या आजी-माजी आमदारांभोवती निफाडचे राजकारण सध्या पिंगा घालते आहे. दीड वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार बनकर यांच्या दोनपैकी एका पराभवाची परतफेड केली. अस्तित्वाच्या लढाईत बनकर यांनी कदम यांना धोबीपछाड दिल्यापासून हा संघर्ष अधिकच धुमसतो आहे. कदम गटाने निसाका-रासाकावरून आमदार बनकर यांच्यावर टीकेची झोड उठविली. संकटाला संधी समजून आमदार बनकर यांनी सहकार कायद्यात बदल करून घेत स्वत: संस्थापक असलेल्या स्व. अशोक बनकर पतसंस्थेच्या माध्यमातून रासाकाचा कारभार हाती घेतला आहे. मंत्रालय पातळीवर आलेले अडथळे ओलांडत आमदार बनकरांनी रासाका मिळविताना एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. 
२०२० मध्ये निसाका ताब्यात घेण्याच्या स्वप्नाला सभासदांनी कौल न दिल्याने तडा गेला. मात्र, रासाकाच्या निमित्ताने साखर उद्योगात पाय ठेवण्याचे त्यांचे स्वप्न साकार झाले. सहकार क्षेत्रात त्यांचा हातखंडा आहे. राजकीय डावपेचापेक्षा आमदार बनकर हे पक्के व्यवहारी अन्‌ व्यापारी दृष्टिकोनाचे आहे, हे सर्वश्रृत आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील बहुतांश संस्थांच्या प्रगतीचा आलेख चढता आहे. त्यामुळे खंगलेल्या रासाकाला ते गतवैभव प्राप्त करून देतील, यात शंका नाही. तसे झाल्यास निफाडच्या राजकारणात मोठा टर्निंग पॉइंट येऊ शकतो. चालत्या गाडीत बसणारे नेते व कार्यकर्ते आमदार बनकर यांच्या गटात सामील झाल्यास आश्‍चर्य वाटायला नको. साखरेप्रमाणे स्वभावात गोडवा आणून दुरावलेले जुने सहकारी पुन्हा जोडण्याची आमदार बनकर यांना रासाकाच्या निमित्ताने मोठी संधी आहे. 

अडीच हजारांच्या क्षमतेने चालविणार रासाका 

रासाका घ्यायचाच असा चंग बांधलेल्या आमदार बनकर यांनी २० रुपयांनी निविदा वाढवून देत १११ रुपये प्रतिटन भाडेतत्त्वावर घेतला. दररोज एक हजार २५० टन क्षमता हा साखर उद्योगातील हातबट्ट्याचा धंदा आहे, याचा अभ्यास करून रासाकाची क्षमता पहिल्याच हंगामात अडीच हजार टनापर्यंत वाढविण्याचे त्यांचे नियोजन आहे. शिवाय डिस्टलरी ३० ऐवजी ४५ हजार, स्पिरीटऐवजी इथेनॉल, कंपोस्ट खत असे उपपदार्थ निर्मिती करून रासाकाला गतवैभव, ऊस उत्पादकांना हक्काचा कारखाना यांसह स्वत:ची शब्दाला जागणारी अशी प्रतिमा आमदार बनकर करू शकतील. दीर्घ काळासाठी म्हणजे १५ वर्षांसाठी रासाका आमदार बनकर यांच्या हाती राहणार आहे. शिवाय उसाचे क्षेत्र २० किलोमीटर अंतराच्या आत असल्याने वाहतूक खर्च कमी होऊन त्याचा लाभ ऊस उत्पादकांना होईल. आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक सक्षम असलेल्या स्व. अशोक बनकर पतसंस्थेच्या माध्यमातून सुमारे दहा कोटी रुपये भांडवलातून रासाकाची चूल पेटणार आहे. १५० ते २०० कामगारांना रोजगार मिळेल. शिवाय रासाका परिसरात व्यापार उदिम वाढीस लागणार आहे. 

माजी आमदार कदम यांनी ओझरला नगर परिषदेचा दर्जा मिळवून दिल्याची घोषणा केली; पण अंतिम अधिसूचना अद्याप शासनस्तरावरून घोषित झाली नाही. त्यामुळे कदम यांच्याही मास्टरस्ट्रोकमधून निघालेले चेंडू अद्याप सीमापार गेलेले नाही.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com