महापालिकेला हवे अतिरिक्त तीनशे दशलक्ष घनफुट पाणी!

nashik-nmc_.jpg
nashik-nmc_.jpg

नाशिक : गंगापूर धरण समूहासह दारणा व मुकणे धरणे फुल्ल झाल्याने तसेच गेल्या वर्षी दोनशे दशलक्ष घनफुट अतिरिक्त पाणी वापरण्यात आल्याने यासर्व बाबींचा विचार करून महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ५५०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी नोंदविली आहे. पंधरा ऑक्टोंबरपर्यंत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन महापालिकेच्या वाढीव पाणी मागणीचा विचार केला जाणार आहे. 

शहरात पाण्याचा वापर वाढला

नाशिक शहरासाठी गंगापूर, काश्‍यपी, गौतमी या समुहातून पाणी पुरवठा केला जातो. दररोज धरणातून पाचशे दशलक्ष लिटर्स पाणी उचलले जाते. परंतू मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर शहरात पाण्याचा वापर वाढला. दररोज ५२० दशलक्ष लिटर्सपर्यंत धरणातून पाणी उचलले जात आहे. गेल्या वर्षी जिल्हाधिकारी कार्यालयाने पाच हजार दशलक्ष घनफुट पाणी आरक्षित केले होते. यात गंगापूर धरण समुहातून ३६०० दशलक्ष घनफुट, दारणा धरणातून चारशे दशलक्ष घनफुट तर मुकणे धरणातून एक हजार दशलक्ष घनफुट असे एकुण पाच हजार दशलक्ष घनफुट पाणी आरक्षित केले होते. ३१ जुलैपर्यंत पाण्याचे आरक्षण होते. परंतू प्रत्यक्षात शहरात अतिरिक्त पाणी वापरले गेले. 

महापालिकेची अतिरिक्त पाण्याची मागणी

गंगापूर धरणातून ४९ दशलक्ष घनफुट तर मुकणे धरणातून ४६ दशलक्ष घनफुट अतिरिक्त पाणी वापरले गेले. चेहडी पंपिंग स्टेशन येथून नाशिकरोड साठी पाणी उचलताना अळी मिश्रित पाणी येत असल्याने महापालिकेने पाणी पुरवठा बंद करून गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्रातून नाशिकरोड भागासाठी पाणी पुरवठा केला होता. त्यामुळे दारणा धरणात आरक्षित असलेले चारशे दशलक्ष घनफुट एवजी ३१९ दशलक्ष घनफुट पाणी उचलण्यात आले. बारा महिने पंपिंग स्टेशनवरून उपसलेल्या पाण्याचा हिशोब लक्षात घेता सुमारे २०० दशलक्ष घनफुट पाणी अतिरिक्त उचलले गेल्याने महापालिकेने अतिरिक्त पाण्याची मागणी नोंदविली आहे. 

वाढत्या व फ्लोटेड लोकसंख्येचा परिणाम 

यंदा सप्टेंबर अखेरपर्यंत गंगापूर, दारणासह मुकणे धरण शंभर टक्के भरले आहे त्याचबरोबर शहराची लोकसंख्या वीस लाखांच्या आसपास पोहोचली आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी दिड ते दोन लाख लोक धार्मिक पर्यटनासाठी शहरात येत असल्याने त्याचा विचार करून साडेपाच हजार दशलक्ष घनफुट पाण्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. 

असा पाणी वापर अशी नोंदणी (दशलक्ष घनफुटात) 
धरण मागील आरक्षण पाण्याचा वापर पुढील वर्षाची मागणी 

गंगापूर धरण समुह ३६०० ३६०० ३८०० 
दारणा ४०० ३१९ ४०० 
मुकणे १००० १२४६ १३०० 

एकुण ५००० ५२१४ ५५०० 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com